भाजपने स्वत:वर ओढवले संकट
दक्षिणेसाठी केंद्राकडून ऐनवेळी महिला उमेदवाराची मागणी : इच्छुक उमेदवारांसह नेते, कार्यकर्ते, हितचिंतकांनाही धक्का
पणजी : भाजपच्या केंद्रीय समितीने दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघासाठी आयत्यावेळी महिला उमेदवाराचा अट्टहास धरून गोव्यातील संभाव्य उमेदवारांना तसेच भाजप नेत्यांना मोठा धक्का दिला आहे. शिवाय ज्या महिलेचे नाव स्वत: केंद्रीय समितीने सूचवले आहे तिचे गोव्यातील भाजपसाठी योगदान काय? असा प्रश्न भाजपचे नेते एकमेकांना करीत असून समितीच्या या निर्णयाने गोवा भाजपमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. अचानकपणे महिला उमेदवार देऊन दक्षिण गोव्याची जागा गमवायची आणि काँग्रेसला बहाल करायची की काय? अशी शंका भाजप नेत्यांच्या मनात खदखदत असल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या महिला उमेदवार देण्याच्या धोरणामुळे संभाव्य उमेदवार निराश झाले असून त्या विरोधात कोणीही आवाज उठवू शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. भाजपच्या गोव्यातील नेत्यांनी दक्षिण गोव्यासाठी महिला उमेदवाराचा कधीही विचारच केला नव्हता, पण आता लोकसभा निवडणूक ऐन तोंडावर आलेली असताना केंद्रीय समितीने महिला उमेदवार लादण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यामुळे गोवा भाजपात असंतोष खदखदू लागला आहे.
उमेदवारांसह नेतेही आश्चर्यचकीत
भाजपकडे जिंकण्याची क्षमता असलेली सक्षम महिला उमेदवार दक्षिण गोव्यासाठी नाही, ही वस्तुस्थिती असताना तसा आग्रह धरण्यात आल्यामुळे भाजपचे गोव्यातील नेते, संभाव्य उमेदवारही आश्चर्यचकीत झाले आहेत. केंद्रीय समितीने जी महिला उमेदवार सूचवली आहे ती शेफाली वैद्य गोव्यात राहत नाही, तर ती पुणे-महाराष्ट्र येथील आहे. तिचे गोव्यासाठी, भाजपसाठी विशेष योगदान नसताना तिचे नाव केंद्रीय समितीने कसे काय सुचवले? असा प्रश्न भाजपात निर्माण झाला आहे. भाजपच्या केंद्रीय समितीने दक्षिण गोवा लोकसभा निवडणुकीसाठी महिला उमेदवार म्हणून शेफाली वैद्य यांचे नाव सुचवल्याने त्या नावासह इतर काही महिलांची नावे केंद्राकडे पाठवण्याशिवाय भाजपच्या गाभा समितीसमोर (कोअर कमिटी) पर्याय राहिलेला नाही.
गाभा समितीची तातडीची बैठक
केंद्रीय समितीच्या सूचनेनुसार भाजपच्या गाभा समितीची तातडीची बैठक काल सोमवारी घेण्यात आली आणि त्यात एकूण पाच महिलांची नावे पेंद्रीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. शेफाली वैद्य यांचे एकट्याचेच नाव कसे पाठवणार? या विचाराने गाभा समितीने इतर काही महिलांची नावे पाठवण्याचे ठरविले आहे.
जागा हातून निसटून जाण्याची भीती व्यक्त
भाजपने आतापर्यंत दक्षिण गोव्यासाठी लोकसभा निवडणुकीकरीता महिला उमेदवार म्हणून कोणालाच पुढे पेलेले नव्हते. आता अचानक केंद्रीय समितीने महिला उमेदवाराची मागणी केल्यामुळे भाजपची गाभा समितीची तारांबळ उडाली आहे. महिला उमेदवार दिल्यास दक्षिण गोव्याची जागा पुन्हा एकदा भाजपच्या हातातून निसटू शकते, असा मतप्रवाह भाजपमध्ये सुरू झाला आहे.
गोवा भाजपला न उमगलेले कोडे?
