पुस्तक महोत्सव म्हणजे ज्ञानप्राप्तीची सुवर्णसंधी!

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : गोवा पुस्तक महोत्सवाचे शानदार उद्घाटन : पाच दिवसीय महोत्सवात पुस्तकांची 200 दालने पणजी : गोव्यात प्रथमच आयोजित होत असलेला राष्ट्रीय पुस्तक महोत्सव हा केवळ एक मेळावा किंवा सोहळा नसून देशभरातील वाचक, लेखक, प्रकाशक, विचारवंत आणि खास करून विद्यार्थी यांच्यासाठी ज्ञानप्राप्तीची एक सुवर्णसंधी आहे. प्रत्येकाने तिचा फायदा करून घ्यावा. […]

पुस्तक महोत्सव म्हणजे ज्ञानप्राप्तीची सुवर्णसंधी!

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : गोवा पुस्तक महोत्सवाचे शानदार उद्घाटन : पाच दिवसीय महोत्सवात पुस्तकांची 200 दालने
पणजी : गोव्यात प्रथमच आयोजित होत असलेला राष्ट्रीय पुस्तक महोत्सव हा केवळ एक मेळावा किंवा सोहळा नसून देशभरातील वाचक, लेखक, प्रकाशक, विचारवंत आणि खास करून विद्यार्थी यांच्यासाठी ज्ञानप्राप्तीची एक सुवर्णसंधी आहे. प्रत्येकाने तिचा फायदा करून घ्यावा. त्यातून नवीन कवी, लेखक, साहित्यिक निर्माण होतील व त्यातूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित भारताची मुहूर्तमेढ रोवली जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.
नॅशनल बूक ट्रस्ट-इंडिया, लोकमान्य कल्चरल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आणि ‘अॅन ओशन ऑफ स्टोरीज’ म्हणजे कथांचा महासागर या संकल्पनेवर आधारित गोवा पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. पणजीत कांपाल येथील गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर सुमारे 200 स्टॉल्स आणि लाखो पुस्तकांच्या साक्षिने झालेल्या या भव्य सोहळ्यास व्यासपीठावर त्यांच्यासोबत लोकमान्य कल्चरल फाउंडेशनचे अध्यक्ष तथा महोत्सवाचे प्रमुख आश्रयदाते डॉ. किरण ठाकुर, शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, क्रीडा संचालक अजय गावडे, नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. मिलिंद मराठे, संचालक युवराज मलिक, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, आदी मान्यवर उपस्थित होते.
…म्हणूनच लेखक निर्माण होतात
पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, देशात आज वाचन संस्कृती वाढीस लागली आहे. हल्लीच दिल्लीत आयोजित अशाच नऊ दिवसांच्या पुस्तक महोत्सवात तब्बल 500 कोटीची पुस्तके लोकांनी खरेदी केली. यावरून लोक पुस्तके वाचतात हेच सिद्ध होत आहे व वाचक आहेत म्हणूनच लेखकही निर्माण होत आहेत, नव्या पिढीली लिहिण्यासाठी हुऊप येत आहे, असे सांगितले.
पालकांनी मुलांना महोत्सवात आणावे
या महोत्सवात अधिकाधिक मुले यावी यासाठी शिक्षण खात्याने खास व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर पालकांनीही मुलांना सोबत घेऊन या महोत्सवात यावे. नुकत्याच पार पडलेल्या लोकोत्सवात लाखो लोकांनी भेट दिली. त्यामुळे रोज रात्री  रस्ते गर्दीने भरून जात असत. तीच गर्दी पुस्तक प्रदर्शनालाही दिसावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
गोव्यातील लोक तृप्त, संयमी, आध्यात्मिक
देश आणि जगभरात गोमंतकीय म्हणजे ‘सुशेगाद लोक’ अशी ओळख आहे. त्याचा खरा अर्थ येथील लोक तृप्त, शांत, संयमी आणि तेवढेच संस्कृतीप्रियही आहेत, असा आहे. म्हणुनच हल्लीच्या वर्षांमध्ये गोव्यातून हजारोंच्या संख्यने लोक शिरडी, पंढरपूर आदी स्थळांच्या पायी वाऱ्या करू लागले आहेत. यावरून गोव्याची संस्कृती आणि वाचनप्रियतेचे दर्शन घडते, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केले.
गोवा साहित्य निर्मितीची 500 वर्षे
प्रा. मिलिंद मराठे यांनी बोलताना,अभूतपूर्व असा हा साहित्य सोहळा आयोजित करण्याची संधी मिळाल्याबद्दल अत्यानंद होत असल्याचे सांगितले. गोव्यात साहित्यनिर्मिती प्रारंभ झाल्यास यंदा 500 वर्षे पूर्ण होत आहेत. याच भूमीने जागतिक किर्तीचे साहित्यिक, गायक, संगीतकार, कवी निर्माण केले. 1235 कादंबऱ्या लिहून विश्वविक्रम करणारे गुऊनाथ नाईक यांच्यासारखे कादंबरीकार जगाला दिले. अशा भूमीत हा पुस्तक महोत्सव होत असून भविष्यात गोव्याच्या परंपरेला साजेसे नवीन साहित्यकार निर्माण करणे, तसेच वाचन संस्कृती वाढविणे हा या महोत्सवाचा उद्देश असल्याचे ते म्हणाले. विकसित वाचक निर्माण झाला तरच विकसित भारत निर्माण होईल, असेही त्यांनी नमूद केले. युवराज मलिक यांनी आभार मानले.
