वानखेडेवर बुमराह, इशान, सूर्याचा जलवा
मुंबईचा आरसीबीवर दणदणीत विजय : सामनावीर बुमराहचे 5 बळी तर इशान, सूर्याची तुफानी अर्धशतके : आरसीबीचा सलग चौथ पराभव
वृत्तसंस्था /मुंबई
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात सामनावीर जसप्रीत बुमराह, इशान किशन व सुर्यकुमार यादवच्या शानदार खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरवर 7 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. प्रारंभी, आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 196 धावा जमवित मुंबईला 197 धावांचे आव्हान दिले. मुंबईने हे विजयी आव्हान अवघ्या 15.3 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यातच पार केले. इशान किशन व सुर्यकुमार यादव यांनी आक्रमक अर्धशतके झळकावत विजयात मोलाचे योगदान दिले. मुंबईचा हा सलग दुसरा विजय असून गुणतालिकेत ते सातव्या स्थानी आहेत. आरसीबीचा हा सलग पाचवा पराभव ठरला आहे.
आरसीबीने दिलेल्या 197 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इशान किशन, रोहित शर्मा आणि विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने हा शानदार विजय मिळवला. सलामीवीर इशान किशन व रोहित शर्मा यांनी 8.5 षटकांत 101 धावांची सलामी दिली. इशानने 34 चेंडूत 5 षटकार आणि 7 चौकारांसह 69 धावा केल्या तर रोहित शर्माने संधी मिळताच फटके लगावले. रोहितने 24 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांच्या जोरावर 38 धावांचे योगदान दिले. इशान बाद झाल्यानंतर आलेल्या सूर्याने वानखेडेवरील प्रेक्षकांसाठी चौकार-षटकारांसाठी आतिषबाजी केली. तीन महिन्यांनंतर पुनरागमन केलेल्या सूर्याने आपला फॉर्म दाखवून देत अवघ्या 19 चेंडूच 4 षटकार आणि 5 चौकारांसह 52 धावा फटकावल्या. अर्धशतकानंतर तो बाद झाला. यानंतर हार्दिकनेही शानदार खेळी करत 6 चेंडूत 3 षटकारांसह 21 धावा केल्या आणि विजयी षटकाराने संघाला विजय मिळवून दिला. तिलक वर्मा 16 धावांवर नाबाद राहिला.
आरसीबीची पराभवाची मालिका कायम
प्रारंभी, मुंबईने नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरला प्रथम फलंदाजी दिली. कोहली आणि डु प्लेसिस या सलामीच्या जोडीने 15 चेंडूत 14 धावा जमविल्यानंतर बुमराहच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक इशान किशनने कोहलीला टिपले. त्याने केवळ 3 धावा जमविल्या. मुंबईने बेंगळूरला आणि एक धक्का पाठोपाठ दिला. मधवालने जॅक्सला झेलबाद केले. त्याने 6 चेंडूत 2 चौकारांसह 8 धावा जमविल्या. कर्णधार डु प्लेसिस आणि रजत पाटीदार या जोडीने दमदार फलंदाजी करत तिसऱ्या गड्यासाठी 82 धावांची भागिदारी केली. कोएत्झीने पाटीदारला झेलबाद केले. त्याने 26 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकारांसह 50 धावा जमविल्या. अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल पुन्हा एकदा अपयशी ठरला. गोपालच्या गोलंदाजीवर ते खाते उघडण्यापूर्वीच पायचीत झाला. दिनेश कार्तिक आणि डु प्लेसिस यांनी पाचव्या गड्यासाठी 45 धावांची भागिदारी केली. बुमराहने डु प्लेसिसला झेलबाद केले. त्याने 40 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांसह 61 धावा जमविल्या. बुमराहने यानंतर याच षटकातील पुढच्या चेंडूवर लोमरोरला खाते उघडण्यापूर्वी पायचीत केले. बुमराहने चौहानला मधवालकरवी झेलबाद केले. त्याने 9 धावा जमविल्या. बुमराहने विशाखलाही नबीकरवी झेलबाद केले. त्यालाही खाते उघडता आले नाही. बेंगळूरने 20 षटकात 8 बाद 196 धावा जमविल्या. दिनेश कार्तिक 23 चेंडूत 4 षटकार आणि 5 चौकारांसह 53 धावांवर तर आकाशदीप 2 धावांवर नाबाद राहिले. मुंबईतर्फे बुमराह सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 21 धावांत 5 गडी तर कोएत्झी, मधवाल आणि गोपाल यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर 20 षटकात 8 बाद 196 (डु प्लेसिस 61, रजत पाटीदार 50, दिनेश कार्तिक नाबाद 53, कोहली 3, जॅक 8, चौहान 9, अवांतर 10, बुमराह 5-21, कोएत्झी 1-42, मधवाल 1-57, गोपाल 1-32).
मुंबई इंडियन्स 15.3 षटकांत 3 बाद 199 (इशान किशन 34 चेंडूत 69, रोहित शर्मा 24 चेंडूत 38, सूर्यकुमार यादव 19 चेंडूत 52, तिलक वर्मा 10 चेंडूत नाबाद 16, हार्दिक पंड्या 6 चेंडूत नाबाद 21, आकाश दीप, विशाख व विल जॅक्स प्रत्येकी एक बळी).
आरसीबीविरुद्ध बुमराहच्या सर्वाधिक विकेट्स
गुरुवारी मुंबईत झालेल्या आरसीबीविरुद्ध सामन्यात जसप्रीत बुमराहने शानदार गोलंदाजी करताना 21 धावांत 5 बळी घेण्याची किमया केली. या कामगिरीसह तो रवींद्र जडेजा आणि संदीप शर्मा यांना देखील मागे टाकत आयपीएलमध्ये आरसीबीविरूद्ध सर्वाधिक विकेट्स घेणाचा मान देखील पटकावला. त्याने आरसीबीविरूद्ध आतापर्यंत 29 विकेट्स घेतल्या आहेत. या यादीत रवींद्र जडेजा 26 बळीसह दुसऱ्या तर संदीप शर्मा 26 बळीसह तिसऱ्या स्थानी आहे.
Home महत्वाची बातमी वानखेडेवर बुमराह, इशान, सूर्याचा जलवा
वानखेडेवर बुमराह, इशान, सूर्याचा जलवा
मुंबईचा आरसीबीवर दणदणीत विजय : सामनावीर बुमराहचे 5 बळी तर इशान, सूर्याची तुफानी अर्धशतके : आरसीबीचा सलग चौथ पराभव वृत्तसंस्था /मुंबई वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात सामनावीर जसप्रीत बुमराह, इशान किशन व सुर्यकुमार यादवच्या शानदार खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरवर 7 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. प्रारंभी, आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 196 […]