दक्षिण गोव्यातील भाजप उमेदवारीसाठी आता शेफाली वैद्य यांच्यासह सुवर्णा तेंडुलकर, विद्या गावडे, सुलक्षणा सावंत, स्नेहा भागवत यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय समितीच्या सूचनेनुसार शेफाली वैद्य यांचे नाव आघाडीवर आहे. केंद्रीय समितीच्या महिला उमेदवार देण्याच्या धोरणानुसार वैद्य यांनाच उमेदवारी मिळण्याची जास्त संधी आहे. केंद्रीय समितीने दक्षिण गोव्यासाठी महिला उमेदवाराचा आग्रह का धरला? हे कोडे असून ते भाजपच्या गोव्यातील नेत्यांना, गाभा समितीला देखील उमगलेले नाही. केंद्राच्या या अचानक निर्णयामुळे गोवा भाजपला धक्काच बसला आहे
मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सुलक्षणांचेही नाव
आमदार किंवा मंत्र्यांच्या पत्नीची नावे उमेदवार म्हणून पाठवू नका, असे भाजप केंद्रीय समितीने स्पष्टपणे बजावले असतानाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची पत्नी सुलक्षणा सावंत याचे नाव पाठवले जाणार आहे. आपले नाव सूचवल्याबद्दल सौ. सावंत यांनी आनंद व्यक्त केला असून आपल्या कामाची पोचपावती मिळाली आणि ती मान्य आहे, असे त्यांनी म्हटले आहे. पक्ष उमेदवारीसाठी जे काही ठरवेल ते आपण मान्य करणार असून निवडून आणण्यासाठी सर्वजण मिळून कामे करू असे सौ. सावंत यांनी नमूद पेले.
दक्षिण गोव्यासाठी महिला उमेदवाराचा शोध : मुख्यमंत्र
दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने महिला उमेदवाराचा शोध सुरू केल्याने कदाचित महिला उमेदवार केडरमधील किंवा भाजप हितचिंतकही असू शकेल. परंतु जाहीर करण्यात येणाऱ्या उमेदवारासाठी जिंकण्याची पात्रता हाच निकष असेल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. काल सोमवारी भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे उपस्थित होते. उपाध्यक्ष दत्ता खोलकर, सभापती रमेश तवडकर, खजिनदार संजीव देसाई, नरेंद्र सावईकर, दामोदर नाईक, बाबू कवळेकर, आमदार नीलेश काब्राल, माजी खासदार विनय तेंडुलकर, आमदार दिगंबर कामत व इतर पदाधिकारीही उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळाने महिला उमेदवार शोधण्यासंबंधी सूचना केल्याने आम्ही कोअर कमिटीच्या बैठकीत यावर चर्चा केली. नरेंद्र सावईकर, बाबू कवळेकर व दामू नाईक ही तीन नावे दक्षिणेसाठी पाठवली होती. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आता या जागेसाठी महिलांची नावे मागितल्यानंतर प्रदेश भाजपने अशा महिलांचा शोध घेण्यास सुऊवात केलेली आहे. भाजप पदाधिकारी तसेच आमदारांशी चर्चा करून महिलांची नावे संसदीय समितीकडे पाठवण्यात येतील. महिलांची नावे पाठवल्यानंतर योग्य तो निर्णय घेऊन संसदीय समिती अंतिम नाव निश्चित करेल. हे नाव भाजपच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या यादीत जाहीर होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
सुलक्षणा सावंत ही इच्छुक
आपण गेली अनेक वर्षे भाजपसाठी कार्य करीत आले आहे. त्याची दखल घेऊन पक्षाने दक्षिण गोव्यासाठी आपल्या नावाची शिफारस केली, याचा आपणास आनंद आहे. आपल्या नावाची शिफारस करणाऱ्यांचे आपण मनापासून आभार मानते, अशी प्रतिक्रिया सौ. सुलक्षणा प्रमोद सावंत यांनी काल सोमवारी मडगावात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. दक्षिण गोव्यात भाजपच्या उमेदवारीसाठी महिला उमेदवारांची नावे पाठवा असा आदेश केंद्रातून आल्यानंतर शैफाली वैद्य व सौ. सुलक्षणा सावंत यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. यासंदर्भात सौ. सावंत म्हणाल्या की, महिला उमेदवार असणे ही महिलांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. भाजपने जर दक्षिण गोव्यात महिला उमेदवार दिला तर ती सर्व महिलांबरोबरच भारतीय जनता पार्टीसाठी मोठी अभिमानाची गोष्ट असेल तसेच तिला निवडून आणण्याची जबाबदारी सर्व महिला कार्यकर्त्यांची असेल. पक्षाचा निर्णय सर्वमान्य आणि सर्वांसाठी शिरसावंद्य असेल. पक्ष जो निर्णय घेईल, त्यासाठी सर्वांना मिळून काम करावे लागेल. ज्याला उमेदवारी मिळेल त्याच्यासाठी काम करावे लागेल.
