बाजारात आंब्यांचा बहर

आवक वाढली : दरात घसरण, आंबाप्रेमींना दिलासा बेळगाव : फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हापूस आंब्याबरोबर इतर आंब्यांची आवक वाढू लागली आहे. त्यामुळे दरात घसरण होत आहे. परिणामी सर्वसामान्यांना आंब्यांची चव चाखता येऊ लागली आहे. यंदा आंबा उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे आंब्यांचे दर गगनाला भिडले होते. मात्र, आता स्थानिक आंबाही दाखल झाल्यानंतर दर काहीसे […]

बाजारात आंब्यांचा बहर

आवक वाढली : दरात घसरण, आंबाप्रेमींना दिलासा
बेळगाव : फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हापूस आंब्याबरोबर इतर आंब्यांची आवक वाढू लागली आहे. त्यामुळे दरात घसरण होत आहे. परिणामी सर्वसामान्यांना आंब्यांची चव चाखता येऊ लागली आहे. यंदा आंबा उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे आंब्यांचे दर गगनाला भिडले होते. मात्र, आता स्थानिक आंबाही दाखल झाल्यानंतर दर काहीसे खाली आले आहेत. बेळगाव बाजारपेठेत मालवण, रत्नागिरी, देवगड येथून हापूस मोठ्या प्रमाणात दाखल होऊ लागला आहे. त्याबरोबरच बेळगाव, धारवाड येथील स्थानिक आंबाही येऊ लागला आहे. त्यामुळे बाजारपेठ आंब्यांनी बहरू लागली आहे. होलसेल बाजारात हापूस आंबा प्रति डझन 1100 ते 2000 रुपयांवरून 600 ते 1100 रुपयांपर्यंत आला आहे. स्थानिक आंबा प्रति डझन 200 ते 600 रुपयांवरून 100 ते 500 रुपयांवर आला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आंबा खरेदी करणे सोयीस्कर होऊ लागले आहे. बेळगाव जिल्ह्यात आंबा पिकाचे क्षेत्र 3600 हेक्टर आहे. मात्र, वातावरण बदलाचा परिणाम बागायतीवर झाला आहे. हेक्टरी सरासरी उत्पादन 3 ते 4 टन होते. गतवर्षी आंब्याचे उत्पादन सर्वात कमी झाले होते. मात्र, यंदा काही ठिकाणी आंब्याचे उत्पादन समाधानकारक झाले आहे. येत्या 10 मे रोजी अक्षय्यतृतीया असल्याने आंब्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होईल, असा अंदाज विक्रेत्यांनी वर्तविला आहे.
सर्वसामान्यांची स्थानिक आंब्यांकडे नजर
दरवर्षी स्थानिक आंबा बाजारात दाखल झाल्यानंतर दर काहीसे कमी होतात. त्यामुळे सर्वसामान्यांची स्थानिक आंब्यांकडे नजर असते. त्याप्रमाणे मे महिन्यात आंब्यांचे दर काही प्रमाणात खाली आले आहेत. बाजारात हापूस, तोतापुरी, मानकूर आणि इतर जातींचे आंबे दिसून येत आहेत. शहरातील विविध चौकांमध्ये आणि बाजारपेठेत ग्रामीण भागातील विक्रेते आंब्याची विक्री करत आहेत. तसेच ग्राहकांकडून आंब्यांची खरेदी वाढू लागली आहे.