बेळगाव विभागात लवकरच कॅशलेस सुविधा

बस तिकीट होणार ऑनलाईन : सुट्या पैशांची किटकिट मिटणार बेळगाव : परिवहनच्या बसचा प्रवास ऑनलाईन होऊ लागला आहे. हुबळी विभागात परिवहनच्या बसमध्ये प्रायोगिक तत्त्वावर कॅशलेस तिकीट सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे लवकरच बेळगाव विभागातही कॅशलेस तिकीट सुविधा सुरू होणार आहे. त्यामुळे सुट्या पैशांची किटकिट मिटणार आहे. प्रवाशांना […]

बेळगाव विभागात लवकरच कॅशलेस सुविधा

बस तिकीट होणार ऑनलाईन : सुट्या पैशांची किटकिट मिटणार
बेळगाव : परिवहनच्या बसचा प्रवास ऑनलाईन होऊ लागला आहे. हुबळी विभागात परिवहनच्या बसमध्ये प्रायोगिक तत्त्वावर कॅशलेस तिकीट सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे लवकरच बेळगाव विभागातही कॅशलेस तिकीट सुविधा सुरू होणार आहे. त्यामुळे सुट्या पैशांची किटकिट मिटणार आहे. प्रवाशांना तिकीट काढणे सोपे व्हावे आणि प्रवास सुखकर व्हावा यासाठी सप्टेंबर महिन्यापासून युपीआय सेवा सुरू करण्यात आली आहे. या डिजिटल सुविधेला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे. यासाठी प्रत्येक बस वाहकाकडे स्वतंत्र स्थिर क्युआर कोड देण्यात आला आहे. त्यामुळे फोन पे, गुगल पे याद्वारे युपीआय स्कॅन करून तिकीट काढणे सोयिस्कर होऊ लागले आहे. त्यामुळे प्रवाशांना खिशात पैसे आहेत की नाही याची देखील चिंता करण्याची गरज नाही.
सार्वजनिक बससेवेचा प्रवासही डिजिटल होऊ लागला आहे. अत्याधुनिक बसस्थानक उभारण्याबरोबर बसेसमध्येही ऑनलाईन सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर होऊ लागला आहे. स्मार्ट इलेक्ट्रॉनिक मशीनच्याद्वारे तिकीट काढणे सोपे होऊ लागले आहे. या नवीन प्रणालीमुळे बस वाहक आणि प्रवाशांमध्ये सुट्या पैशावरून होणाऱ्या वादावादीलाही आळा बसणार आहे. प्रवासादरम्यान युपीआय डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे ही कॅशलेस प्रणाली राबविली जाणार आहे. हुबळी येथील सर्व बसेसमध्ये ही नवीन प्रणाली सुरू झाली आहे. या सुविधेचा लाभ घेऊन 72 हजारहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे. या माध्यमातून 1 कोटी 50 लाख 26 हजार इतका महसूल प्राप्त झाला आहे. त्यामुळे जानेवारी अखेरपर्यंत बेळगाव विभागात ही नवीन ऑनलाईन कॅशलेस तिकीट सुविधा सुरू होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना ऑनलाईन तिकीट काढता येईल.
नवीन सुविधा सोयिस्कर
हुबळी येथे ऑनलाईन तिकीट सेवेला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे जानेवारी अखेरपर्यंत बेळगावमधील सर्व बसमध्ये ही नवीन तिकीट प्रणाली सुरू केली जाणार आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान कॅशलेस सुविधा उपलब्ध होणार आहे. लांब पल्ल्यासाठी आणि इतर प्रवासासाठी ही नवीन सुविधा सोयिस्कर ठरणार आहे.
– के. के. लमाणी (डीटीओ बेळगाव)