वेट अँड वॉच … शेफाली वैद्य
भाजपची दक्षिण गोव्यातील उमेदवारी महिलांना देण्यात यावी, असा आदेश केंद्रातून आल्यानंतर शैफाली वैद्य यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली. या संदर्भात शैफाली वैद्य यांच्याशी संपर्क साधला असता, त्या म्हणाल्या की, ‘प्रतीक्षा करा आणि पहा’ (वेट अॅण्ड वॉच). आज मंगळवार दि. 5 किंवा बुधवार दि. 6 मार्च रोजी उमेदवार नक्की होईल अशी माहिती त्यांनी दिली. आपल्याशी उमेदवारी संदर्भात कोणी संपर्क साधलाय का, असा सवाल केला असता, त्यांनी ‘नो कॉमेन्टस्’ एवढेच भाष्य केले. शैफाली वैद्य या प्रखर हिंदुत्ववादी महिला आहेत. तसेच त्या थेट प्रधानमंत्री कार्यालयाशी ‘कनेक्ट’ आहेत. भाजपने राष्ट्रीय पातळीवर युवा उमेदवारांना संधी देण्याची मोहीम आखली आहे. त्याच मोहिमेचा एक भाग म्हणूनही केंद्रीय भाजपात शैफाली वैद्य यांच्याकडे पाहिले जात आहे. शैफाली वैद्य या मूळ कुंकळ्ळी गावच्या रहिवासी आहेत. वैयक्तिक कारणास्तव गेले आठ दिवस त्यांचा गोव्यात मुक्काम होता. काल सोमवारी त्या परत पुण्यात गेल्या आणि त्यानंतरच दक्षिण गोव्याची उमेदवारी महिलांना देण्यात यावी, असा आदेश निघाला आणि त्यांचे नाव चर्चेत आले. दक्षिण गोव्यात गेले काही दिवस भाजपचा उमेदवार कोण असावा यावरून बरीच चर्चा रंगली होती. त्यात पक्षाने सभापती रमेश तवडकर, आमदार दिगंबर कामत, माजी खासदार नरेंद्र सावईकर, माजी आमदार दामू नाईक व माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांची नावे दिल्लीत पाठविली होती. परंतु, भाजपच्या पहिल्या यादीत दक्षिण गोव्याच्या उमेदवारावर शिक्कामोर्तब होऊ शकले नाही. त्यात आता महिला उमेदवार शोधा, असा आदेश निघाल्याने जे इच्छुक होते, त्यांच्यामध्ये काहींशी नाराजी पसरली आहे. काही जणांचे दक्षिण गोव्याच्या उमेदवारीसाठी लॉबिंग सुरू होते तेही व्यर्थ ठरल्यात जमा आहे.
खरेच महिलांना उमेदवारी मिळणार की…?
कोणत्याही परिस्थितीत दक्षिण गोवा जिंकणे हा निकष भाजपने लावलेला आहे. अशा पार्श्वभूमीवर खरेच महिलांना उमेदवारी दिली जाणार का ? असा सवालही उपस्थित झालेला आहे. जर दक्षिण गोवा जिंकायचा असेल तर पुरूष उमेदवार पाहिजे, असा सूरही व्यक्त होत आहे. दक्षिण गोव्यात सासष्टी तालुक्यातील अल्पसंख्याक मतदार हे नेहमीच काँग्रेसच्या बाजूने राहतात. यावेळी देखील त्यात बदल होणार नाही. अशा पार्श्वभूमीवर महिला उमेदवार देण्याचा धोका भाजप पत्करणार का हे देखील पहावे लागणार आहे.


Home महत्वाची बातमी भाजपने स्वत:वर ओढवले संकट
भाजपने स्वत:वर ओढवले संकट
दक्षिणेसाठी केंद्राकडून ऐनवेळी महिला उमेदवाराची मागणी : इच्छुक उमेदवारांसह नेते, कार्यकर्ते, हितचिंतकांनाही धक्का पणजी : भाजपच्या केंद्रीय समितीने दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघासाठी आयत्यावेळी महिला उमेदवाराचा अट्टहास धरून गोव्यातील संभाव्य उमेदवारांना तसेच भाजप नेत्यांना मोठा धक्का दिला आहे. शिवाय ज्या महिलेचे नाव स्वत: केंद्रीय समितीने सूचवले आहे तिचे गोव्यातील भाजपसाठी योगदान काय? असा प्रश्न भाजपचे नेते […]