चेन्नईचा राजस्थानला दणका
चेपॉकच्या संथ खेळपट्टीवर 5 गड्यांनी विजय : प्ले ऑफच्या आशाही कायम
वृत्तसंस्था/ चेन्नई
येथील एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सचा 5 विकेट्सनी पराभव करत प्ले ऑफच्या आशा कायम ठेवल्या आहेत. रविवारी झालेल्या या लढतीत राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 बाद 141 धावा केल्या. यानंतर विजयासाठीचे लक्ष्य चेन्नईने 18.2 षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. चेपॉकच्या संथ खेळपट्टीवर 26 धावांत 3 बळी घेणाऱ्या चेन्नईच्या सिमरजीत सिंगला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
राजस्थानच्या 142 धावांचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात खराब झाली. रचिन रवींद्रच्या रुपात चेन्नईला पहिला धक्का बसला. रवींद्रने 18 चेंडूंत 27 धावा केल्या. यानंतर डॅलिर मिचेलही 22 धावांवर बाद झाला. चहलने त्याची विकेट घेतली. सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर अनुभवी मोईन अली व शिवम दुबेही फार काळ मैदानात टिकले नाही. मोईन अलीला नांद्रे बर्गरने 10 धावांवर तर दुबेला 18 धावांवर अश्विनने बाद केले. रवींद्र जडेजाही (5 धावा) स्वस्तात बाद झाल्याने घरच्या मैदानावर चेन्नईवर पराभवाचे संकट होते. पण कर्णधार ऋतुराज गायकवाडने एकट्याने किल्ला लढवला व संघाच्या विजयाचा मार्ग सुकर केला. ऋतुराजने 41 चेंडूत 1 चौकार व 2 षटकारासह नाबाद 42 धावांचे योगदान दिले. त्याला समीर रिझवीने नाबाद 15 धावा करत चांगली साथ दिली. या जोरावर चेन्नईने विजयी आव्हान 18.2 षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यातच पूर्ण केले. राजस्थानकडून आर अश्विनने 2 तर नांद्रे बर्गर व चहलने प्रत्येकी एक एक गडी बाद केला.
राजस्थानच्या फलंदाजांचा फ्लॉप शो, रियान पराग एकटा नडला
नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना राजस्थानची सुरुवात काही खास नव्हती. यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलरने पहिल्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी केली. धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात यशस्वी जैस्वालने सातव्या षटकात आपली विकेट गमावली. सिमरजीतने जैस्वालला आपला शिकार बनवले. यशस्वीने 21 चेंडूंत 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 24 धावा केल्या. यानंतर संथ गतीने खेळत असलेला जोस बटलरही नवव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने 21 धावा केल्या. यानंतर कर्णधार संजू आणि रियान पराग यांनी तिसऱ्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी केली. सिमरजीत सिंगने 15 व्या षटकात ही भागीदारी तोडली आणि सॅमसनला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. राजस्थानच्या कर्णधाराने 19 चेंडूत 15 धावा केल्या.
आक्रमक खेळणाऱ्या ध्रुव जुरेलने 18 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 28 धावा केल्या. शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर तुषार देशपांडने त्याला बाद केले. यानंतर पुढच्या चेंडूवर शुभम दुबे गोल्डन डकवर बाद झाला. रियन पराग आणि रविचंद्रन अश्विन अखेरपर्यंत नाबाद परतले. परागने 35 चेंडूत नाबाद 47 धावांचे योगदान दिले. यामुळे राजस्थानला 20 षटकांत 5 बाद 141 धावापर्यंत मजल मारता आली. चेन्नईकडून सिमरजीत सिंगने 3 तर तुषार देशपांडेने 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
राजस्थान रॉयल्स 20 षटकांत 5 बाद 141 (यशस्वी जैस्वाल 24, जोस बटलर 21, संजू सॅमसन 15, रियान पराग नाबाद 47, ध्रुव जुरेल 28, अश्विन नाबाद 1, सिमरजीत सिंग 26 धावांत 3 बळी, तुषार देशपांडे 2 बळी).
चेन्नई सुपर किंग्ज 18.2 षटकांत 5 बाद 145 (रचिन रवींद्र 27, ऋतुराज गायकवाड नाबाद 42, डॅरिल मिचेल 22, दुबे 18, रिझवी नाबाद 15, आर अश्विन 2 तर नांद्रे बर्गर व चहल एक बळी).
महत्वाचा बॉक्स
प्ले ऑफसाठी राजस्थानला आणखी प्रतीक्षा
रविवारी झालेल्या सामन्यात राजस्थानवर विजय मिळवत चेन्नईने प्लेऑफच्या शर्यतीत स्वत:ला कायम ठेवले असून गुणतालिकेत देखील तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. पराभवामुळे राजस्थानची बाद फेरी गाठण्याची प्रतीक्षा वाढली आहे. सध्याच्या घडीला चेन्नईचा संघ 13 सामन्यांत 7 विजय आणि 6 पराभवांसह 14 गुणांसह तिसऱ्या स्थानी तर राजस्थान संघ 12 सामन्यांत 8 विजय आणि 4 पराभवांसह 16 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. राजस्थानचा संघ हा सामना जिंकण्यात यशस्वी ठरला असता, तर केकेआरनंतर या हंगामात प्लेऑफमध्ये पोहोचणारा दुसरा संघ ठरला असता, परंतु चेन्नईने त्यांची प्रतीक्षा वाढवली. राजस्थानचे अद्याप दोन सामने बाकी आहेत, या दोनपैकी एक सामना जिंकत त्यांना प्लेऑफमध्ये जाण्याची संधी असेल. दुसरीकडे चेन्नईचा एक सामना बाकी असून हा सामना त्यांना जिंकावाच लागणार आहे. या सामन्यात त्यांचा पराभव झाला तर इतर संघाच्या कामगिरीवर त्यांचे प्ले ऑफचे भविष्य अवलंबून असेल.
Home महत्वाची बातमी चेन्नईचा राजस्थानला दणका
चेन्नईचा राजस्थानला दणका
चेपॉकच्या संथ खेळपट्टीवर 5 गड्यांनी विजय : प्ले ऑफच्या आशाही कायम वृत्तसंस्था/ चेन्नई येथील एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सचा 5 विकेट्सनी पराभव करत प्ले ऑफच्या आशा कायम ठेवल्या आहेत. रविवारी झालेल्या या लढतीत राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 बाद 141 धावा केल्या. यानंतर विजयासाठीचे लक्ष्य चेन्नईने 18.2 […]