भाजपकडून विविध धर्मांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न

कारवार केपीसीसीचे कार्याध्यक्ष मंजुनाथ भंडारी यांचा आरोप कारवार : एनडीए नेतृत्वाखालील विद्यमान केंद्र सरकारला पुन्हा सत्तेवर येणार नाही. याची खात्री पटल्याने भाजप विविध धर्माच्या नागरिकांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप केपीसीसीचे कार्याध्यक्ष मंजुनाथ भंडारी यांनी केला. ते आज मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, धर्माच्या नावाखाली गोंधळाची परिस्थिती निर्माण करून […]

भाजपकडून विविध धर्मांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न

कारवार केपीसीसीचे कार्याध्यक्ष मंजुनाथ भंडारी यांचा आरोप
कारवार : एनडीए नेतृत्वाखालील विद्यमान केंद्र सरकारला पुन्हा सत्तेवर येणार नाही. याची खात्री पटल्याने भाजप विविध धर्माच्या नागरिकांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप केपीसीसीचे कार्याध्यक्ष मंजुनाथ भंडारी यांनी केला. ते आज मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, धर्माच्या नावाखाली गोंधळाची परिस्थिती निर्माण करून भाजप मते मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. तथापी यावेळी मतदार भाजपवर विश्वास ठेवणार नाहीत. देश सोडून निघून जाताना ब्रिटिशांनी देशाचा खजाना संपूर्णपणे लुटला होता. अशा परिस्थितही देशाची राजकीय सुत्रे हाती घेतलेल्या काँग्रेसने देशवासियांच्या जीवनाला एक वेगळा आकार दिला होता. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भू सुधारणा कायदा अंमलात आणून शेतकरी वर्गाच्या जीवनात एक क्रांतिकारी आणि आमूलाग्र बदल घडवून आणला. सर्वांना राजकारणात येणे सोपे व्हावे म्हणून पंतप्रधान राजीव गांधी यांनी देशात राजकीय आरक्षण आणले. सर्व पंतप्रधानांनी कोणती ना कोणती योजना राबविली आहे.
यापूर्वीच्या सर्व काँग्रेस सरकारनी जनतेचे जीवनमान उंचाविण्याचा प्रयत्न केला आहे. तर भाजप जनतेच्या भावनांशी खेळ खेळत आहे. राष्ट्रप्रेमी-राष्ट्रद्रोही आदी प्रमाणपत्रे देणारे तुम्ही कोण? असा भाजपवाल्यांना प्रश्न केला. भंडारी पुढे म्हणाले, भाजपला चारशेहून अधिक जागा मिळणार असा दावा पंतप्रधान मोदी यांच्याकडून सुरुवातीपासून केला जात होता. तथापी मतदानाचे दोन टप्पे झाल्यानंतर मोदींना भाजपचे काय होणार हे कळून चुकले आहे. कोणत्याही परिस्थितीत पुन्हा निवडून यावे या उद्देशाने मोदी मंगळसूत्र, मुसलमान आदी विषयांचे भांडवल करीत आहेत. काळा पैसा देशात आणण्याचे, प्रत्येकवर्षी दोन कोटी रोजगार निर्माण करण्याचे, प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख जमा करण्याचे, दरवाढीवर नियंत्रण ठेवण्याचे दिलेली आश्वासने कधीच विरून गेली आहेत. यावेळी सुनील नाईक, शंभु शेट्टी, वेंकटेश हेगडे, रमेश दुभासी, अपूर्वा नाईक, विश्वनाथ गौड उपस्थित होते.