घटप्रभा केएचआयचे सीएमओ डॉ. घनश्याम वैद्य यांचे निधन

केएचआयच्या आवारात अंत्यसंस्कार : वैद्यकीय क्षेत्रावर शोककळा बेळगाव, घटप्रभा : वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत निरलसपणे सेवा बजावून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविलेले घटप्रभेच्या केएचआयचे सीएमओ (प्रमुख वैद्यकीय अधिकारी) डॉ. घनश्याम माधवराव वैद्य (वय 66) यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. स्वाती वैद्य, मुलगे डॉ. राहुल आणि डॉ. रोहित, सुना व नातवंडे तसेच बहीण डॉ. […]

घटप्रभा केएचआयचे सीएमओ डॉ. घनश्याम वैद्य यांचे निधन

केएचआयच्या आवारात अंत्यसंस्कार : वैद्यकीय क्षेत्रावर शोककळा
बेळगाव, घटप्रभा : वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत निरलसपणे सेवा बजावून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविलेले घटप्रभेच्या केएचआयचे सीएमओ (प्रमुख वैद्यकीय अधिकारी) डॉ. घनश्याम माधवराव वैद्य (वय 66) यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. स्वाती वैद्य, मुलगे डॉ. राहुल आणि डॉ. रोहित, सुना व नातवंडे तसेच बहीण डॉ. अलका असा परिवार आहे. डॉ. घनश्याम यांच्या निधनाने केएचआय परिवार, तसेच घटप्रभा गावात आणि संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. सायंकाळी केएचआयच्या आवारात डॉ. घनश्याम यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. घनश्याम यांचा जन्म घटप्रभा येथेच झाला. मुंबईच्या केईएममधून त्यांनी एमबीबीएस व एमएस ही पदवी घेतली. कोणत्याही परिस्थितीत आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग गोरगरिबांसाठी व्हावा, हे ध्येय त्यांनी प्रारंभापासूनच ठेवले होते. त्यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर 1984 मध्ये ते कर्नाटक आरोग्य धाम म्हणजेच केएचआय येथे दाखल झाले. घटप्रभा आणि परिसरातील लोकांचे जीवनमान लक्षात घेऊन कमीत कमी पैशामध्ये त्यांना उत्तम उपचार देण्याचे व्रत डॉ. घनश्याम यांनी अंगिकारले. आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांना उपचार करता यावेत, या हेतूने त्यांनी बेळगावमध्ये येऊन अनेक डॉक्टरांकडे शस्त्रक्रिया, भूल देणे यांचे ज्ञान घेतले. प्रशिक्षणही घेतले. त्यामुळे घटप्रभा आणि परिसरातील रुग्णांना त्याचा लाभ झाला. घटप्रभा येथे कमी खर्चात मिळणारे उपचार लक्षात घेऊन बेळगाव जिल्ह्यातूनही अनेक रुग्ण तेथे जातात. या सर्वांसाठी डॉ. घनश्याम म्हणजे देवदूतच होते. आजवर त्यांनी 60 हजारहून अधिक वेगवेगळ्या शस्त्रक्रिया केल्या आहेत.
वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांना सर्जरीचे आकलन व्हावे, यासाठी त्यांनी 1980 मध्येच जनरल सर्जरी कॅसेट क्लिनिक संकल्पना राबविली होती. वैद्यकीय शाखेच्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा उपयोग व्हावा, यासाठी त्यांनी आपल्या या ध्वनी व चित्रफिती विनामूल्य अपलोड केल्या होत्या. वैद्यकीय शाखेच्या अभ्यासक्रमावरील त्यांचे पुस्तक म्हणजे प्रत्येक वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यासाठी अत्यंत मार्गदर्शक ठरले. ‘द आर्ट ऑफ बँडेजिंग अॅण्ड जीपी क्लिनिक’ या विषयावर त्यांनी डीव्हीडी तयार केली. तसेच ‘क्लिनिकल एक्झामिनेशन इन सर्जरी’ या विषयावरही डीव्हीडी उपलब्ध करून दिली. डॉक्टरांसाठी राष्ट्रीय दूरदर्शनवर सलग दोन वर्षे त्यांनी प्रश्नमंजुषा उपक्रम राबविला. वैद्यकीय सेवा बजावतानासुद्धा आपली रसिकता डॉ. घनश्याम यांनी कायम जपली. बेळगावच्या लोकमान्य ग्रंथालयामध्ये होणाऱ्या अनेक कार्यक्रमांना ते आवर्जून येत. इतकेच नव्हे तर या ग्रंथालयाचे सभासदत्व त्यांनी स्वीकारले होते आणि घटप्रभाहून बेळगावला येऊन पुस्तके निवडून ते घेऊन जात. वैद्यकीय सल्ल्यासाठी आलेल्या कोणालाही त्यांनी विन्मुख पाठविले नाही. त्यामुळे आजसुद्धा बेळगावसह वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांच्या पत्नी डॉ. स्वाती या स्त्राrरोग व प्रसूतीतज्ञ असून त्यांच्या दोन्ही सुना वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करत आहेत. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचाच आदर्श समोर ठेवत त्यांची दोन मुलेसुद्धा केएचआय येथेच सेवा बजावत आहेत.
सचोटीने, नि:स्वार्थीपणे बजावली वैद्यकीय सेवा
डॉ. घनश्याम वैद्य यांच्या निधनाने वैद्यकीय क्षेत्राबरोबरच रुग्णांचेही नुकसान झाले आहे. अत्यंत सचोटीने आणि निष्ठेने डॉ. घनश्याम यांनी नि:स्वार्थीपणे वैद्यकीय सेवा बजावली. त्यांच्यासारख्या डॉक्टरांची समाजाला नितांत गरज आहे. खूप लवकर त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. त्यांना ‘भारत लाईव्ह न्यूज मीडिया’ व लोकमान्य परिवारातर्फे विनम्र श्रद्धांजली.
  – डॉ. किरण ठाकुर