कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेत डी. गुकेशने रचला इतिहास

शेवटच्या फेरीत नाकामुराला बरोबरीत रोखून मिळविले जेतेपद वृत्तसंस्था/टॉरंटो भारताचा 17 वर्षीय ग्रँडमास्टर डी. गुकेशने येथे झालेली कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा जिंकून इतिहास रचला आहे. तो जागतिक विजेतेपदाचा सर्वांत तरुण आव्हानवीर बनला असून 40 वर्षांपूर्वी महान गॅरी कास्पारोव्हने रचलेला विक्रम त्याने मोडीत काढला आहे. गुकेशने 14 व्या आणि अंतिम फेरीत अमेरिकेच्या हिकारू नाकामुरासोबत सहज बरोबरी साधली आणि […]

कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेत डी. गुकेशने रचला इतिहास

शेवटच्या फेरीत नाकामुराला बरोबरीत रोखून मिळविले जेतेपद
वृत्तसंस्था/टॉरंटो
भारताचा 17 वर्षीय ग्रँडमास्टर डी. गुकेशने येथे झालेली कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा जिंकून इतिहास रचला आहे. तो जागतिक विजेतेपदाचा सर्वांत तरुण आव्हानवीर बनला असून 40 वर्षांपूर्वी महान गॅरी कास्पारोव्हने रचलेला विक्रम त्याने मोडीत काढला आहे. गुकेशने 14 व्या आणि अंतिम फेरीत अमेरिकेच्या हिकारू नाकामुरासोबत सहज बरोबरी साधली आणि जगज्जेत्याचा आव्हानवीर निश्चित करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेतील आपली गुणसंख्या 9 वर नेली. बुद्धिबळ जगतातील आजी-माजी खेळाडूंकडून त्याच्या कामगिरीचे कौतुक करण्यात येत आहे.
या विजयामुळे गुकेशचा वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत होणाऱ्या लढतीत विद्यमान विश्वविजेता चीनच्या डिंग लिरेनशी सामना होईल. चेन्नईस्थित गुकेशने कास्पारोव्हचा विक्रम खूप मोठ्या फरकाने मोडीत काढला. कारण रशियाचा तो महान खेळाडू जेव्हा 1984 मध्ये देशबांधव अनातोली कार्पोव्हला टक्कर देण्यासाठी पात्र ठरला होता तेव्हा तो 22 वर्षांचा होता.
किमान बरोबरी आवश्यक असताना गुकेशने नाकामुराला वरचढ होऊ दिले नाही. तो मोठ्या टप्प्यासाठी तयार आहे आणि बुद्धिबळ जगतातील पुढील सर्वांत मोठा स्टार बनण्याची त्याच्यात क्षमता आहे हे या कामगिरीने दाखवून दिले आहे. गुकेश काळ्या सोंगाट्या घेऊन खेळत असूनही फारसा फरक पडला नाही. हा सामना  71 च्या चालीपर्यंत चालला. परंतु निकाल काय राहील याबद्दल कधीही शंका आली नाही. गुकेशला ही स्पर्धा जिंकल्याने 88,500 युरो म्हणजे अंदाजे 78.5 लाख ऊपये इतके रोख बक्षीस मिळाले आहे. कँडिडेट्स स्पर्धेत एकूण 5 लाख युरोंची बक्षिसे ठेवण्यात आली होती.
कारुआना, नेपोम्नियाची आणि नाकामुरा या तिघांनीही समान 8.5 गुण गुणांसह दुसरे स्थान मिळवले, तर भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने अझरबैजानच्या निजात आबासोव्हचा पराभव करून सात गुणांसह पाचवे स्थान पटकावले. विदित गुजराथीने शेवटच्या फेरीत फ्रान्सच्या फिरोजा अलीरेझासोबत झटपट बरोबरी साधली आणि एकूण सहा गुणांसह तो सहाव्या स्थानावर राहिला. अलीरेझा पाच गुणांसह सातव्या स्थानावर, तर आबासोव्ह एकूण 3.5 गुणांसह शेवटच्या स्थानावर राहिला.
12 व्या वर्षी ग्रँडमास्टर
