गुजरातमध्ये पूल कोसळला, 12 ठार

वडोदरामधील दुर्घटनेत वाहने कोसळली नदीपात्रात : 9 जणांचा वाचविण्यात यश वृत्तसंस्था / वडोदरा गुजरातमधील वडोदरामध्ये महिसागर नदीवर बांधलेला पूल बुधवारी सकाळी कोसळला. या अपघातात दोघा भावंडांसह 12 जणांचा मृत्यू झाला, तर 9 जणांना स्थानिक लोकांनी वाचवले. अपघाताच्या वेळी वाहने पुलावरून जात होती. पूल कोसळल्याने दोन ट्रक, दोन कार, एक रिक्षा आणि काही दुचाकी नदीपात्रात कोसळली. […]

गुजरातमध्ये पूल कोसळला, 12 ठार

वडोदरामधील दुर्घटनेत वाहने कोसळली नदीपात्रात : 9 जणांचा वाचविण्यात यश
वृत्तसंस्था / वडोदरा
गुजरातमधील वडोदरामध्ये महिसागर नदीवर बांधलेला पूल बुधवारी सकाळी कोसळला. या अपघातात दोघा भावंडांसह 12 जणांचा मृत्यू झाला, तर 9 जणांना स्थानिक लोकांनी वाचवले. अपघाताच्या वेळी वाहने पुलावरून जात होती. पूल कोसळल्याने दोन ट्रक, दोन कार, एक रिक्षा आणि काही दुचाकी नदीपात्रात कोसळली. सुदैवाने पुलाच्या तुटलेल्या टोकावर एक टँकर अडकला. पुलाचा मधला भाग कोसळल्यानंतर अग्निशमन दल आणि एसडीआरएफच्या पथकांना बचावकार्यासाठी पाचारण करण्यात आले.
45 वर्षे जुना असलेला हा पूल कोसळल्यामुळे मध्य गुजरातला सौराष्ट्राशी संपर्क तुटला आहे. पूल कोसळल्यामुळे भरुच, सुरत, नवसारी, तापी आणि वलसाड यासारख्या दक्षिण गुजरात शहरांमधून सौराष्ट्रला पोहोचण्यासाठी जास्त वेळ लागणार आहे. आता यासाठी अहमदाबादमार्गे लांबच्या मार्गाने जावे लागेल. वडोदरा आणि आणंद दरम्यानचा प्रमुख मार्ग असलेला हा पूल गेल्या काही वर्षांत खूपच जीर्ण झाला होता. अपघातानंतर लगेचच स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले आणि लोकांना वाचवले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघाताबद्दल दु:ख व्यक्त करताना मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे.
कोसळलेल्या पुलाला पद्रा-गंभीरा पूल असेही म्हणतात. मुजपूर गावातील लोकांना हा पूल कोसळल्याची माहिती मिळताच, लोक मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहोचले. यानंतर माही नदीत पडलेल्या वाहनांमधून तीन जणांना वाचवण्यात आले. घटनेनंतर लगेचच 108 रुग्णवाहिकेला याची माहिती देण्यात आली. त्यानंतर प्रशासनाचे पथकही घटनास्थळी दाखल झाल्यानंतर नदीत पडलेल्या वाहनांना बाहेर काढण्याचे काम सुरू झाले.
निष्काळजीपणाचा आरोप
या घटनेनंतर स्थानिक लोकांनी या अपघातासाठी प्रशासनाला जबाबदार धरले आहे. साडेचार दशके जुना असलेला हा पूल दुरुस्त करण्यासाठी वारंवार विनंती करण्यात आली होती, परंतु प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. वेळोवेळी इशारे देऊनही अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नसल्यामुळे पूल कोसळला आणि अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे.
पंतप्रधानांकडून दु:ख व्यक्त
या घटनेवर पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘गुजरातमधील वडोदरा जिह्यात पूल कोसळल्याने झालेले जीवितहानी अत्यंत दु:खद आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याप्रती माझी संवेदना आहे. जखमींना लवकर बरे व्हावे अशी मी प्रार्थना करतो. पंतप्रधानांच्या राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपये मदत दिली जाईल. तसेच जखमींना 50,000 रुपये दिले जातील, असे पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले.
प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केल्या भावना
अपघाताचे प्रत्यक्षदर्शी 25 वर्षीय संजयभाई सोमाभाई चावडा यांनी आम्ही तिघे मित्र बाईकवरून कामावर जात होतो. अचानक मला ब्रेक लावावे लागले कारण पूल मध्यभागी तुटला होता. जर आम्ही ब्रेक लावले नसते तर आम्हीही अपघाताचे बळी ठरलो असतो, असे स्पष्ट केले. पुलावरून जात असलेला महेशभाई परमार (वय 23) हादेखील या अपघातात थोडक्यात बचावला. ‘आम्ही दोघे मित्र कामावर जात होतो. पुलाच्या जवळ बाईक पंक्चर झाली. पंक्चर दुरुस्त करून आम्ही पुलावर पोहोचताच पूल अचानक तुटला. आम्ही तीन-चार वाहनांच्या मागे होतो. आम्ही पाहिले तर एक इको कार, एक पिकअप आणि एक ट्रक पुलावरून खाली पडले होते. खाली आरडाओरडा आणि आकांत सुरू झाला.’ असे महेश परमान याने सांगितले.