ईडन गार्डन्सवर गोलंदाजाचे वर्चस्व

दुसऱ्या दिवशी पडल्या 15 विकेट्स : टीम इंडिया 189 धावांत ऑलआऊट  वृत्तसंस्था/ कोलकाता ऐतिहासिक ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर दुसऱ्या दिवसाच्या खेळात फिरकीची जादू पाहायला मिळाली. फिरकीपटू सायमन हार्मरने मारलेला ‘चौकार‘ आणि त्याला मार्को यान्सेनने दिलेली साथ या जोरावर दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला 189 धावांत गुंडाळले. पहिल्या डावात भारतीय संघाने 30 धावांची अल्प आघाडी घेतली.  भारतीय फिरकीपटूंनी पुन्हा […]

ईडन गार्डन्सवर गोलंदाजाचे वर्चस्व

दुसऱ्या दिवशी पडल्या 15 विकेट्स : टीम इंडिया 189 धावांत ऑलआऊट 
वृत्तसंस्था/ कोलकाता
ऐतिहासिक ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर दुसऱ्या दिवसाच्या खेळात फिरकीची जादू पाहायला मिळाली. फिरकीपटू सायमन हार्मरने मारलेला ‘चौकार‘ आणि त्याला मार्को यान्सेनने दिलेली साथ या जोरावर दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला 189 धावांत गुंडाळले. पहिल्या डावात भारतीय संघाने 30 धावांची अल्प आघाडी घेतली.  भारतीय फिरकीपटूंनी पुन्हा सामना टीम इंडियाच्या बाजूनं वळवला असून दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा आफ्रिकेने 7 बाद 93 धावा केल्या होत्या. पाहुण्या संघाकडे 63 धावांची आघाडी असून हा सामना आता तिसऱ्याच दिवशी संपण्याची चिन्हे आहेत.
प्रारंभी, भारतीय संघाने 1 बाद 37 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. यावेळी केएल राहुल 13 धावांवर आणि वॉशिंग्टन सुंदर 6 धावांवर नाबाद खेळत होते. यशस्वी जैस्वालने पहिल्याच दिवळी 12 धावांवर विकेट गमावली होती. दुसऱ्या दिवशी केएल राहुल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी अर्धशतकी भागीदारी साकारली. मात्र त्यांची 57 धावांची भागीदारी 35 व्या षटकात सिमॉन हार्मरने तोडली. त्याने वॉशिंग्टनला एडेन मार्करमच्या हातून 29 धावांवर झेलबाद केले. त्यानंतर लगेचच कर्णधार शुभमन गिल मानेत असलेल्या वेदनेमुळे 4 धावांवर असतानाच रिटायर्ड हर्ट झाला, तर केएल राहुलला 40 व्या षटकात केशव महाराजने तंबूचा रस्ता दाखवला. त्याने सर्वाधिक 119 चेंडूत 39 धावांचे योगदान दिले.
हार्मरचे 4 तर यान्सेनचे 3 बळी
केएल बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेला पंत आक्रमक खेळला, पण त्याला फार काळ कॉर्बिन बॉशने टिकू दिले नाही. पंत 27 धावांवर बाद झाला. नंतर रवींद्र जडेजाला फार मोठी खेळी साकारता आली नाही. 27 धावा करुन तोही माघारी परतला. ध्रुव जुरेलही सपशेल अपयशी ठरला, त्याला 14 धावा करता आल्या. यानंतर कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी 1 धावेवर मार्को यान्सेनने बाद केले. एक बाजू अक्षर पटेल सांभाळत होता. पण अखेर त्यालाच हार्मरने 16 धावांवर बाद करत भारताचा डाव संपवला. गिल दुखापतीमुळे पुन्हा फलंदाजीला आला नाही. टीम इंडियाचा डाव 62.2 षटकांत 189 धावांत आटोपला. दक्षिण आफ्रिकेकडून सिमॉन हार्मरने 4 तर मार्को यान्सेनने 3 विकेट्स घेतल्या. याशिवाय, केशव महाराज आणि कॉर्बिन बॉश यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
 
