बिजगर्णी महालक्ष्मी यात्रोत्सवाची आज सांगता

आठ दिवसात हजारो भक्तांनी घेतले देवीचे दर्शन : सुखसमृद्धी, समाधान मिळावे यासाठी भाविकांची प्रार्थना वार्ताहर /किणये बिजगर्णी, कावळेवाडी व राकसकोप या तिन्ही गावांची महालक्ष्मी देवी यात्रा बिजगर्णी गावात गेल्या आठ दिवसांपासून मोठ्या उत्साहात सुरू आहे. यात्रेच्या काळात हजारो भक्तांनी देवीचे दर्शन घेतले. त्यांनी सुखसमृद्धी व समाधान मिळावे, यासाठी देवीकडे प्रार्थना केली. मंगळवारी देवीची विशेष पूजा […]

बिजगर्णी महालक्ष्मी यात्रोत्सवाची आज सांगता

आठ दिवसात हजारो भक्तांनी घेतले देवीचे दर्शन : सुखसमृद्धी, समाधान मिळावे यासाठी भाविकांची प्रार्थना
वार्ताहर /किणये
बिजगर्णी, कावळेवाडी व राकसकोप या तिन्ही गावांची महालक्ष्मी देवी यात्रा बिजगर्णी गावात गेल्या आठ दिवसांपासून मोठ्या उत्साहात सुरू आहे. यात्रेच्या काळात हजारो भक्तांनी देवीचे दर्शन घेतले. त्यांनी सुखसमृद्धी व समाधान मिळावे, यासाठी देवीकडे प्रार्थना केली. मंगळवारी देवीची विशेष पूजा व होम करण्यात आला. या यात्रेची बुधवार दि. 24 रोजी सांगता होणार आहे. तब्बल तीस वर्षांनंतर बिजगर्णी, कावळेवाडी व राकसकोप या तीन गावांची ग्रामदेवी महालक्ष्मी देवीची यात्रा दि. 16 पासून सुरू झाली. दि. 16 रोजी गावातील सर्व देवदेवतांची पारंपरिक वाद्यांच्या गजरात पूजा करण्यात आली. सायंकाळी देवीचा हळदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला. या सोहळ्याला महिलांची लक्षणीय गर्दी झाली होती. बिजगर्णातील कलमेश्वर मंदिरसमोर बुधवार दि. 17 रोजी सूर्योदयाला देवीचा विवाह सोहळा थाटात झाला. या सोहळ्याला तालुक्मयातील भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती दिसून आली. त्यानंतर देवीची रथोत्सव मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत ढोल, ताशा, पारंपरिक वाद्ये व महालक्ष्मी देवीचा जयघोष करण्यात आला.
दि. 17 रोजी सायंकाळी बिजगर्णीतील प्राथमिक मराठी शाळेच्या आवारात महालक्ष्मी देवी गदगेवर विराजमान झाली. त्यानंतर गावच्यावतीने ओटी भरण्यात आली. गाऱ्हाणा घालून यात्रोत्सवाला प्रारंभ झाला. यात्राकाळात भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. यात्रा कमिटी सदस्य दोन महिन्यांपासून यात्रेची तयारी करत होते. गेल्या आठ दिवसांपासून यात्रा शांततेत पार पडली. मराठी शाळेच्या आवारात खेळणी, आइस्क्रीम असे विविध प्रकारचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. याचा आनंदही सर्वांनी लुटला. मंगळवारी देवीची विशेष पूजा व होमहवन करण्यात आले. यावेळी यात्रा कमिटीचे अध्यक्ष वसंत अष्टेकर, ग्रा. पं. अध्यक्ष मनोहर बेळगावकर, अॅड. नामदेव मोरे, चांगाप्पा जाधव, एपीएमसी माजी अध्यक्ष निंगाप्पा जाधव, पुंडलिक कोळी, के. आर. भाष्कळ, सचिन जाधव आदींसह यात्रा कमिटीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. मंगळवारी बिजगर्णी, कावळेवाडी व राकसकोप गावातील नागरिकांनी देवीची ओटी ढोल ताशाचा गजर व भंडाऱ्याची उधळण करत भरली. दि. 24 रोजी या यात्रेची सांगता होणार आहे. सकाळी 8.30 वाजता महाआरती होणार आहे. यावेळी यात्रा कमिटीचे अध्यक्ष, सदस्य व गावकऱ्यांची उपस्थिती राहणार आहे. दुपारी 4 च्या दरम्यान मराठी शाळेच्या आवारात देवीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर मातंगीला अग्नी देऊन पारंपरिक वाद्यांच्या गजरात गावच्या पूर्वेला सीमेवर देवीचे प्रस्थान होणार आहे. मानकऱ्यांचा विधी झाल्यानंतर यात्रा उत्सवाची सांगता होणार आहे.