पुस्तके मुलापर्यंत न्यायला हवीत!

सार्वजनिक वाचनालयातर्फे मराठी भाषा दिनानिमित्त चर्चासत्रात मान्यवरांचे मत बेळगाव : मराठी शाळांची दुरवस्था, वाचनापासून तुटत चाललेले विद्यार्थी, मातृभाषेतून शिक्षण घेण्याकडे पालकांचे झालेले दुर्लक्ष, या परिस्थितीला पालक, शिक्षक, प्राध्यापक हेच जबाबदार आहेत. मुले ग्रंथालयात येत नाहीत तर पुस्तके त्यांच्यापर्यंत न्यायला हवी व पुन्हा आपणच शाळेकडे जायला हवे, असा सूर मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित चर्चासत्रात व्यक्त झाला. […]

पुस्तके मुलापर्यंत न्यायला हवीत!

सार्वजनिक वाचनालयातर्फे मराठी भाषा दिनानिमित्त चर्चासत्रात मान्यवरांचे मत
बेळगाव : मराठी शाळांची दुरवस्था, वाचनापासून तुटत चाललेले विद्यार्थी, मातृभाषेतून शिक्षण घेण्याकडे पालकांचे झालेले दुर्लक्ष, या परिस्थितीला पालक, शिक्षक, प्राध्यापक हेच जबाबदार आहेत. मुले ग्रंथालयात येत नाहीत तर पुस्तके त्यांच्यापर्यंत न्यायला हवी व पुन्हा आपणच शाळेकडे जायला हवे, असा सूर मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित चर्चासत्रात व्यक्त झाला. सार्वजनिक वाचनालयातर्फे मराठी भाषा दिनानिमित्त हे चर्चासत्र पार पडले. अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष गोविंद राऊत होते. चर्चासत्राचे संचलन प्रा. विनोद गायकवाड यांनी केले. या चर्चेमध्ये मराठीची आजची स्थिती काय आहे, मराठी शाळांची दुरवस्था का होत आहे, इंग्रजीकडे कल का वाढतो आहे, पाठ्यापुस्तके अचूक आहेत का, आणि आपण काय करू शकतो, अशा विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. इंग्रजी ही रोजगार देणारी भाषा आहे, असा समज वाढीस लागला आहे. जोपर्यंत आपली भाषा रोजगार देणार नाही तोपर्यंत आपल्या भाषेकडे तरुण वळणार नाहीत, असा एक मुद्दा चर्चेत आला.
मातृभाषेतून शिकलेला विद्यार्थी कॉलेजमध्ये जेव्हा इंग्रजी अभ्यासक्रमाला सामोरे जातो, तेव्हा फाडफाड इंग्रजी येत नसल्याने त्यांच्यामध्ये एक न्यूनगंड येते. पालक वाचत नाहीत. त्यामुळे मुलांनी वाचावे, अशी अपेक्षा करणे गैर आहे. विचार किंवा भाषा कृत्रिमरित्या टिकवता येत नाही, असे काही मुद्दे वक्त्यांनी उपस्थित केले. मात्र, अलीकडे काळानुरुप अभ्यासक्रम बदलत आहे, असेही मत व्यक्त झाले. बोलीभाषा आणि प्रमाणभाषा यांच्याबाबतचे मतभेद वाढत आहेत. पण दर मैलावर बोलीभाषा बदलते. त्या भाषेचे उपजत सौंदर्य आहेच. परंतु प्रमाणभाषाही सर्वव्यापी असल्याने तिचा वापर महत्त्वाचा असेही सांगण्यात आले. शिक्षक आणि प्राध्यापक हे अलीकडे राजकीय पटलावर दिसत आहेत. शाळेत कमी आणि बाहेर जास्त असे जर शिक्षक करू लागले तर शिक्षणाकडे दुर्लक्ष होईल, असा गंभीर मुद्दाही चर्चेत आला. बेळगावमधील विविध माध्यमांचे पत्रकार, शिक्षक, ग्रंथपाल, निवृत्त प्राध्यापक यांनी या चर्चेत भाग घेतला. प्रारंभी गोविंद राऊत यांनी स्वागत केले. लता पाटील यांनी गुलाबपुष्प दिले. रघुनाथ बांडगी यांनी आभार मानले. यावेळी वाचनालयाचे पदाधिकारी ईश्वर मुचंडी, अनंत लाड, सुनिता मोहिते आदी उपस्थित होते.
मराठीसाठी वेळ देणे आवश्यक
या सर्व पार्श्वभूमीवर शाळा दत्तक घेणे, शिक्षक, प्राध्यापक यांना एका व्यासपीठावर आणून त्यांचे वाचन, लेखन याबाबत मत जाणून घेणे आणि शाळा-शाळांमध्ये पुस्तक पेटी सुरू करणे व आपणच शाळेमध्ये पुन्हा जाऊन मराठीसाठी वेळ देणे आवश्यक आहे, असा निष्कर्ष निघाला.