हुशार सायबर गुन्हेगार अन् रजिस्टर पत्रांचा आधार!
नामवंत कंपन्यांच्या नावे फसवणुकीचा प्रकार : कार्ड स्क्रॅच करताच बक्षिसाचे आमिष, सावधगिरी आवश्यक
बेळगाव : दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए, असे म्हणतात. गुन्हेगारी थोपविण्यासाठी जसे पोलीस यंत्रणा पुढे सरसावते. कधी कधी गुन्हेगार त्यांच्यापेक्षाही एक पाऊल पुढे ठेवतात. सायबर गुन्हेगारांच्या उपद्रवाने त्रस्त असलेल्या नागरिकांना आता नामवंत कंपन्यांच्या नावे लकी ड्रॉ च्या माध्यमातून ठकविण्यात येत आहे. बेळगाव येथील अनेकांना रजिस्टर्ड पोस्टच्या माध्यमातून सर्टिफिकेट ऑफ अॅचिव्हमेंट या नावे प्रमाणपत्र पाठविण्यात आली आहेत. या प्रमाणपत्रामध्ये स्क्रॅच कार्डचा समावेश असून कंपनीच्या वर्धापन दिनानिमित्त बक्षिसासाठी तुमची निवड झाली आहे. कार्ड स्क्रॅच करून जे बक्षीस लागेल त्याविषयी आमच्या हेल्पलाईन नंबरला माहिती द्या, असे सांगत ठकविण्याचा उद्योग सुरू झाला आहे.
बेळगाव येथील राजू सुतार यांनाही पत्र आले होते. बुधवार दि. 12 जून रोजी त्यांच्या नावे रजिस्टर पोस्ट आले. त्यांनी ते उघडून बघितल्यानंतर ऑनलाईन शॉपिंगच्या मिशो कंपनीच्या नावे हे पत्र होते. कंपनीच्या वर्धापन दिनानिमित्त काही ठरावीक ग्राहकांची बक्षिसासाठी निवड करण्यात आली आहे. लकी ड्रॉच्या माध्यमातून ही निवड होणार आहे. यामध्ये सहभागी व्हा, असे ते पत्र होते. पत्र उघडून त्यांनी कार्ड स्क्रॅच केले असता ‘तुम्ही 12 लाख 80 हजार रुपये जिंकलात’ असे त्या कार्डमध्ये लिहिले होते. रक्कम मिळविण्यासाठी आमच्या हेल्पलाईनशी संपर्क साधा किंवा क्युआर कोड स्कॅन करा, असा सल्ला देण्यात आला होता. राजू यांनी हेल्पलाईनशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी काही ठरावीक रक्कम आमच्या खात्यावर जमा करा, तुमची कागदपत्रे पाठवून द्या. मग तुमचे बक्षीस तुम्हाला दिले जाईल, असे सांगितले. फसवणुकीचा हा प्रकार असल्याचे लक्षात येताच त्यांनी पुढे त्यांच्याशी संपर्क साधणे बंद केले. बेळगावसह कर्नाटकातील अनेक शहरातील नागरिकांना अशी पत्रे येत आहेत. कार्ड स्क्रॅच केल्यानंतर कोणाच्या नावे 12 लाख 80 हजार तर आणखी कोणाच्या कार्डमध्ये 14 लाखाहून अधिक बक्षीस लागल्याचा उल्लेख असतो. सुरुवातीला केवळ 501 रुपये भरून प्रक्रियेला सुरुवात करा, असे सांगत हे भामटे फसवणूक करतात.
बेळगावसह मंगळूर जिल्ह्यातही फसवणूक
बेळगावबरोबरच मंगळूर जिल्ह्यातही असे प्रकार वाढले आहेत. उप्पीनअंगडी येथील जी. एम. मुस्तफा यांच्या पत्नीच्या नावेही एक रजिस्टर पोस्ट आले होते. त्यांनी ते उघडून पाहिले असता कंपनीचा वर्धापन दिन व त्या पार्श्वभूमीवर बक्षिसासाठी तुमची निवड, असा उल्लेख होता. कार्ड स्क्रॅच केल्यानंतर 14 लाख 51 हजार रोख रक्कम तुम्ही जिंकलात, असे त्या कार्डमध्ये लिहिले होते. त्यांनी या लकी ड्रॉ वर विश्वास ठेवला नाही. तरीही बघू तरी काय प्रकार आहे, या उत्सुकतेने पत्रामध्ये दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता त्यांनाही पैसे भरण्याचा सल्ला देण्यात आला. त्यामुळे त्यांनी त्यांच्याशी संपर्क बंद केला. बेळगाव येथील राजू सुतार यांनी तर मिशो कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून कंपनीने अशा योजना काढल्या आहेत का? या विषयी विचारणाही केली. मात्र, खरेदीच्या वेळी आम्ही काही प्रमाणात सवलत देतो. लकी ड्रॉ योजना आम्ही काढलेली नाही, असे उत्तर मिळाले.
सर्टिफिकेटवर कोलकात्याचा पत्ता
बेळगावात मोठ्या प्रमाणात कंपन्यांच्या नावे रजिस्टर पोस्ट आले असून या सर्टिफिकेटवर कोलकात्याचा पत्ता देण्यात आला आहे. शेकडो बक्षिसे आहेत, पण तीन प्रमुख बक्षिसे आम्ही देणार आहोत. कार, रोख रक्कम यांचा समावेश आहे, असे सांगत नामवंत कंपन्यांच्या नावे सर्वसामान्य नागरिकांच्या पत्त्यावर पत्रे पाठवून त्यांना फसवण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. सायबर गुन्हेगारी पाठोपाठ नागरिकांना ठकविण्यासाठी गुन्हेगारांनी नामी शक्कल लढविली असून आता त्यांच्या घरी पत्रे पाठवून त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्यात येत आहे. अशा गुन्हेगारांच्या कारवायांपासून नागरिकांनी सावध राहिले तरच फसवणूक टाळता येणार आहे, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. बेळगाव परिसरात सध्या पत्रांचा वर्षाव सुरू असला तरी या टोळीने नेमक्या किती जणांना गंडवले आहे? याचा उलगडा झाला नाही.
Home महत्वाची बातमी हुशार सायबर गुन्हेगार अन् रजिस्टर पत्रांचा आधार!
हुशार सायबर गुन्हेगार अन् रजिस्टर पत्रांचा आधार!
नामवंत कंपन्यांच्या नावे फसवणुकीचा प्रकार : कार्ड स्क्रॅच करताच बक्षिसाचे आमिष, सावधगिरी आवश्यक बेळगाव : दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए, असे म्हणतात. गुन्हेगारी थोपविण्यासाठी जसे पोलीस यंत्रणा पुढे सरसावते. कधी कधी गुन्हेगार त्यांच्यापेक्षाही एक पाऊल पुढे ठेवतात. सायबर गुन्हेगारांच्या उपद्रवाने त्रस्त असलेल्या नागरिकांना आता नामवंत कंपन्यांच्या नावे लकी ड्रॉ च्या माध्यमातून ठकविण्यात येत आहे. बेळगाव येथील अनेकांना रजिस्टर्ड पोस्टच्या माध्यमातून सर्टिफिकेट ऑफ अॅचिव्हमेंट या नावे […]
