कारवारमध्ये काँग्रेसची प्रचारात मुसंडी

सभांसह मतदारांच्या गाठीभेटींवर भर : काँग्रेसच्या आमदारांकडून कंबर कसून प्रचार खानापूर : कारवार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने प्रचारात मुसंडी मारली असून मतदारसंघातील सर्व आमदारांनी एकजुटीने प्रचारकार्याला वाहून घेतल्याने दिसून येत आहे. मतदारसंघात प्रचाराच्या तीन फेऱ्या पूर्ण केल्या असून प्रत्यक्ष गाठीभेटी आणि कोपरा सभा तसेच महिला मेळावे घेण्यात येत आहेत. काँग्रेसच्या योजनांची माहिती मतदारांपर्यंत पोहचवून काँग्रेसची ध्येयधोरणे […]

कारवारमध्ये काँग्रेसची प्रचारात मुसंडी

सभांसह मतदारांच्या गाठीभेटींवर भर : काँग्रेसच्या आमदारांकडून कंबर कसून प्रचार
खानापूर : कारवार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने प्रचारात मुसंडी मारली असून मतदारसंघातील सर्व आमदारांनी एकजुटीने प्रचारकार्याला वाहून घेतल्याने दिसून येत आहे. मतदारसंघात प्रचाराच्या तीन फेऱ्या पूर्ण केल्या असून प्रत्यक्ष गाठीभेटी आणि कोपरा सभा तसेच महिला मेळावे घेण्यात येत आहेत. काँग्रेसच्या योजनांची माहिती मतदारांपर्यंत पोहचवून काँग्रेसची ध्येयधोरणे पटवून देण्यात येत आहेत. मतदारसंघातील आठही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा प्रचार नियोजनबद्ध सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अंजली निंबाळकर यांचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे. कारवार मतदारसंघात सहा वेळा भाजपने विजय मिळविला. 2019 च्या निवडणुकीत 4 लाखांचे मताधिक्य घेऊन भाजप विजयी झाला होता. सलग सहा वेळा कारवार मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या भाजपच्या खासदारांना एकदा 1 वर्षासाठी केंद्रीय मंत्रिपदही मिळाले होते. मात्र, संपूर्ण कार्यकाळात मतदारसंघात कोणताही विकास करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीही भाजपचे तगडे आव्हान काँग्रेससमोर आहे. यावेळी काँग्रेसनेही भाजपला टक्कर देण्यासाठी सर्व संमतीने माजी आमदार अंजली निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेस गट-तट विसरून अंजली निंबाळकर यांच्या पाठिशी उभे राहिल्याचे चित्र दिसून येत आहे. आतापर्यंत प्रचारफेऱ्यांतून आणि उमेदवारी अर्ज दाखल करताना शक्तिप्रदर्शनातून काँग्रेसने विजयासाठी कंबर कसल्याचे दिसून येत आहे.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मतदारसंघातील काँग्रेसचे सर्व आमदार आणि कारवारचे पालकमंत्री यांनी सामूहिक प्रचार यंत्रणा राबविण्यास सुरुवात केली. सर्वांच्या संगनमताने प्रचाराचे नियोजन करण्यात येत असून कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील, हल्याळचे आमदार आर. व्ही. देशपांडे, कारवारचे आमदार सतीश सैल तसेच कारवारचे पालकमंत्री मंकाळू वैद्य, शिर्शीचे आमदार भिमान्ना नाईक यासह काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष साई गावकर, निवेदित अल्वा, शारदा शेट्टी, यल्लापूरचे माजी आमदार बी. एस. पाटील यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते जातीने प्रचार करत आहेत. भाजपचे आमदार हेब्बार यांचे सुपूत्र विवेक हेब्बार यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केल्याने काँग्रेसला बळकटी मिळाली आहे.कारवार मतदारसंघाचे खासदार अनंतकुमार हेगडे यांना भाजपने उमेदवारी नाकारल्याने ते नाराज आहेत. गेल्या महिन्याभरापासून त्यांनी कुठेही प्रचारात सक्रीयता दाखविलेली नाही. येत्या 28 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिर्शी  येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेला ते उपस्थित राहणार का, याबाबत शंका उपस्थित होत आहे. कारवार मतदारसंघात बदल हवा, अशीही चर्चा मतदारांतून व्यक्त होत आहे.