कॅन्टोन्मेंट बोर्डचा अंदाजपत्रकीय आराखडा सादर

56 कोटी 98 लाखांच्या कामांना मंजुरी : विकासकामांना मिळणार गती बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डमधील विकासकामांना मंजुरी देण्यात आली असून 2024-25 या आर्थिक वर्षासाठी तब्बल 56 कोटी 98 लाख 32 हजार 396 रुपयांचा आराखडा मंजुरीसाठी सदर्न कमांडकडे पाठविण्यात आला. आर्थिक वर्षात कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये अनेक विकासकामे मार्गी लावली जाणार आहेत. याचबरोबर अधिकाधिक महसूल जमा करण्याबाबत नवीन उपाययोजना राबविण्यावर भर देण्यात येणार आहे, अशी […]

कॅन्टोन्मेंट बोर्डचा अंदाजपत्रकीय आराखडा सादर

56 कोटी 98 लाखांच्या कामांना मंजुरी : विकासकामांना मिळणार गती
बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डमधील विकासकामांना मंजुरी देण्यात आली असून 2024-25 या आर्थिक वर्षासाठी तब्बल 56 कोटी 98 लाख 32 हजार 396 रुपयांचा आराखडा मंजुरीसाठी सदर्न कमांडकडे पाठविण्यात आला. आर्थिक वर्षात कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये अनेक विकासकामे मार्गी लावली जाणार आहेत. याचबरोबर अधिकाधिक महसूल जमा करण्याबाबत नवीन उपाययोजना राबविण्यावर भर देण्यात येणार आहे, अशी चर्चा बैठकीत झाली. कॅन्टोन्मेंटची महत्त्वाची बैठक शुक्रवारी सकाळी झाली. या बैठकीमध्ये अंदाजपत्रकीय आराखड्याला मंजुरी देण्यात आली. दरवर्षी 50 कोटींचा आराखडा केला जातो. यावर्षी 6 कोटी रुपयांनी यामध्ये वाढ करण्यात आली आहे. कर्मचारी व पेन्शनधारकांना सातवा वेतन आयोग लागू केला जाणार आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 21 कोटी तर पेन्शनधारकांसाठी 7 कोटी 80 लाख रुपये निधी राखीव ठेवण्यात आला आहे.
कॅन्टोन्मेंटचे नवीन रस्ते, याचबरोबर डागडुजी, इमारत बांधकामासाठी 9 कोटी 8 लाख रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत. मिलिटरीसाठी 1 कोटी 50 लाख, वाहन खरेदी व दुरुस्तीसाठी 1 कोटी 10 लाख, पथदीप व पाणीपुरवठ्यासाठी 21 लाख, त्याचबरोबर इतर खर्चासाठी 2 कोटी 36 लाख रुपये निधी राखीव ठेवण्यात आल्याची माहिती कॅन्टोन्मेंटचे सीईओ राजीवकुमार यांनी दिली. यावेळी कॅन्टोन्मेंटचे अध्यक्ष ब्रिगेडीयर जॉयदीप मुखर्जी, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, आमदार राजू सेठ, कॅन्टोन्मेंटचे नामनिर्देशित सदस्य सुधीर तुपेकर यांसह कॅन्टोन्मेंटचे अधिकारी उपस्थित होते. उपस्थित लोकप्रतिनिधींनी विकासकामांबाबत अनेक सूचना अधिकाऱ्यांना केल्या.
आर्थिक वर्षात मंजुरी मिळालेली कामे…

धोबीघाट व वॉचमन शेडची दुरुस्ती
कॅन्टोन्मेंट ऑफिस संरक्षक भिंत व रंगकाम
कत्तलखाना शेडची दुरुस्ती
सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहतींची दुरुस्ती
कॅम्प येथील मटण मार्केट, बीफ मार्केटची डागडुजी
कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलची दुरुस्ती
जलशुद्धीकरण प्रकल्पाची निर्मिती
रामघाट रोडवरील फुटपाथची दुरुस्ती
मुख्य पोस्ट ऑफिस, नॉर्थ टेलिग्रामचे रोड, नोलन मार्ग रोडचे डांबरीकरण
कॅटल रोड रुंदीकरण व डांबरीकरण
विविध मार्गांची डागडुजी