बोर्ड परीक्षा होणारच!

पाचवी, आठवी, नववी परीक्षेला सोमवारपासून पुन्हा प्रारंभ : उच्च न्यायालयाचा राखून ठेवलेला निकाल जाहीर प्रतिनिधी/ बेंगळूर राज्याचा अभ्यासक्रम शिकविणाऱ्या सर्व शाळांमधील पाचवी, आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाच्या धर्तीवर परीक्षा घेण्यास उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपीठाने परवानगी दिली आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षकांमध्ये परीक्षेविषयी असणारा संभ्रम दूर झाला आहे. दरम्यान, राज्य शालेय शिक्षण खात्याने 25 मार्चपासून पाचवी, […]

बोर्ड परीक्षा होणारच!

पाचवी, आठवी, नववी परीक्षेला सोमवारपासून पुन्हा प्रारंभ : उच्च न्यायालयाचा राखून ठेवलेला निकाल जाहीर
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्याचा अभ्यासक्रम शिकविणाऱ्या सर्व शाळांमधील पाचवी, आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाच्या धर्तीवर परीक्षा घेण्यास उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपीठाने परवानगी दिली आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षकांमध्ये परीक्षेविषयी असणारा संभ्रम दूर झाला आहे. दरम्यान, राज्य शालेय शिक्षण खात्याने 25 मार्चपासून पाचवी, आठवी, नववीचे उर्वरित पेपर घेण्याचा आदेश दिला आहे.
25 मार्चपासून दहावी वार्षिक परीक्षेला प्रारंभ होत आहे. दहावीचे पेपर असणाऱ्या दिवशी म्हणजेच सोमवार 25 मार्च, बुधवार 27 मार्च रोजी दुपारच्या कालावधीत आणि मंगळवार 26 मार्च आणि गुरुवार 28 मार्च रोजी सकाळच्या कालावधीत परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
पाचवी, आठवी आणि नववीसाठी बोर्डाची परीक्षा घेण्यास उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपीठाने ग्रीन सिग्नल दिला आहे. स्थगित झालेले पेपर 25 मार्चपासून घेता येतील, असे सरकारने न्यायालयात सांगितले आहे. न्या. के. सोमशेखर, न्या. के. राजेश रै यांच्या नेतृत्त्वातील विभागीय खंडपीठाने यापूर्वी सुनावणी करून राखून ठेवलेला निर्णय शुक्रवारी जाहीर केला. तसेच पुढील परीक्षांच्या काळात संबंधितांशी चर्चा करून सरकारने निर्णय घ्यावेत, अशी सूचना न्यायालयाने शिक्षण खात्याला दिली आहे.
राज्य सरकारने पाचवी, आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाच्या धर्तीवर परीक्षा घेण्याची अधिसूचना जारी केली होती. मात्र, त्यावर खासगी शाळा व्यवस्थापन संघटनांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाच्या एकसदस्यीय पीठाने राज्य सरकारची परीक्षेसंबंधीची अधिसूचनाच रद्द केली होती. त्याविरोधात सरकारने उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाकडे धाव घेतली. दरम्यान, न्यायालयाने बोर्डाची परीक्षा घेण्यास संमती दिल्याने शिक्षण खात्याने नियोजित वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेण्याची सूचना दिली. त्यानुसार 11 आणि 12 मार्च रोजी अनुक्रमे प्रथम भाषा आणि द्वितीय भाषा विषयांचे पेपर पार पडले. परंतु, खासगी शाळा व्यवस्थापन संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केल्याने बोर्डाची परीक्षा रद्द करण्याचा आदेश दिला. तसेच त्यावरील पुढील सुनावणी पूर्ण करण्याची सूचना कर्नाटक उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपीठाला दिली होती. सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने शिक्षण खात्याने परीक्षा पुढील आदेशापर्यंत लांबणीवर टाकली होती.
अखेर उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपीठाने सोमवार 18 मार्च रोजी वाद-युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर निकाल राखून ठेवला होता. आता शुक्रवारी राखून ठेवलेला निकाल न्यायालयाने जाहीर केला आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने सायंकाळी उर्वरित पेपर घेण्याकरिता सुधारित वेळापत्रकासह अधिकृत आदेशपत्रक जारी केले.
विद्यार्थी, पालकांमधील संभ्रम दूर
पाचवी, आठवी, नववी परीक्षेचे प्रकरण न्यायालयात गेल्याने परीक्षेसंबंधी अनिश्चितता निर्माण झाली होती. परीक्षा सुरू होऊन दोन पेपर झाल्यानंतर पुन्हा स्थगिती मिळाल्याने परीक्षा होणार की रद्द होणार, याविषयी विद्यार्थी व पालकांत संभ्रम निर्माण झाला होता. दहावी परीक्षा तोंडावर आलेली असताना पाचवी, आठवी, नववीच्या परीक्षेचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अखेर उच्च न्यायालयाने निकाल देऊन बोर्डाच्या परीक्षेविषयी असणाऱ्या गोंधळावर पडदा टाकला आहे.
पाचवी परीक्षेचे वेळापत्रक
तारीख              विषय                    वेळ
25/3/24  परिसर अध्ययन   दु. 2:30 ते 4:30
26/3/24 गणित               स. 10:00 ते 12:00
आठवी – नववी परीक्षेचे वेळापत्रक
तारीख              विषय                     वेळ
25/3/24  तृतीय भाषा    (आठवी)          दु. 2:30 ते सायं. 5:00
तृतीय भाषा    (नववी)  दु. 2:00 ते सायं. 5:00
26/3/24 गणित (आठवी)     स. 10:00 ते दु. 12:30
गणित (नववी)       स. 10:00 ते दु. 1:15
27/3/24 विज्ञान (आठवी)          दु. 2:30 ते सायं. 5:00
विज्ञान (नववी)      दु. 2:00 ते सायं. 5:15
28/3/24 समाज (आठवी)     स. 10:00 ते दु. 12:30
समाज (नववी)       स. 10:00 ते दु. 1:15