ग्रामपंचायत कार्यालयात आता बायोमॅट्रिक हजेरी

ग्रामपंचायत कार्यालयात आता बायोमॅट्रिक हजेरी

पंचायत खात्याचा प्रस्ताव
पणजी : राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमधील कर्मचारीवर्गासाठी बायोमॅट्रिक हजेरी लागू करण्याचा प्रस्ताव पंचायत खात्याने आखला असून त्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. राज्यात असलेल्या सर्व 191 ग्रामपंचायती या हजेरी अंतर्गत आणण्यात येणार आहे. त्यावरून कोणता कर्मचारी कोणत्या वेळेवर आला किंवा गेला याची नोंद होणार आहे.पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांच्या अध्यक्षतेखाली अलिकडेच झालेल्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा झाली आणि तो लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
काही पंचायतींमध्ये बायोमॅट्रिक मशिन्स बसवण्यात आली असून ती कार्यरत आहेत की नाहीत याची तपासणी केली जाणार आहे. ज्या पंचायतीत मशिन नाही तेथे ती नव्याने बसवण्यात येणार आहेत. गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (जीईएएल) आणि नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर (एनआयसी) यांना त्या कामासाठी नेमण्यात आले आहे. सदर बायोमॅट्रिक हजेरी नेमकी केव्हापासून सुरू होणार हे निश्चित ठरवण्यात आलेले नाही. राज्यतील 191 पंचायतींत मिळून सुमारे 700 च्या आसपास कर्मचारी असून त्यांच्यावर सदर हजेरीतून देखरेख ठेवली जाणार आहे. त्यामुळे त्यांच्यातील बेशिस्त रोखण्याचे काम करण्यात येणार असून पंचायत सचिव, कारकून यांच्यावरही नजर ठेवली जाणार आहे. गटविकास अधिकारी (बीडीओ) कार्यालयातील कर्मचारीवर्गावरही त्या हजेरीतून लक्ष देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.