निधी वाटपावरून स्थायी समितीच्या बैठकीत गोंधळ

दक्षिण भागातील एकाच प्रभागाला 30 लाख देण्यास विरोधकांचा आक्षेप बेळगाव : महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीच्या बैठकीत निधी वाटपावरून जोरदार वाद निर्माण झाला. काही प्रभागांमध्ये अधिक निधीची तरतूद करण्याबाबतचा प्रस्ताव येताच मनपातील विरोधी गटनेते मुज्जम्मील डोणी आणि नगरसेवक शाहीदखान पठाण यांनी त्याला जोरदार आक्षेप घेतला. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीच्या बैठकीत त्या प्रस्तावाबाबत कोणताच ठराव  […]

निधी वाटपावरून स्थायी समितीच्या बैठकीत गोंधळ

दक्षिण भागातील एकाच प्रभागाला 30 लाख देण्यास विरोधकांचा आक्षेप
बेळगाव : महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीच्या बैठकीत निधी वाटपावरून जोरदार वाद निर्माण झाला. काही प्रभागांमध्ये अधिक निधीची तरतूद करण्याबाबतचा प्रस्ताव येताच मनपातील विरोधी गटनेते मुज्जम्मील डोणी आणि नगरसेवक शाहीदखान पठाण यांनी त्याला जोरदार आक्षेप घेतला. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीच्या बैठकीत त्या प्रस्तावाबाबत कोणताच ठराव  मंजूर करण्यात आला नाही. मंगळवारी सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीची बैठक घेण्यात आली. अध्यक्षा वाणी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. अजेंड्यावर विविध विषय  घेण्यात आले होते. यामध्ये दक्षिण भागातील काही प्रभागांना अधिक निधी देण्याबाबत मंजुरी घेण्यासाठी चर्चा झाली. उत्तर भागातील प्रभागांसाठी साडेनऊ कोटींचा निधी राखीव ठेवला होता. तो निधी उत्तर भागातील नगरसेवकांना वाटून द्यावा, अशी मागणी विरोधी गटनेते मुज्जम्मील डोणी यांनी केली.
दक्षिण भागातील एका मतदारसंघाला 30 लाख रुपयांची तरतूद करण्याबाबत विषय घेण्यात आला. मात्र एकाच प्रभागाला इतका निधी देणे योग्य नाही. कामे अनेक असली तरी इतर नगरसेवकांवर अन्याय होणार आहे, असे विरोधी गटाच्या नेत्यांनी आणि नगरसेवकांनी सांगितले. मात्र सत्ताधारी गटातील काही नगरसेवकांनी उत्तर आणि दक्षिण असा भेदभाव न करता जी समस्या आहे ती सोडविण्यासाठी निधीची तरतूद करणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्यावर यापूर्वी दक्षिण विभागासाठी 10 कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे. तर उत्तर विभागातील साडेनऊ कोटी निधी तसाच आहे. तो निधी उत्तर विभागातील नगरसेवकांना विभागून द्यावा, अशी मागणी केली. जवळपास एक तास यावर चर्चा झाली. त्यामुळे या विषयावर पुढील बैठकीत निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले.
निधीबाबत कोणतीच माहिती नाही
स्थायी समितीच्या बैठकीमध्ये निधी वाटपावरून जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले. मात्र या निधीबाबत अधिकाऱ्यांकडून कोणताच खुलासा करण्यात आला नाही. त्यामुळे निधी आहे की नाही, हे देखील या बैठकीत स्पष्ट झाले नाही. केवळ विषयांवर चर्चा करण्याव्यतिरिक्त या बैठकीतून काहीच निष्पन्न झाले नाही. या बैठकीला उपायुक्त उदयकुमार तळवार यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.