12 व्या वर्षी गुकेश बुद्धिबळाच्या इतिहासातील तिसरा सर्वांत तरुण ग्रँडमास्टर बनला होता. त्यानंतर तो 2750 इलो रेटिंग मिळवणारा सर्वांत तरुण खेळाडू ठरला होत. त्याचे वडील रजनीकांत हे ‘ईएनटी’ सर्जन आहेत. परंतु त्यांनी गुकेशची बुद्धिबळातील स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्यांची सेवा थांबविली. त्याच्यासोबत ते या स्पर्धेत सहभागी झाले होते. गुकेशची आई पद्मा या मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत. गेल्या वर्षी गुकेशने आशियाई क्रीडास्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते.
जागतिक स्पर्धेच्या तारखा आणि ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही. गुकेश त्याबद्दल बोलताना म्हणाला, ‘मी त्याबद्दल फारसा विचार केला नाही. मुख्य रणनीती चांगल्या चाली खेळण्याची असेल. त्याची तयारी करण्यास आणि तिथे सहभागी होण्यास मी उत्सुक आहे’.
विश्वनाथन आनंदनंतरचा दुसरा भारतीय विजेता
महान विश्वनाथन आनंदनंतर ही प्रतिष्ठित स्पर्धा जिंकणारा गुकेश हा दुसरा भारतीय बुद्धिबळपटू ठरला आहे. पाच वेळचा विश्वविजेता आनंदने 2014 मध्ये या स्पर्धेचे जेतेपद जिंकले होते. गुकेशने जेतेपद मिळविल्यानंतर त्याचे लगेच आनंदने अभिनंदन केले. ‘सर्वांत तरुण आव्हानवीर बनल्याबद्दल गुकेशचे अभिनंदन. वाका चेस परिवाराला तू जे काही केले आहे त्याचा अभिमान वाटतो. तू ज्या प्रकारे खेळला आणि कठीण प्रसंग हाताळले त्याचा मला व्यक्तिश: खूप अभिमान वाटतो. या क्षणाचा आनंद घे’, असे आनंदने ‘एक्स’वरील आपल्या संदेशात म्हटले आहे.
‘ती 15 मिनिटे सर्वांत तणावपूर्ण’
गुकेशची वाटचाल 9 गुणांवर संपुष्टात आल्याने सर्वांच्या नजरा अमेरिकेचा काऊआना आणि रशियाचा नेपोम्नियाची यांच्यातील सामन्याकडे लागल्या होत्या. ‘ती 15 मिनिटे कदाचित या संपूर्ण स्पर्धेतील सर्वांत तणावपूर्ण होती. मी काही वेळ सामना पाहिला आणि मग मी आणि प्रशिक्षक गजेव्हस्की फिरायला गेलो. मग माझे वडील धावत आले’, असे गुकेशने सांगितले. कारुआनाने सुऊवातीपासूनच नेपोम्नियाचीवर वर्चस्व गाजविले आणि सामना शेवटी बरोबरीत संपला. या दोन खेळाडूंपैकी कोणीही जिंकले असते, तर स्पर्धेला टायब्रेकरची गरज भासली असती. कारण गुकेश आणि या सामन्यातील विजेता संयुक्तपणे आघाडीवर राहिले असते.
महिला विभागात कोनेरू हम्पी दुसऱ्या स्थानावर

 
भारतीय ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीने कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेच्या महिला विभागात योग्य वेळी आपली क्षमता दाखवत चीनची संयुक्तरीत्या आघाडीवर असलेली बुद्धिबळपटू टिंगजी लेईला पराभूत केले आणि दुसरे स्थान पटकावले. युक्रेनच्या अॅना मुझीचूकबरोबरचा सामना बरोबरीत सोडवून चीनच्या झोंगयी टॅनने अव्वल स्थान पटकावले. मात्र या दिवशी खरे लक्ष आर. वैशालीने वेधून घेतले. तिने रशियाच्या कॅटेरिना लागनोवर सलग पाचवा विजय मिळवला. टॅनने एकूण 9 गुण मिळविले आणि हंपी, लेई आणि वैशाली या जवळच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा ती 1.5 गुणाने पुढे राहिली. हंपी, लेई व वैशाली यांना अनुक्रमे दुसरे, तिसरे व चौथे स्थान मिळाले.