कॅन्टोन्मेंटच्या बैठकीत हस्तांतरणावर आज निर्णय?

बंगल्यांसह रहिवासी वसाहत महापालिकेकडे होणार वर्ग : वाढीव कर आकारण्याची शक्यता  बेळगाव : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डचे महानगरपालिकेकडे हस्तांतरण केले जाणार आहे. संरक्षण मंत्रालयाने हस्तांतरणाच्या प्रक्रियेवर शिक्कामोर्तब केल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. कॅन्टोन्मेंटमधील 192 ओल्ड ग्रँड व लीजवरील बंगल्यांसह रहिवासी वसाहती महानगरपालिकेकडे हस्तांतरित केल्या जाणार आहेत. त्यामुळे शनिवार दि. 6 रोजी आयोजित करण्यात आलेल्या  कॅन्टोन्मेंटच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा केली जाणार असल्याचे स्पष्ट […]

कॅन्टोन्मेंटच्या बैठकीत हस्तांतरणावर आज निर्णय?

बंगल्यांसह रहिवासी वसाहत महापालिकेकडे होणार वर्ग : वाढीव कर आकारण्याची शक्यता 
बेळगाव : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डचे महानगरपालिकेकडे हस्तांतरण केले जाणार आहे. संरक्षण मंत्रालयाने हस्तांतरणाच्या प्रक्रियेवर शिक्कामोर्तब केल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. कॅन्टोन्मेंटमधील 192 ओल्ड ग्रँड व लीजवरील बंगल्यांसह रहिवासी वसाहती महानगरपालिकेकडे हस्तांतरित केल्या जाणार आहेत. त्यामुळे शनिवार दि. 6 रोजी आयोजित करण्यात आलेल्या  कॅन्टोन्मेंटच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा केली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कॅन्टोन्मेंटमधील वसाहतींचा विकास व्हावा यासाठी स्थानिक महापालिकेकडे हस्तांतरणाची प्रक्रिया राबविली जात आहे. यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डमधील मालमत्तांवर महापालिकेचे प्रशासन लागू होणार आहे. त्यामुळे 192 बंगल्यांसह नागरी वसाहतींमधून महसूल वाढीसाठी वाढीव कर लावला जाण्याची शक्यता आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डअंतर्गत मिलिटरी स्टेशन असल्यामुळे कोणत्याही लष्करी कारवाया करताना अडचणी येतात. त्या दूर करण्यासाठी पुढील काळात कॅन्टोन्मेंटच्या एका भागामध्ये मिलिटरी स्टेशन सुरू करून त्या परिसरात सामान्य नागरिकांना प्रवेशबंदी असणार आहे. मिलिटरी मालमत्ता वगळता इतर सर्व मालमत्ता महानगरपालिकेकडे वर्ग केल्या जाणार आहेत. शनिवारी होणाऱ्या बैठकीत या सर्व मुद्द्यांबाबत सविस्तर चर्चा होणार आहे. लोकप्रतिनिधींसह कॅन्टोन्मेंटचे अध्यक्ष ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी, सीईओ राजीवकुमार, नामनिर्देशित सदस्य सुधीर तुपेकर यांच्यासह अधिकारी उपस्थित राहणार आहेत. हस्तांतरणाची प्रक्रिया सुलभपणे पार पाडावी, अशी मागणी द बेळगाव कॅन्टोन्मेंट रेसिडेन्स वेल्फेअर असोसिएशनच्यावतीने करण्यात आली आहे.