कर न भरल्याने काँग्रेसचे खाते बंद

मात्र, नंतर उपयोग करण्यासाठी सशर्त अनुमती वृत्तसंस्था / नवी दिल्ली प्राप्तिकराचा भरणा न केल्याने काँग्रेसचे बँक खाते बंद करण्याचा आदेश प्राप्तिकर विभागाने दिला आहे. मात्र, काँग्रेसने त्वरित अॅपेलेट लवादाकडे दाद मागितल्याने खाते सशर्त सुरू करण्याची अनुमती देण्यात आली आहे. काँग्रेसचे राज्यसभा खासदार विवेक तनखा यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. शुक्रवारी सकाळी प्राप्तिकर विभागाने काँग्रेसचे […]

कर न भरल्याने काँग्रेसचे खाते बंद

मात्र, नंतर उपयोग करण्यासाठी सशर्त अनुमती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
प्राप्तिकराचा भरणा न केल्याने काँग्रेसचे बँक खाते बंद करण्याचा आदेश प्राप्तिकर विभागाने दिला आहे. मात्र, काँग्रेसने त्वरित अॅपेलेट लवादाकडे दाद मागितल्याने खाते सशर्त सुरू करण्याची अनुमती देण्यात आली आहे. काँग्रेसचे राज्यसभा खासदार विवेक तनखा यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
शुक्रवारी सकाळी प्राप्तिकर विभागाने काँग्रेसचे बँक खाते बंद करण्याचा आदेश काढल्याने पक्षाची मोठीच धांदल उडाली होती. अनेक काँग्रेस नेत्यांनी यावर प्रतिक्रियाही व्यक्त करण्यास प्रारंभ केला होता. खाते बंद केले तरी आमचा संघर्ष सुरुच राहील, असे प्रतिपादन सध्या यात्रा करणारे राहुल गांधी यांनी बिहारमध्ये केले. खाते बंद करणे हे भारतीय जनता पक्षाचे कारस्थान आहे, असा आरोपही करण्यात आला होता. नंतर काँग्रेसने प्राप्तिकर विभागाच्या अॅपेलेट लवादाकडे याचिका सादर केली. लवादासमोर त्वरित सुनावणीही करण्यात आली.
तनखा यांनी केला युक्तिवाद
विवेक तनखा यांनी लवादासमोर युक्तिवाद करताना अनेक मुद्दे मांडले. खाते बंद ठेवल्यास काँग्रेस लोकसभा निवडणुकीत भाग घेऊ शकणार नाही. तसेच आपली कार्यालये किंवा पक्षाच्या इतर आस्थापनांचे वीजबिलही भरणे पक्षाला शक्य होणार नाही. कोणत्याही प्रकारचा खर्च होऊ शकणार नाही, अशी मांडणी त्यांनी केली. त्यानंतर लवादाने खाते अटींसह पुन्हा सुरू करण्याचा आदेश दिला.
लवादाचा निर्णय
काँग्रेसला तिचे मुख्य बँक खाते उपयोगात आणण्याचा पूर्ण अधिकार आहे. खात्याच्या उपयोग करण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. मात्र, खात्यात कोणत्याही वेळेस किमान 120 कोटी रुपयांची रक्कम असणे आवश्यक आहे. खाते बंद करण्यात आलेले नसून त्यावर कराच्या रकमेचा बोजा (लीन) ठेवण्यात आला आहे. त्यामुळे तेवढी रक्कम कायम खात्यामध्ये ठेवून उर्वरित रकमेचा या खात्याच्या माध्यमातून उपयोग करण्याचा अधिकार काँग्रेसला आहे, असा निर्णय लवादाने दिला. त्यामुळे कोंडीत सापडलेल्या काँग्रेसला दिलासा मिळाला.
का केले खाते बंद
काँग्रेसचे खाते बंद करण्याचा निर्णय प्राप्तिकर विभागाने विशिष्ट परिस्थितीत घेतला होता. काँग्रेसने तिच्या उत्पन्नावरचा प्राप्तिकर भरला नव्हता. 45 दिवसांचा  कालावधी नियमाप्रमाणे उलटून गेल्यानंतरही कर भरणा न केल्याने प्राप्तिकर विभागाने खाते बंद करण्याचा निर्णय घेऊन काँग्रेसला त्याची माहिती दिली होती. या निर्णयावर पक्षाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी टीकास्त्र सोडले होते. तथापि, नंतर या निर्णयाचे स्पष्टीकरण अॅपेलेट लवादाने स्पष्ट केल्यानंतर स्थिती स्पष्ट झाली.