रंग बरसे…

गळण्याआधी सळसळून ही रंग उधळती पाने आग लागल्यागत राळांची फाग खेळती राने अशी झाडंवेलीसुद्धा रंग खेळतायत. परदेशात दिसणारे किरमिजी, तांबडे, सोनेरी, पिवळे असे रंग आपल्याकडे नाही दिसत खरं तर. पण गळणाऱ्या पानांच्या पिवळ्या, करड्या रंगच्छटा काही कमी देखण्या नसतात बरं! आपल्याकडच्या वसंतोत्सवाला काही हजार वर्षांची समृद्ध परंपरा आहे. अगदी भास, कालिदासाच्या वेळेपासून रंग खेळतोय आपण. […]

रंग बरसे…

गळण्याआधी सळसळून ही रंग उधळती पाने
आग लागल्यागत राळांची फाग खेळती राने
अशी झाडंवेलीसुद्धा रंग खेळतायत. परदेशात दिसणारे किरमिजी, तांबडे, सोनेरी, पिवळे असे रंग आपल्याकडे नाही दिसत खरं तर. पण गळणाऱ्या पानांच्या पिवळ्या, करड्या रंगच्छटा काही कमी देखण्या नसतात बरं! आपल्याकडच्या वसंतोत्सवाला काही हजार वर्षांची समृद्ध परंपरा आहे. अगदी भास, कालिदासाच्या वेळेपासून रंग खेळतोय आपण. उत्तर भारतात होळी खेळतात. आपल्या महाराष्ट्रात खरी खेळतात ती रंगपंचमी. कोकणातील बहुतेक खेड्यातल्या ग्रामदेवता यानिमित्ताने अख्ख्या गावाची पर्सनली खबरबात घेतात.
खरंच प्रत्येक दारी पालखी जाते. आपला देव आपल्याला भेटायला आपल्या दारापर्यंत आला याची कोण अपूर्वाई वाटते ते कोकणी जीवच जाणतो.. काही गावांचं शिंपणं अमावास्येला होतं. म्हणजे त्यांचा होलिकोत्सव अमावास्येपर्यंत चालतो. कोणताही उत्सव, सण म्हटला की त्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, गाणं, नृत्य हे ओघानेच आलं. आपल्या शास्त्राrय संगीताच्या परंपरेत होळी इतकी कौतुकाची आहे की त्याला अनुसरून ‘होरी’ नावाचा एक स्वतंत्र गीत प्रकार शास्त्राrय, उपशास्त्राrय संगीतात आहे. ही होरी गाणं ही काही घराण्यांची आणि गायकांची खासियत आहे.
अर्थात ही परंपरा उत्तर भारतीय बाज घेऊन येते. होळी या विषयावर चित्रपट गीतं तर भरपूर आहेत. आणि ती अतिशय लोकप्रियही आहेत. पण जिथून त्या चित्रपटगीतांचा उगम होतो ते स्थान म्हणजे होरीगीत. यामध्ये धमार आणि ठुमरी या दोहोंचा समावेश होतो. जास्तकरून अवधी, भोजपुरी आणि ब्रज या बोलींमध्ये असलेल्या रचना काव्याला पूर्ण न्याय देऊन आणि विविध रागांचा मिश्र पद्धतीने टच देत नजाकतीने आणि बहारीने साजऱ्या केल्या जातात. शृंगार, प्रेम, छेडछाड, विरह, रुसवा आणि समजावणी, तर कधी विनवणी, प्रणय या रंगात रंगलेली ही ठुमरी फार रसपूर्ण आणि लालित्यपूर्ण असते.
या होरीच्या ठुमरीत काफी, पिलू, देस, गारा, पहाडी, भैरवी इत्यादी तुलनेने सरल प्रकृतीच्या आणि व्यक्तिमत्त्वाच्या हिशेबाने चंचल वा क्षुद्र समजल्या जाणाऱ्या रागांचा वापर जास्त प्रमाणात होतो. ठुमरीच कशाला चांगल्या घरंदाज चिजा आठवा. गाण्याच्या क्लासला जाणाऱ्या प्रत्येकाला भीमपलासीची
बिरज में धूम मचायो शाम
कैसे मैं सखि जावूँ अपने धाम
ही चीज शिकावी लागलेलीच असते किंवा
आज खेलो श्याम संग होरी
पिचकारी रंगभरी केसर की
