दोन्ही रेल्वेगेट वाहतुकीसाठी बंद, औद्योगिक कर्मचाऱ्यांची गैरसोय

टिळकवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी : काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी बेळगाव : अनगोळ येथील चौथे रेल्वेगेट तसेच तिसरे रेल्वेगेट येथील उड्डाण पूल हे वाहतुकीसाठी बंद झाले आहे. त्यामुळे उद्यमबाग औद्योगिक वसाहतीतील कामगार तसेच पूर्व पश्चिम भागातील व आसपासच्या परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात पंचाईत झाली आहे. गेल्या जून महिन्यापासून अनगोळ येथील चौथे रेल्वेगेट येथे भुयारी मार्गाचे काम सुरू असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात […]

दोन्ही रेल्वेगेट वाहतुकीसाठी बंद, औद्योगिक कर्मचाऱ्यांची गैरसोय

टिळकवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी : काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी
बेळगाव : अनगोळ येथील चौथे रेल्वेगेट तसेच तिसरे रेल्वेगेट येथील उड्डाण पूल हे वाहतुकीसाठी बंद झाले आहे. त्यामुळे उद्यमबाग औद्योगिक वसाहतीतील कामगार तसेच पूर्व पश्चिम भागातील व आसपासच्या परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात पंचाईत झाली आहे. गेल्या जून महिन्यापासून अनगोळ येथील चौथे रेल्वेगेट येथे भुयारी मार्गाचे काम सुरू असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतीत, पिरनवाडी, खादरवाडी, केएलई इंजिनिअरिंग कॉलेज, जीआयटी महाविद्यालय तसेच पश्चिम भागात जाण्यासाठी तिसरे रेल्वेगेटवरील उड्डाणपूल हा एक मार्ग नागरिकांसाठी महत्त्वाचा आहे. पण या उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे व वाहतुकीचा ताण त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन जावे लागत होते. त्यामुळे अनगोळ भागातील माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते विनायक गुंजटकर यांनी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी महापालिका बुडा अधिकाऱ्यांपासून ते आमदार खासदार रेल्वे राज्यमंत्री यांच्यापर्यंत निवेदने दिली.
प्रसंगी रास्तारोको, उपोषण, धरणे आंदोलनाचा मार्ग स्वीकाराला. याचेच फलित म्हणून या उड्डाणपुलाच्या कामाला सुऊवात झाली. या उड्डाणपुलाच्या कामामुळे रस्ता बंद झाला आणि पहिले व दुसरे रेल्वेगेट येथे वाहतुकीचा ताण वाढला. त्यामुळे टिळकवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पहावयास मिळत आहे. तसेच रेल्वे स्टेशनवरून रेल्वे गाडी आल्यास दोन्ही गेट एकाच वेळी बंद होत असल्याने वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तासन्तास वाहतूक कोंडीत वाहन घेऊन थांबावे लागत आहे. त्यामुळे अनगोळ व परिसरातील कर्मचारी, दुकानदार, कारखानदार मालक, विद्यार्थी, कॉलेजमधील अधिकारी नागरी औधोगिक वसाहतीत जाण्यासाठी चौथे रेल्वेगेट येथील मुख्य रस्त्यावर राजू किचन समोर तसेच शिवशक्तीनगर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात आपली वाहने उभी करून चालत जात आहेत. त्यामुळे या परिसरात वाहनांचा तळ दिसत आहे. नागरिक, विद्यार्थी, कामगारवर्ग, महाविद्यालयीन कर्मचारी या ठिकाणी आपली वाहने उभी करून पायी चालत जात आहेत. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या दिसून येत आहे.
विद्यार्थी अन् शेतकऱ्यांचे हाल
चौथे रेल्वेगेट व तिसरे रेल्वेगेट बंद झाल्यामुळे शालेय विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थी आणि अनगोळ गावातील शेतकरी बांधव यांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना पहावयास मिळत आहेत. संत रोहिदासनगर मजगाव येथील शालेय विद्यार्थी व अनगोळ, वडगाव, शहापूर तसेच इतर भागातून केएलई महाविद्यालय जीआयटी महाविद्यालय मजगाव येथील विद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फटका बसत आहे. एकतर पहिल्या व दुसऱ्या रेल्वेगेटचा वापर करावा लागत आहे नाहीतर चौथे रेल्वेगेट येथे आपले वाहन उभे करून चालत जावे लागत आहे.
आणि शालेय विद्यार्थ्यांना आपल्या घरापासून दप्तराचे ओझे घेऊन चौथे रेल्वेगेट इथपर्यंत चालत येऊन रिक्षात बसावे लागत आहे. तर चन्नम्मानगर येथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना संपूर्ण टिळकवाडीला वळसा घालून जावे लागत आहे. अनगोळ येथील शेतकरी बांधवांची शेती ही कांही प्रमाणात अनगोळ जैतनमाळ येथे आहे त्यामुळे रस्ता बंदचा फटका शेतकरी बांधवांनाही झाला आहे. कांही शेतकऱ्यांनी आपली जनावरे शेतात बांधून ठेवली आहेत. त्यामुळे रोज सकाळी -संध्याकाळी त्यांनीही फिरून जावे लागत आहे. तर शेतातील गवत अनगोळ येथे आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे याचा फटका सर्व घटकांना बसत आहे.