बिजगर्णी-कावळेवाडी महालक्ष्मीदेवी यात्रोत्सव आजपासून

उद्या सूर्योदयाला लक्ष्मीदेवीचा विवाह सोहळा-रथोत्सव मिरवणूक : राकसकोपमध्येही मिरवणुकीची जय्यत तयारी : नऊ दिवस चालणार यात्रा वार्ताहर /किणये बिजगर्णी, कावळेवाडी व राकसकोप गावांतील महालक्ष्मी यात्रेला मंगळवार दि. 16 पासून प्रारंभ होत आहे. तब्बल तीस वर्षांनंतर यात्रा भरत असल्यामुळे गावात उत्सवाचे वातावरण आहे. यात्रेनिमित्त बिजगर्णा, कावळेवाडी गावात गटारींची साफसफाई करण्यात आली आहे. काँक्रीटचे रस्ते करण्यात आलेले […]

बिजगर्णी-कावळेवाडी महालक्ष्मीदेवी यात्रोत्सव आजपासून

उद्या सूर्योदयाला लक्ष्मीदेवीचा विवाह सोहळा-रथोत्सव मिरवणूक : राकसकोपमध्येही मिरवणुकीची जय्यत तयारी : नऊ दिवस चालणार यात्रा
वार्ताहर /किणये
बिजगर्णी, कावळेवाडी व राकसकोप गावांतील महालक्ष्मी यात्रेला मंगळवार दि. 16 पासून प्रारंभ होत आहे. तब्बल तीस वर्षांनंतर यात्रा भरत असल्यामुळे गावात उत्सवाचे वातावरण आहे. यात्रेनिमित्त बिजगर्णा, कावळेवाडी गावात गटारींची साफसफाई करण्यात आली आहे. काँक्रीटचे रस्ते करण्यात आलेले आहेत. बिजगर्णी येथील प्राथमिक मराठी शाळेच्या आवारात सुवर्ण मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे. ठिकठिकाणी स्वागतकमानी उभारण्यात आल्या आहेत. एकंदरीत बिजगर्णी, कावळेवाडीनगरी महालक्ष्मी देवीच्या यात्रोत्सवासाठी सज्ज झाली आहे. मंगळवार दि. 16 रोजी पारंपरिक वाद्यांच्या गजरात गावातील सर्व देवतांची पूजा करून यात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे.
बुधवार दि. 17 रोजी सूर्योदयाला लक्ष्मीदेवीचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. हा विवाह सोहळा कलमेश्वर मंदिराच्या आवारात होणार आहे. त्यानंतर गावभर रथोत्सव मिरवणूक होणार आहे. या मिरवणुकीत ढोल-ताशा व पारंपरिक वाद्यांचा गजर होणार असून मिरवणुकीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. दोन महिन्यांपासून यात्रोत्सव कमिटी यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी झटताना दिसत आहे. ग्रामपंचायतीमार्फतही सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. नऊ दिवस ही यात्रा होणार असून विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रम होणार आहेत. सर्वांनी आपापल्या घरांना आकर्षक रंगरंगोटी केली आहे. गावातील महालक्ष्मी मंदिरासह अन्य मंदिरांनाही आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. प्राथमिक मराठी शाळेच्या आवारात देवी गदगेवार विराजमान होणार आहे.