खैरवाड-कापोली येथे भरदिवसा चोरी

सहा तोळे सोने, 75 हजार रु. रोख लंपास खानापूर : खानापूर तालुक्यातील खैरवाड आणि कापोली येथे शुक्रवारी दिवसाढवळ्या चोरी झाली असून दोन्ही ठिकाणी एकाच पद्धतीने घरफोडी केली आहे. या चोरीत खैरवाड येथील पुंडलिक पोमाण्णा वकाले यांच्या घरातील 6 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख 75 हजार रुपये चोरट्यांनी लांबविले आहेत. तालुक्यात चोऱ्यांचे सत्र वाढतेच आहे. खैरवाड […]

खैरवाड-कापोली येथे भरदिवसा चोरी

सहा तोळे सोने, 75 हजार रु. रोख लंपास
खानापूर : खानापूर तालुक्यातील खैरवाड आणि कापोली येथे शुक्रवारी दिवसाढवळ्या चोरी झाली असून दोन्ही ठिकाणी एकाच पद्धतीने घरफोडी केली आहे. या चोरीत खैरवाड येथील पुंडलिक पोमाण्णा वकाले यांच्या घरातील 6 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख 75 हजार रुपये चोरट्यांनी लांबविले आहेत. तालुक्यात चोऱ्यांचे सत्र वाढतेच आहे. खैरवाड येथील शेतकरी पुंडलिक वकाले हे आपल्या संपूर्ण कुटुंबासह घराला कुलूप लावून शेताकडे कामासाठी गेले होते. दुपारी साडेबाराच्या दरम्यान वकाले यांच्या घराचा मागील दरवाजा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. तिजोरीचा दरवाजा फोडून सहा तोळे सोने आणि 75 हजार रु. रोख घेऊन चोरट्यांनी पोबारा केला आहे. दुपारी दीडच्या सुमारास वकाले कुटुंबीय जेवणासाठी घरी आले. समोरचा दरवाजा आतून बंद केला होता. मागील दरवाजाकडे गेले असता दरवाजा उघडा दिसला. घरात प्रवेश करताच चोरी झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत नंदगड पोलीस स्थानकात फिर्याद देण्यात आली आहे. याच पद्धतीने कापोली येथे नामदेव रामा कोटीनकर यांच्याही घरात मागील दरवाजा फोडून चोरट्यांनी तिजोरी फोडून शोधाशोध केली. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही.
गेल्या दोन महिन्यांत कापोली येथे पाच घरांमध्ये चोरी करण्यात आली आहे. मात्र कापोली येथील नागरिक पोलिसांत तक्रार देण्यापासून दूर राहिले आहेत. याबाबत ग्रा. पं. माजी अध्यक्ष संदीप देसाई म्हणाले, पोलिसांकडून कोणतेच सहकार्य मिळत नाही. तसेच चोरी झालेल्यानाच नाहक त्रास दिला जातो. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांत तक्रार दिली नाही. तसेच गेल्या दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात चोऱ्यांचे सत्र सुरू आहे. अद्याप एकाही चोरीचा तपास पोलिसांनी लावलेला नाही. तालुक्याच्या ग्रामीण भागात चोऱ्या करण्यात येत आहेत. चोरी करण्याची पद्धत एकच असून मागील दरवाजा फोडून घरात प्रवेश करण्यात येतो. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरी झाल्यानंतर पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेलेल्यांचीच चोरांसारखी उलटसुलट प्रश्न विचारून मेटाकुटीला आणले जाते. तसेच तक्रार घेण्यास टाळाटाळही करण्यात येते. तक्रार न देण्याच्या सूचनाही करण्यात येतात. तसेच चोरीनंतर तपास किंवा अन्य माहितीसाठी वारंवार पोलीस स्थानकात बोलावण्यात येते. त्यामुळे ज्यांची चोरी होते त्यांनाच त्रास सहन करावा लागत असल्याने काही ठिकाणी तर चोरीची तक्रार देण्यात येत नाही. तसेच मिळालेला मुद्देमालही योग्य पद्धतीने परत करण्यात येत नाही. याचा अनुभव नंदगड येथील एकाला आलेला आहे. त्यामुळे चोरीबाबत पोलिसांत तक्रार देण्यासाठी धजावत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.