भारतावरील आरोपांवर ठाम : कॅनडा
निज्जरच्या हत्येप्रकरणी विदेशमंत्र्यांचा आरोप : भारतीय राजदूताने कॅनडाला सुनावले
वृत्तसंस्था/ ओटावा
कॅनडाने पुन्हा एकदा खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येप्रकरणी भारतावर केलेल्या आरोपांचा पुनरुच्चार केला आहे. भारतीय हस्तकांनी कॅनडाच्या भूमीवर आमच्या नागरिकाची हत्या करविली असल्याचे आमचे अद्याप मानणे आहे असे उद्गार कॅनडाच्या विदेशमंत्री मेलेनी जोली यांनी काढले आहेत.
भारताच्या सार्वभौमत्वावर वक्रदृष्टी टाकणे लक्ष्मणरेषा ओलांडण्यासारखे आहे. भारताचे भविष्य आता विदेशी नव्हे तर भारतीयच निश्चित करतील असे कॅनडातील भारताचे राजदूत संजय कुमार वर्मा यांनी म्हटले आहे.
कॅनडाच्या नागरिकांची सुरक्षा
निज्जरच्या हत्येप्रकरणाचा तपास रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलीस करत आहेत. देशाच्या नागरिकांचे रक्षण करणे याला कॅनडाची प्राथमिकता आहे. भारतीय एजंट्सनी कॅनडाच्या भूमीवर एका व्यक्तीची हत्या केल्याच्या आरोपांवर आम्ही ठाम आहोत. याप्रकरणी आणखी टिप्पणी करण्याची माझी इच्छा नाही. कॅनडा सरकारचा कुठलाही सदस्य याप्रकरणी आणखी काही सांगणार नसल्याचे जोली यांनी म्हटले आहे. मुत्सद्देगिरी ही पडद्याआडून अधिक चांगल्याप्रकारे होत असते. कॅनडा स्वत:च्या नागरिकांची सुरक्षा, स्वत:चे सार्वभौमत्व कायम राखणे आणि कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी प्रतिबद्ध असल्याचे वक्तव्य जोली यांनी केले आहे.
भारतविरोधी घटकांना थारा
कॅनडाच्या भूमीवर भारतासाठी धोकादायक असलेल्या घटकांना थारा मिळत आहे. द्विपक्षीय संबंधांमध्ये जेव्हा आम्ही परस्परांना मित्र म्हणतो, तेव्हा परस्परांचे दृष्टीकोन, संस्कृती आणि चिंता समजून घेतल्या जातील अशी अपेक्षा आम्ही करतो. परंतु काही मुद्द्यांवर कित्येक वर्षांपासून कुठलाच निष्कर्ष निघू शकला नसल्याचे भारतीय राजदूत संजय वर्मा यांनी कॅनडाला सुनावले आहे.
आरोपी न्यायालयासमोर हजर
निज्जरच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींना मंगळवारी ब्रिटिश कोलंबियाच्या सरे न्यायालयासमोर हजर करण्यात आले. आरोपी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयीन सुनावणीत सामील झाले. यादरम्यान न्यायालयात शिख समुदायाच्या सदस्यांनी गर्दी केली होती. यावेळी खलिस्तानी समर्थकांनी घोषणाबाजी करत भारत सरकारविरोधात फलक झळकविले आहेत. कॅनडाच्या न्यायालयाने 3 पैकी 2 आरोपींच्या विरोधातील सुनावणी 21 मेपर्यंत पुढे ठकलली आहे. तर तिसरा आरोपी कमलप्रीतने लीगल कौन्सिलची मागणी केली आहे.
पंतप्रधान ट्रुडोंकडून आरोप
18 जून 2023 रोजी सरे शहरातील एका गुरुद्वाराच्या बाहेर निज्जरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ही हत्या भारताने घडवून आणल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला होता. तर भारताने त्यांचा हा आरोप फेटाळून लावला होता. निज्जरच्या हत्येप्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे तिन्ही आरोपी भारतीय आहेत. याच आरोपींना निज्जरच्या हत्येच्या काम सोपविण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे.
Home महत्वाची बातमी भारतावरील आरोपांवर ठाम : कॅनडा
भारतावरील आरोपांवर ठाम : कॅनडा
निज्जरच्या हत्येप्रकरणी विदेशमंत्र्यांचा आरोप : भारतीय राजदूताने कॅनडाला सुनावले वृत्तसंस्था/ ओटावा कॅनडाने पुन्हा एकदा खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येप्रकरणी भारतावर केलेल्या आरोपांचा पुनरुच्चार केला आहे. भारतीय हस्तकांनी कॅनडाच्या भूमीवर आमच्या नागरिकाची हत्या करविली असल्याचे आमचे अद्याप मानणे आहे असे उद्गार कॅनडाच्या विदेशमंत्री मेलेनी जोली यांनी काढले आहेत. भारताच्या सार्वभौमत्वावर वक्रदृष्टी टाकणे लक्ष्मणरेषा ओलांडण्यासारखे आहे. […]