नेहाच्या हत्येविरोधात भाजपचे आज आंदोलन

खासदार मंगला अंगडी यांची माहिती : मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन बेळगाव : हुबळी येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी नेहा हिरेमठ हिच्या हत्येचा महिला हितरक्षण वेदिकेकडून तीव्र निषेध करण्यात येत आहे. यासाठी सोमवार दि. 22 रोजी शहरात मोठ्या प्रमाणात मोर्चा काढून आंदोलन करण्यात येणार असल्याचे खासदार मंगला अंगडी यांनी सांगितले. भाजपच्या शहरातील कार्यालयामध्ये प्रसार माध्यमाशी बोलताना […]

नेहाच्या हत्येविरोधात भाजपचे आज आंदोलन

खासदार मंगला अंगडी यांची माहिती : मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
बेळगाव : हुबळी येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी नेहा हिरेमठ हिच्या हत्येचा महिला हितरक्षण वेदिकेकडून तीव्र निषेध करण्यात येत आहे. यासाठी सोमवार दि. 22 रोजी शहरात मोठ्या प्रमाणात मोर्चा काढून आंदोलन करण्यात येणार असल्याचे खासदार मंगला अंगडी यांनी सांगितले. भाजपच्या शहरातील कार्यालयामध्ये प्रसार माध्यमाशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. नेहा हिरेमठ हिच्या हत्येचा आपण तीव्र निषेध करत आहोत. हत्या झालेल्या नेहाला न्याय मिळावा यासाठी सोमवार दि. 22 रोजी आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनामध्ये हजारो महिला भाग घेणार आहेत. अशा घटना पुन: पुन्हा होत असल्याने या विरोधात कडक भूमिका घेणे गरजेचे आहे. शहरालगत वंटमुरी येथील घटनेला चार महिन्यांचा कालावधी उलटतो न उलटतो तोच आता हुबळी येथील घटना घडली आहे. यासाठीच हे आंदोलन छेडण्यात येत आहे. या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार अंगडी यांनी केले.
यावेळी भाजपचे नेते एम. बी. जिरली यांनी हुबळीतील घटनेचा निषेध करतो, असे सांगून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली. नेहाबाबत सोशल मीडियावर खोट्या पोस्ट घातल्या जात आहेत. या जिहादी प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली. नेहाला न्याय मिळेतोपर्यंत आंदोलन केले जाईल. ही हत्या महाविद्यालयाच्या आवारात दिवसाढवळ्या घडली आहे. यामुळे पालकांमध्ये मुलांच्या शिक्षणाबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. हत्या झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडून आलेल्या प्रतिक्रिया अत्यंत अशोभनीय आहेत, असेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी राज्य भाजप उपाध्यक्ष अनिल बेनके, महापौर सविता कांबळे, महानगर अध्यक्षा गीता सुतार, जिल्हा ग्रामीण अध्यक्ष सुभाष पाटील, माजी आमदार संजय पाटील, सिद्दनगौडा पाटील, हणमंत कोंगाली आदी उपस्थित होते.