प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा

पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची अधिकाऱ्यांना सूचना : महानगरपालिकेमध्ये विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक  बेळगाव : राष्ट्रीय महामार्ग, रिंगरोड, घनकचरा निर्मूलन प्रकल्प, 24 तास पाणीपुरवठा यासह जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या विकास योजनांसंदर्भातील कामे त्वरित सुरू करून वेळेत पूर्ण करण्यात यावीत. नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.जिल्ह्यातील प्रलंबित असलेल्या प्रमुख विकास योजनांचा आढावा घेण्यासाठी महानगरपालिकेमध्ये विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात […]

प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा

पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची अधिकाऱ्यांना सूचना : महानगरपालिकेमध्ये विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक 
बेळगाव : राष्ट्रीय महामार्ग, रिंगरोड, घनकचरा निर्मूलन प्रकल्प, 24 तास पाणीपुरवठा यासह जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या विकास योजनांसंदर्भातील कामे त्वरित सुरू करून वेळेत पूर्ण करण्यात यावीत. नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.जिल्ह्यातील प्रलंबित असलेल्या प्रमुख विकास योजनांचा आढावा घेण्यासाठी महानगरपालिकेमध्ये विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. मंजूर झालेल्या विकासकामांना स्थानिक नागरिकांचा विरोध होत असल्याचे दिसून आले आहे. अशा ठिकाणी नागरिकांचे मनपरिवर्तन करण्याची गरज आहे. आवश्यक ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवून कामे सुरू करण्यात यावीत, अशी सूचना पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली.
भूसंपादन आणि स्थानिकांचा विरोध यामुळे अनेक योजना गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबित आहेत. यामुळे नागरिकांना अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देणे शक्य झालेले नाही. यासाठी सुरू असलेली कामे त्वरित पूर्ण करण्यात यावीत, असे त्यांनी सांगितले. सध्या पावसाला सुरुवात झाल्याने संसर्गजन्य रोग वाढण्याची शक्यता आहे. यासाठी आरोग्य खात्याने योग्य ती खबरदारी घ्यावी. डेंग्यू, मलेरिया, कॉलरा नियंत्रणासाठी उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशी सूचना केली. जिल्हा पालकमंत्र्यांनी कित्तूर येथे घडलेल्या भ्रूणहत्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांनी कडक उपाययोजना राबविण्यात याव्यात. भ्रूणहत्या रोखण्यासाठी दक्ष रहावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
शहरामध्ये 24 तास पाणीपुरवठा करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांनी त्वरित पावले उचलावीत. कंत्राट घेतलेल्या कंपनीच्या पदाधिकाऱ्यांकडून पाणीपुरवठा संदर्भातील अहवाल घेऊन सूचना केल्या. यावेळी आमदार राजू सेठ यांनीही मनपा अधिकाऱ्यांच्या कामांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. जुना पी. बी. रोड, जिल्हा रुग्णालय येथील रस्ता आणि पाईपलाईन दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सदर कामे त्वरित पूर्ण करण्यात यावीत, अशी सूचना त्यांनी केली.
सरकारच्या सूचनेनंतर रेशनकार्ड वितरण
सध्या रेशनकार्ड वितरण प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. सरकारकडून परवानगी दिल्यानंतरच रेशनकार्ड वितरण करण्यात येतील. तसेच रेशनकार्डच्या आधारावरून आवश्यक ठिकाणी नवीन रेशन दुकानदारांना परवाना देण्यात यावा. वैद्यकीय उपचारासाठी गरजूंना बीपीएल कार्डे वितरित करण्यात यावीत, अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली. वैद्यकीय उपचारांसाठी 160 अर्ज प्रलंबित आहेत, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा खात्याचे उपसंचालक श्रीशैल कंकणवाडी यांनी दिली. या बैठकीला आमदार राजू सेठ, आमदार विश्वास वैद्य, बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, जिल्हाधिकारी नितेश पाटील,पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
पूर निवारण्यासाठी प्रशासन सज्ज
संभाव्य पूरपरिस्थिती निवारण करण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक तयारी करण्यात आली आहे. यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली.