चंदगडनगरीत हजारेंच्या उपस्थिती शिवजयंती साजरी…शब्द पाळणारा नेता अजित पवार : आमदार राजेश पाटील

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास प्रशासकीय मान्यता; चंदगडकरांनी साखर-पेढे वाटून केला आनंदोत्सव साजरा चंदगड प्रतिनिधी चंदगड येथील छत्रपती शिवाजी चौकात जाहीर सभेत दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून उदयास आलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दि. 17 फेब्रुवारी 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास अधिकृत प्रशासकीय मान्यता देऊन शब्द पाळणारा नेता हे सिध्द करून दाखविले, […]

चंदगडनगरीत हजारेंच्या उपस्थिती शिवजयंती साजरी…शब्द पाळणारा नेता अजित पवार : आमदार राजेश पाटील

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास प्रशासकीय मान्यता; चंदगडकरांनी साखर-पेढे वाटून केला आनंदोत्सव साजरा

चंदगड प्रतिनिधी

चंदगड येथील छत्रपती शिवाजी चौकात जाहीर सभेत दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून उदयास आलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दि. 17 फेब्रुवारी 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास अधिकृत प्रशासकीय मान्यता देऊन शब्द पाळणारा नेता हे सिध्द करून दाखविले, असे प्रतिपादन आमदार राजेश पाटील यांनी केले.
चंदगड येथे छत्रपती शिवाजी चौकातील शिवजयंतीनिमित्त आयोजित शिवसोहळ्यात ते बोलत होते. चंदगडकरांनी 19 फेब्रुवारीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारूढ पुतळ्याला कायदेशीर बाबींची पूर्तता करून प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी केली होती. त्यावेळी जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला शब्द सार्थ ठरविण्यासाठी 17 फेब्रुवारी रोजी कायदेशीर बाबींची पूर्तता करून प्रशासकीय मान्यता दिल्याचे सर्टीफिकेट आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते सोमवारी सकाळी शिवजयंतीचे औचित्य साधून चंदगड ग्रामस्थ, शिवभक्त व मंडळाच्या कार्यकर्त्यांकडे सुपूर्द केले. यावेळी ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला प्रशासकीय मान्यता मिळाल्याने ग्रामस्थांनी चंदगडनगरीत साखर-पेढे वाटून फटाक्यांच्या अतिषबाजीत आनंदोत्सव साजरा केला. शिवभक्त व ग्रामस्थांनी आमदार राजेश पाटील यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. आनंदोत्सव द्विगुणीत करण्यासाठी सेंट स्टिफन्स इंग्लिश मेडियम स्कूल, कन्या विद्या मंदिर, कुमार विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांनी शहरातून शिवघोषण देत रॅली काढली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात पथनाट्याद्वारे शिवकालीन इतिहासाची मांडणी केली. यावेळी शिवगर्जनांनी सारा परिसर दणाणून गेला होता. अवघा चंदगड शहर शिवमय झाला होता. सकाळी 7.30 वाजता भाजपाचे चंदगड विधानसभा प्रमुख शिवाजीराव पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन केले. यानंतर चंदगड तहसील कार्यालयातील अधिकारी, चंदगड पोलीस ठाण्यातील अधिकारी, चंदगड नगरपंचायतीमधील पदाधिकारी व अधिकारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. सायंकाळी 7 वाजता मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी सामुदायिक शिववंदना साजरी करून कार्यक्रमाची सांगता केली.
सोमवारी पहाटे तालुक्यातील कला नंदीगड, पारगड, महिपाळगड येथून शिवभक्तांनी पहाटे शिवज्योत घेऊन गावागावात दाखल झाले. यावेळी ग्रामस्थांनी पंचारती ओवाळून शिवज्योतीचे दर्शन घेतले. गावागावातील चौकात भगवे ध्वज, भगव्या पताका व फुलांनी सजविलेल्या मंडपातून पुजविण्यात आलेल्या शिवमूर्ती समोर सडारांगोळ्या टाकून शिवभक्त व भगिनींनी शिवगीते, शिवस्त्रोत, शिवआरती म्हणत मनोभावे पूजा केली. गावागावातून साजरा करण्यात आलेल्या शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
पारगडावर शिवभक्तांची गर्दी
शिवजयंतीनिमित्त पारगड येथे तालुक्मयातील अनेक शिवभक्तांनी ज्योत प्रज्वलित करून आणण्याकरिता मोठी गर्दी केली होती.
गडहिंग्लज, आजरा, कोल्हापूर परिसरातील शिवभक्त पारगडावर उपस्थित होते. त्यामुळे वातावरण शिवमय व भक्तीमध्ये झाले होते. पारगड हा ऐतिहासिक किल्ला असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. याशिवाय तानाजी मालुसरे यांच्या चिरंजीवाकडे हा किल्ला त्याकाळी असल्याने किल्ल्याला मोठा इतिहास आहे. दरवषी अनेक शिवरायांचे मावळे या किल्ल्याला भेट देतात. त्याचबरोबर किल्ल्यावर भवानी मातेचे मोठे मंदिर आहे. याच भवानी मातेच्या मंदिरातून ज्योत प्रज्वलित करून शिवरायांना नमन करून पोवाडे गात ज्योत नेली जाते. रविवार दि. 18 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त अनेक मावळे गडावर आले होते. त्यामुळे भाविक भक्तांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येत होती.