पाच दिवस चालणार महोत्सव
दरम्यान दि. 8 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात देशपातळीवरील लेखक, साहित्यिक, वाचक, महनीय व्यक्ती आणि विद्यार्थी असे किमान दोन लाख लोक भेट देतील अशी अपेक्षा आहे. रोज सकाळी 11 ते रात्री 8 या दरम्यान तो खुला राहणार आहे. तेथे प्रवेश विनामूल्य असेल व साहित्यप्रेमींना सर्व पुस्तकांवर 10 टक्के सवलतही देण्यात येणार आहे. महोत्सवात देशभरातील नामांकित लेखक, पत्रकार, विचारवंत, तत्वज्ञ, सर्जनशील व्यक्ती आदी मान्यवर विविध माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधतील. त्यात ज्येष्ठ लेखक उदय माहूरकर, प्रसिद्ध अभिनेत्री, मृणाल कुलकर्णी, अभिनेत्री अविका गौर, ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला, एसी, भारतीय हवाई दलाचे चाचणी वैमानिक आणि अंतराळवीर लेखक शांतनू गुप्ता, चित्रपट निर्माते चंद्रप्रकाश द्विवेदी, इतिहासकार मोहन शेट्यो, विदुषी आणि लेखिका मेधा खासगीवाले, माजी परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर, कायदेतज्ञ सुमंत बत्रा, अभिनेता अमोल पाराशर, अभिनेता सचिन पिळगावकर, प्रसिद्ध तत्त्वज्ञ सदानंद श्रीधर मोरे, तत्त्वज्ञ आचार्य प्रशांत यांचा समावेश असेल.
खरी मजा पुस्तक हातात धरून वाचण्यातच
मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की संगणक आणि मोबाईलच्या आजच्या जमान्यात बरेच लोक ऑनलाईन पुस्तके वाचू लागले आहेत, परंतु वाचनाची खरी मजा प्रत्यक्ष पुस्तक हातात धरून वाचण्यातच आहे. प्रत्यक्ष पुस्तक वाचण्यात जो आनंद आणि सुगंध मिळतो तो मोबाईलमध्ये मिळत नाही, हेच सत्य आहे. त्याचबरोबर  पुस्तकात आपण जो छापील मजकूर वाचतो, तोच मजकूर आपल्या कायम स्मरणात राहतो, मोबाईलवर जे वाचतो ते लगेच विसरुनही जातो, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
पुस्तक महोत्सव दरवर्षी गोव्यातच घेण्याची तयारी
हल्लीच्या वर्षांमध्ये गोव्यात अनेक महोत्सव आयोजित करण्यात येतात आणि ते यशस्वीही होतात. एकट्या या भाऊसाहेब बांदोडकर मैदानावरच खाण्यापासून पिण्यापर्यंत असे डझनभर तरी महोत्सव वर्षभरात होतात. त्यात आता भव्य अशा पुस्तक महोत्सवाचीही भर पडली आहे, याचा आम्हाला आनंद आहे, कारण वाचन हेच चिरंतन राहणार आहे. त्यामुळे हा महोत्सव दरवर्षी गोव्यात आयोजित करण्यात एनबीटी पुढाकार घेत असेल तर गोवा सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासनही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आपल्या भाषणातून दिले.
… तेव्हाच देश प्रगती करतो : डॉ. किरण ठाकुर
कार्यक्रमात प्रारंभी डॉ. किरण ठाकुर यांच्याहस्ते व्यासपीठावरील मान्यवरांचा गौरव करण्यात आला. त्यानंतर डॉ. ठाकुर यांनी स्वागत केले. यावेळी बोलताना त्यांनी, ‘जेव्हा प्रत्येक नागरिक वाचन करतो तेव्हाच देश प्रगती करतो’, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाची आठवण करून दिली. त्याच धर्तीवर हा पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात आल्याचे ते म्हणाले. या एका महोत्सवात पाच उत्सव असणार आहेत. एकाच ठिकाणी लाखो पुस्तकांची मांदियाळी हे या महोत्सवाचे वैशिष्ट्या असून डोळ्यांचेही पारणे फिटेल असा हा सोहळा होणार आहे, असे ते म्हणाले.
गोवा म्हणजे देवदेवतांची भूमी असून येथील सुंदर मंदिरे ही त्याची साक्ष आहे. म्हणूनच त्याला दक्षिणेची काशी असेही म्हटले जाते. त्याचबरोबर गोव्यात धार्मिक सलोखा, एकमेकांचा आदर करणारे लोक आहेत, हे गोव्याचे वैशिष्ट्या आहे. भारत ही बुद्धीमत्तेची भूमी असून ख्रिस्तपूर्व काळापूर्वीपासून तक्षशिला, नालंदा यासारखी लाखो पुस्तकांचा खजिना स्वत:मध्ये साठविणारी विद्यापीठे अभिमानने मिरविणारी ही भूमी होती. म्हणुनच बुद्धीमत्तेच्या बाबतीत भारताचा जगात दबदबा होता, असे डॉ. ठाकुर यांनी सांगितले.