मुख्यमंत्र्यांनी चौकशी सुरुच ठेवावी : डिलायला

मुख्यमंत्र्यांनी चौकशी सुरुच ठेवावी : डिलायला

म्हापसा : पूजा शर्मा यांनी आगरवाडेकर कुटुंबियांचे घर मोडले. या अन्यायाविरोधात तमाम गोमंतकीय पेटून उठला. मुख्यमंत्री घटनास्थळी दाखल झाले आणि घर पुन्हा बांधून देण्याचे आश्वासन दिले. प्रकरण मुख्यमंत्र्यांनी सीबीआयकडे सोपविले. घर बांधण्याची प्रक्रिया सुरु झाली. मात्र आता ऐकू येते की आगरवाडेकर कुटुंबियाने हे प्रकरण आपापसात मिटविले आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरुच ठेवावी, अशी मागणी शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो यांनी आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
सारे गोमंतकीय आगरवाडेकर कुटुंबियांसमवेत असताना आगरवाडेकर कुटुंबीय  तक्रार मागे कशी घेऊ शकतात? मात्र मुख्यमंत्री हे प्रकरण मागे घेणार नाहीत, असेही लोबो म्हणाल्या. पूजा शर्मा कोण आहे, याची माहिती सर्व गोमंतकीयांना मिळाली पाहिजे. तिला अटक झाली पाहिजे. मात्र आगरवाडेकर कुटुंबीय शर्माकडे हातमिळवणी करते हे योग्य नाही. यात मोठ्या प्रमाणात देवाण-घेवाण झाली असेल, तिचीही चौकशी व्हायला हवी. गरज भासल्यास आगारवाडेकर कुटुंबियांच्या माणसांचीही चौकशी होणे गरजेचे आहे. आता हे प्रकरण वेगळ्या दिशेने चालले आहे, असेही त्या म्हणाल्या.
पंचायतीच्या बैठकीत घेणार निर्णय
पूजा शर्माशी हातमिळवणीचा निर्णय झाला तेव्हा आगरवाडेकर कुटुंबियांनी पंचायत, आमदार, पत्रकारांना विश्वासात का घेतले नाही असा सवाल आसगावचे सरपंच हनुमंत नाईक यांनी उपस्थित केला. आगरवाडेकर कुटुंबियांवर कुणी दबाव आणला? याचा शोध मुख्यमंत्र्यांनी बारकाईने घ्यावा. येत्या 29 जून रोजी पंचायतीची बैठक आहे त्यावेळी आम्ही निर्णय घेणार आहोत. हे बांधकाम मोडण्यास पंचायतीचा परवाना का घेतला नाही? वीज तोडण्यासाठी त्या खात्याची परवानगी का घेतली नाही? याबाबत आम्ही त्यांच्या विऊद्ध तक्रार नोंद करणार आहेत. वीज खात्यानेही पूजा शर्मावर तक्रार दाखल करावी.