राजकीय नेत्यांसह सर्वसामान्यांच्या घेतल्या छत्रपतींनी भेटीगाठी

राजकीय नेत्यांसह सर्वसामान्यांच्या घेतल्या छत्रपतींनी भेटीगाठी

जाहिर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांनी राजकीय नेत्यांसह शहरातील शिवाजी पेठ, मंगळवार पेठ यासह विविध भागातील मतदार, शिक्षक, प्राध्यापकांच्या भेटी घेत प्रचार केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी न्यू पॅलेसवर शाहू छत्रपतींची भेट घेउन कोल्हापूरसह राज्यात इंडिया आघाडीला घवघवीत यश मिळणार आहे, असा विश्वास व्यक्त केला.
जाहिर प्रचाराचा शेवटचा दिवस होता. शनिवारी राजारामपुरी व राधानगरी येथे भव्य रॅली काढण्यात आल्या. त्यामुळे रविवारी रॅली न काढता भेटीगाठीवर भर देण्यात आले. दिवसभर शाहू छत्रपतींनी मान्यवरांसह सर्वसामान्यांच्या भेटी घेतल्या. रविवारी सकाळी नउ वाजता गांधीनगर येथील सिंधी समाजातील मंदिराला भेट देउन गांधीनगर मधील नागरिकांशी चर्चा केली. त्यानंतर गांधीनगरमधील व्याप्रायांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करुन काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले. सकाळी साडेदहा वाजता कोल्हापूरातील एका हॉटेलमध्ये शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर होते.
दिवसभर शाहू छत्रपतींना भेटण्यासाठी अनेक समाजातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. अपंगाच्या प्रहार संघटनेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. दुपारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भेट घेतली. यावेळी पटोले यांनी शाहू छत्रपतींना कोल्हापूर लोकसभा मतदार संघात मोठा प्रतिसाद मिळला असून ते विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला. शाहू छत्रपती यांची उमेदवारी काँग्रेसने लवकर जाहीर केल्याने विदर्भात काँग्रेसला चांगला फायदा झाला. महाराष्ट्रात इंडिया आघाडीला घवघवीत यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार सतेज पाटील, आमदार पी.एन पाटील, आमदार जयंत आसगांवकर, आमदार राजीव आवळे, मालोजीराजे, काँग्रेसचे निरीक्षक आबा दळवी उपस्थित होते.
जाहीर प्रचाराची मुदत संपल्यानंतर सायंकाळच्या सत्रात शाहू छत्रपतींना भेटण्यासाठी शहरातील अनेक भागातून शिष्टमंडळे आली होती. त्यानंतर शाहू छत्रपतींनी शहरातून फेरफटका मारला. त्यांनी उभा मारुती चौक, मंगळवार पेठ मिरजकर तिकटी, जुना बुधवार पेठ या परिसराला भेटी दिल्या.