चिकनने खाल्ला भाव, खवय्यांचा ताव

थर्टी फर्स्टसाठी मांसाहाराची उच्चांकी विक्री बेळगाव : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी थर्टी फर्स्ट धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने ओल्या पार्ट्यांना रंग चढला होता. परिणामी शहरात मोठ्या प्रमाणात मांसाहाराची खरेदी-विक्री झाली. विशेषत: चिकन, मटण, अंडी आणि माशांची विक्री झाली. त्यामुळे शहरात रविवारी उच्चांकी उलाढाल झाल्याचीही माहिती मिळाली आहे. रविवारी सुटी असल्याने सकाळपासूनच घरगुती जेवणावळीसाठी आणि पार्ट्यांसाठी […]

चिकनने खाल्ला भाव, खवय्यांचा ताव

थर्टी फर्स्टसाठी मांसाहाराची उच्चांकी विक्री
बेळगाव : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी थर्टी फर्स्ट धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने ओल्या पार्ट्यांना रंग चढला होता. परिणामी शहरात मोठ्या प्रमाणात मांसाहाराची खरेदी-विक्री झाली. विशेषत: चिकन, मटण, अंडी आणि माशांची विक्री झाली. त्यामुळे शहरात रविवारी उच्चांकी उलाढाल झाल्याचीही माहिती मिळाली आहे. रविवारी सुटी असल्याने सकाळपासूनच घरगुती जेवणावळीसाठी आणि पार्ट्यांसाठी लगबग सुरू होती. काहींनी कौटुंबिक जेवणावळीचे नियोजन केले होते. तर काहींनी रात्री ओल्या पार्ट्या धुमधडाक्यात केल्या. त्यामुळे शहर आणि उपनगरात चिकन आणि मटणाची मागणी वाढली होती. मटणाच्या तुलनेत चिकनची खरेदी अधिक प्रमाणात झाल्याची माहितीही चिकनविक्रेत्यांनी दिली. त्याचबरोबर हॉटेल, धाबे, रेस्टॉरंट आणि इतर ठिकाणी रात्री उशिरापर्यंत मांसाहारी जेवणावळी सुरू होत्या. त्यामुळे रविवारी मांसाहाराच्या मागणीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली होती. शहर, उपनगरात साधारण दीडशेहून अधिक मटण दुकाने आणि तीनशेहून अधिक चिकनविक्रेते आहेत. त्याचबरोबर दोन फिश मार्केट आहेत. अंड्यांची विक्री करणारी दुकानेही अधिक आहेत. त्यामुळे या साऱ्या विक्रेत्यांकडून रविवारी सुपरसंडे विक्रीचा उच्चांक नोंदविला गेला. विशेषत: सर्वाधिक चिकनची विक्री झाल्याचेही समजते. शहरात मटण 700 रुपये किलो, चिकन 190 रुपये किलो, अंडी शेकडा 610 रुपये तर बांगडा 170 रुपये किलोप्रमाणे विक्री सुरू आहे. सध्या थंडीत वाढ झाल्याने चिकनची विक्री वाढू लागली आहे. एकूणच थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी मोठ्या प्रमाणात मांसाहारावर ताव मारल्याचेही दिसत आहे.
मटणाच्या तुलनेत चिकनची विक्री अधिक
शहरात मटण आणि चिकन विक्रेत्यांची संख्या अधिक आहे. थर्टी फर्स्टला मटणाच्या तुलनेत चिकनची विक्री अधिक झाली आहे. सकाळपासूनच मटण आणि चिकनची विक्री सुरू होती. त्यामुळे उलाढालही वाढली होती. पार्ट्यांसाठी तरुणाईकडून मांसाहाराची खरेदी अधिक प्रमाणात झाली.
-उदय घोडके (मटण शॉप असोसिएशन अध्यक्ष)