ही काफीतली चीज प्रत्येकाला आठवत असतेच. आपल्या गळ्यात काडेचिराईतासारख्या वाटणाऱ्या या चिजांमध्ये काय सौंदर्य आहे ते उलगडून दाखवायला सिद्धहस्त गुरुच असावे लागतात. एखाद्या कार्यक्रमात याच चिजा अपूर्व रंगोत्सव करताना पाहिल्या की गाण्याची आणि होळीचीही खरी गंमत कळते. म्हणून ‘अबीर’ आणि ‘गुलाल’ हेही ‘उधळीत रंग येतात’ बरं का! नाथाघरी नाचणाऱ्या त्या पांडुरंगाला आपल्या पूर्वावतारात गोपगोपींसोबत केलेली रंगांची उधळण कशी विसरता येईल? अभिषेकी बुवांच्या ज्येष्ठ शिष्यांनी आपल्या गुरुजींविषयी ही आठवण सांगितली आहे की ते आपण सुरांचे रंग उधळूया असं म्हणत. रंगांचा मोह कुणाला सुटलाय? म्हणून तर त्या देवाला पांडुरंग, श्रीरंग म्हणतात. फार काय कृष्णाचं नावच मुळी त्याच्या रंगावरून ठेवलेलं आहे. कृष्ण म्हणजे अक्षरश: काळा. पण त्याने गवळणींना सप्तरंगात नाहवलं. आणि वैशिष्ट्या म्हणजे या रंगांच्या पलीकडे असणाऱ्या त्या सावळ्याचा रंग काही वेगळाच.
सांजघडी सातजणी पाणियाला गेल्या
सावल्यात हरवुनी वाट विसरल्या.
असं करून सोडणारा हा रंग. असा का असतो हा रंग? अशी कशी असते ही होळी? कृष्ण गोकुळ सोडून निघून गेल्यावर त्या गोपिकांना सगळे रंग सोडून गेले असतील का? की त्या कृष्णाच्या रंगात रंगून गेल्यामुळे त्यांना विरह जाणवणं बंद झालं असेल? ज्याचं अंतरंग रंगलंय त्याला बाह्य रंगाचं काय हो?
होळीचा बराचसा रंग हा श्रृंगाराचा. म्हणून मग
ना डारो रंग मोपे
तंग बसन, अंग अंग प्रकट होत
ब्रिजवासी देखत सब
सारखी चीज अक्षरश: कोसळत अंगावर येते. बागेश्रीचा मूड शृंगाराचाही आहे आणि तो किती तीव्र आणि उत्कट असतो हे या चिजेतून सामोरं येतं. पंडित प्रभाकर कारेकर यांनी ही चीज गायलीय. केवळ लाजवाब. जणुकाही निरनिराळ्या रंगांची बरसातच यातल्या तानांमधून होते. किंबहुना सुरुवातीलाच ना बरोबर सुरू होणारी ती अवरोही बोलतान तर कमाल आहे.
धमार आणि ठुमरी यातला धमार म्हणजे खरं तर होरी. पण तो प्रकार काहीसा एकसुरी वाटणारा. ठुमरी मात्र नावाप्रमाणेच ठुमकत येते. आणि त्यातली किती नावं घ्यावी? बनारस घराण्याच्या पंडिता सिद्धेश्वरी देवी, विदुषी गिरिजा देवी, विदुषी सविता देवी, पं. शोभाताई गुर्टू, मलिका ए गज़ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेगम अख्तर, द ग्रेट केसरबाई केरकर, शुभाताई मुद्गल या प्रत्येकीची वेगवेगळी वैशिष्ट्यां आहेत. आये श्याम मोसे खेलन होरी, कैसी ये धूम मचायी कन्हैया, आज बिरज में होली रे रसिया, उडत अबीर गुलाल लाली छायी रे, अशा कितीतरी रचना आज यूट्यूबवर उपलब्ध आहेत.
चित्रपट संगीत आणि होळी हे तर जुनंच बंधन आहे. होली आई रे आई रे, रंग बरसे भीगी चुनरवाली रंग बरसे, रंग रंग में, रंगी सारी गुलाबी चुनरियाँ रे, शोले मधलं होली के दिन दिल खिल जाते हैं, अलीकडचं होली खेले रघुवीरा अवध में आणि कितीतरी…ही न संपणारी यादी आहे. उत्सव रंगांचा, उत्सव वसंताच्या आगमनाचा, उत्सव एकत्र येण्याचा आणि एकमेकांत मिसळून जाण्याचा. आपणही रंगून जाऊया सुरांच्या रंगात, होळीच्या रंगांत..
-अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु