चेन्नईचा सामना आज लखनौशी, पराभवाच्या परतफेडीची संधी

वृत्तसंस्था/ चेन्नई गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जची गाठ आज मंगळवारी लखनौ सुपर जायंट्सशी पडणार असून घरच्या भूमीतील या सामन्यात मागच्या पराभवाचे उट्टे काढण्यास सीएसके उत्सुक असेल. दोन्ही संघ गुणतालिकेत झेप घेण्यासाठी धडपडत आहेत. गेल्या आठवड्यात लखनौमध्ये दोन्ही संघांचा सामना झाला असता के. एल. राहुल आणि क्विंटन डी कॉक यांनी केलेल्या सलामीच्या विक्रमी भागीदारीने सारा फरक घडवून […]

चेन्नईचा सामना आज लखनौशी, पराभवाच्या परतफेडीची संधी

वृत्तसंस्था/ चेन्नई
गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जची गाठ आज मंगळवारी लखनौ सुपर जायंट्सशी पडणार असून घरच्या भूमीतील या सामन्यात मागच्या पराभवाचे उट्टे काढण्यास सीएसके उत्सुक असेल. दोन्ही संघ गुणतालिकेत झेप घेण्यासाठी धडपडत आहेत. गेल्या आठवड्यात लखनौमध्ये दोन्ही संघांचा सामना झाला असता के. एल. राहुल आणि क्विंटन डी कॉक यांनी केलेल्या सलामीच्या विक्रमी भागीदारीने सारा फरक घडवून आणला होता आणि चेन्नईला पराभूत व्हावे लागले होते.
 
सुपर किंग्जसाठी कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबे यांनी मोठ्या प्रमाणात धावा केल्या आहेत. सलामीवीर रचिन रवींद्रचा फॉर्म हा चिंतेचा विषय बनल्याने सीएसकेने अजिंक्य रहाणेला सलामीवीर म्हणून पदोन्नती दिली असून परिणामी गायकवाडने स्वत:ला तिसऱ्या स्थानावर ढकलले आहे. सलामीवीर म्हणून आतापर्यंत तीन वेळा 50 पेक्षा जास्त धावा काढलेल्या गायकवाडला ताज्या फेरबदलाला चिकटून राहायचे की, स्वत:ला पुन्हा सलामीला आणायचे हे ठरविणे अवघड जाईल.
 
मात्र सीएसकेच्या गोलंदाजी विभागाचा राहुल आणि क्विंटन या जोडीसमोर कस लागणार आहे. युवा मथीशा पाथिराना हा त्यांचा सर्वोत्तम गोलंदाज राहिलेला असला, तरी वेगवान गोलंदाज दीपक चहर, तुषार देशपांडे आणि मुस्तफिझूर रेहमान यांच्यावरही बरेच काही अवलंबून असेल. डावखुरा फिरकीपटू जडेजाने खूप संघर्ष केला आहे आणि त्याला चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल.
लखनौसाठी फलंदाजी ही एक समस्या असली, तरी त्यांची आघाडीची फळी चमकली, तर ती किती विनाशकारी ठरू शकते, हे त्यांनी दाखवून दिले आहे. राहुल आणि क्विंटन यांना पुन्हा एकदा चेपॉकवर धडाका दाखवावा लागेल. निकोलस पूरनने आवश्यकतेनुसार फटकेबाजी केलेली आहे आणि लखनौ त्याच्यावर खूप अवलंबून आहे. गोलंदाजीत युवा वेगवान गोलंदाज मयंक यादवच्या पुनरागमनाची आशा संघ बाळगून असेल. त्याला दुखापतीमुळे दोन सामने बाहेर बसावे लागलेले आहे.
लखनौचे वेगवान गोलंदाज मोहसिन खान आणि यश ठाकूर यांनी सुऊवातीला सीएसकेला रोखण्याच्या बाबतीत चांगली कामगिरी केली. परंतु अंतिम षटकांमध्ये ते धोनीच्या तडाख्यात सापडले. त्यांना त्यावर तोडगा काढावा लागेल. मॅट हेन्रीला लखनौतर्फे पदार्पण करताना एकही बळी मिळू शकला नाही आणि तो स्वत:ला सिद्ध करण्यास उत्सुक असेल. फिरकी विभागात कृणाल पंड्याच्या दोन बळींनी मधल्या षटकांमध्ये खूप फरक घडवून आणला होता आणि त्याला आजही पुन्हा पुढाकार घ्यावा लागेल. तर तऊण रवी बिश्नोईला मोईन अलीकडून झालेल्या फटकेबाजीच्या आठवणींतून बाहेर सरून आपला प्रभाव दाखवावा लागेल.