टीम इंडियाचे कमबॅक
189 धावांत पहिला डाव आटोपल्यानंतर भारतीय संघाला 30 धावांची नाममात्र आघाडी मिळाली. यानंतर आफ्रिकेचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरला खरा पण त्यांना खास कामगिरी करता आली नाही. जडेजा, कुलदीप आणि अक्षर पटेल या त्रिकुटाच्या भेदक माऱ्यासमोर आफ्रिकन फलंदाजांनी सपशेल नांगी टाकल्याचे चित्र ईडन गार्डन्सवर पहायला मिळाले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा आफ्रिकेची 7 बाद 93 अशी बिकट स्थिती झाली आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा अजूनही मैदानात असला तरी आफ्रिकन संघाकडे फक्त 63 धावांची आघाडी आहे. त्यामुळे या सामन्याचा निकाल तिसऱ्या दिवशीच लागेल, असे चित्र निर्माण झाले आहे.
डावातील 7 व्या षटकात रिकेल्टनला 11 धावांवर पायचीत करत कुलदीपने भारताला पहिले यश मिळवून दिले. मार्करम जडेजाचा बळी ठरला तर वियान मुल्डरलाही (11) जडेजाने माघारी पाठवले. यानंतर फलंदाजीला आलेल्या टोनी डी झोर्जी (2), ट्रिस्टन स्टब्ज (5) यांनी देखील सपशेल निराशा केली. काईल व्हेरेन (9), मॉर्को यान्सेनदेखील (13) फार काही चमत्कार करु शकले नाहीत. दुसरीकडे, कर्णधार बवुमा मात्र दिवसअखेरीस 29 धावावर नाबाद राहिला. त्याने एका बाजूने संयमी खेळी करत 3 चौकारासह नाबाद 29 धावा फटकावल्या आहेत. दिवसअखेरीस बवुमा 29 तर बॉश 1 धावांवर खेळत होते. टीम इंडियाकडून जडेजाने 29 धावांत 4 तर कुलदीप यादवने 12 धावांत 2 गडी बाद केले. अक्षर पटेलला 1 विकेट मिळाली.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका पहिला डाव सर्वबाद 159
दक्षिण आफ्रिका दुसरा डाव 35 षटकांत 7 बाद 93 (रिकेल्टन 11, वियान मुल्डर 11, बावुमा खेळत आहे 29, बॉश खेळत आहे 1, जडेजा 29 धावांत 4 बळी, कुलदीप यादव 12 धावांत 2 बळी, अक्षर पटेल 1 बळी)
भारत पहिला डाव 62.2 षटकांत सर्वबाद 189 (केएल राहुल 39, वॉशिंग्टन सुंदर 29, पंत 27, जडेजा 27, ध्रुव जुरेल 14, अक्षर पटेल 16, हार्मर 4 बळी, यान्सेन 3 बळी).
शुभमन 3 चेंडू खेळला अन् लगेच माघारी गेला
भारतीय कर्णधार शुभमन गिलला फलंदाजी दरम्यान दुखापत झाली. त्याने फक्त 3 चेंडूंत 4 धावा केल्या. हार्मरचा एक चेंडू खेळताना त्याने बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकार मारला, पण त्याचवेळी त्याची मान दुखू लागली. फिजिओ लगेचच मैदानात आले, मात्र गिलला रिटायर्ड हर्ट होऊन परतावे लागले. ही घटना 35 व्या षटकानंतरच्या ड्रिंक्स ब्रेकनंतर घडली. गिल फक्त रिटायर्ड हर्टच झाला नाहीत, तर दुसऱ्या दिवशीही त्याने मैदानावर पाऊल ठेवले नाही. त्याच्या अनुपस्थितीत ऋषभ पंत टीमची जबाबदारी सांभाळताना दिसला.
जडेजाची विक्रमी कामगिरी

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा दिग्गज फिरकीपटू रविंद्र जडेजाने दुसऱ्या डावात 4 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. यासह त्याने भारतीय मैदानात 250 विकेट्सचाही पल्ला गाठला. अशी कामगिरी करणारा तो चौथा भारतीय गोलंदाज ठरला आहे.

भारतीय मैदानात 250 किंवा त्याहून अधिक बळी घेणारे गोलंदाज
आर. अश्विन – 383
अनिल कुंबळे – 350
हरभजन सिंग – 265
रवींद्र जडेजा – 250

जडेजा या कसोटी सामन्यात 4000 धावा आणि 300 पेक्षा अधिक विकेटचा खास विक्रमही आपल्या नावे केला. अशी कामगिरी करणारा तो चौथा अष्टपैलू खेळाडू आहे. आपला 88 वा कसोटी सामना खेळणाऱ्या जडेजाने आफ्रिकेविरुद्ध 10 धावा करताच कसोटीत 4000 धावांचा टप्पा पूर्ण केला. याशिवाय, कसोटीत त्याच्या नावे 338 बळींची नोंद आहे. दरम्यान, कसोटीत 4000 हून धावा आणि 300 हून अधिक गडी बाद करण्याची कामगिरी दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव, इंग्लंडचा इयाम बॉथम आणि न्यूझीलंडच्या डॅनियल व्हिटोरी यांनी केली आहे.