छत्रपती शिवरायांचे कार्य अतुलनीय

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : राज्यातील सर्वात मोठा अश्वाऊढ पुतळा पर्वरीत,प्रशांत खेडेकर यांच्याकडून पुतळ्याची कलाकृती पणजी : छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य हे अतुलनीय असे होते. त्यांचे कार्य हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नव्हते. तर त्यांचे कार्य गोवा, कर्नाटक, कारवार व इतर राज्यांतही पसरले होते. देशातील अठरा पगड जातींना सोबत घेऊन जाणारे नेतृत्व म्हणजे […]

छत्रपती शिवरायांचे कार्य अतुलनीय

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : राज्यातील सर्वात मोठा अश्वाऊढ पुतळा पर्वरीत,प्रशांत खेडेकर यांच्याकडून पुतळ्याची कलाकृती
पणजी : छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य हे अतुलनीय असे होते. त्यांचे कार्य हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नव्हते. तर त्यांचे कार्य गोवा, कर्नाटक, कारवार व इतर राज्यांतही पसरले होते. देशातील अठरा पगड जातींना सोबत घेऊन जाणारे नेतृत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते, असे उद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले. पर्वरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यातील सर्वात मोठ्या ठरलेल्या अश्वाऊढ पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी पर्यटनमंत्री रोहन खंवटे, राज्यसभा खासदार सदानंद तानावडे, मच्छीमारमंत्री नीळकंठ हळर्णकर, आमदार कार्लुस फेरेरा उपस्थित होते. सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास  हा संपूर्ण जगात वर्णिला जातो. छत्रपती शिवाजी राजे हे केवळ एका जाती किंवा धर्मापुरते मर्यादित नव्हते. शिवरायांची राजनिती आजही देशासाठी मार्गदर्शक ठरत आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी शासकीय स्वऊपात या ठिकाणी शिवाजी जयंती साजरी करण्यास जी संमती दिली त्याचे आपण स्वागत करतो. तसेच पर्यटनमंत्री खंवटे यांनी ज्या प्रयत्नाने पर्वरीत शिवजयंतीला सुरवात केली आहे, त्यांचे हे कार्य इतिहासात नोंद घेतली जाईल, असेही ते म्हणाले.
प्रशांत खेडेकर, लोपीस यांचा सन्मान
पर्वरीत अश्वाऊढ पुतळा साकारण्यामागे गोमंतकीय सुपूत्र प्रशांत खेडेकर यांची कलाकृती कौतुकास पात्र ठरली आहे. त्याचबरोबर कांदोळीचे ख्रिस्ती बांधव जोजेफ लोपीस यांनी शिवकालीन शस्त्रे आणि नाण्यांचे प्रदर्शन भरविण्यात जो पुढाकार घेतला त्याबद्दल मुख्यमंत्री सावंत यांनी या दोघा कलाकारांचे कौतुक करून त्यांचा व्यासपीठावर सन्मान केला.
पर्वरी झाली शिवमय
पर्वरी येथे प्रथमच शिवजयंती सोहळा पर्यटन खात्यातर्फे साजरा करण्यात आला. शिवजयंतीनिमित्त 18 व 19 फेब्रुवारी असे दोन दिवस भरगच्च कार्यक्रम आयोजित केल्याने परिसर शिवमय झाला होता. दिंडी पथक, पोवाडे, ढोल-ताशांचा कडकडाट यामुळे पर्वरीत शिवजयंती सोहळा थाटात साजरा झाला.
छत्रपती शिवाजी महाराज चौक
ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला आहे, त्याचे छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नामकरण करण्यात येत असल्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांचा पत्रव्यवहारासाठी पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक असा करण्यात येईल आणि त्याला शासकीय मान्यता घेण्यात आल्याचेही मंत्री खंवटे यांनी सांगितले.