भूपेन लालवानीचा मुंबईला निरोप

वृत्तसंस्था/मुंबई 2023-24 च्या क्रिकेट हंगामात रणजी चषक जिंकणाऱ्या मुंबई संघातील सर्वाधिक धावा जमविणारा सलामीचा फलंदाज भूपेन लालवानीने आगामी क्रिकेट हंगमात छत्तीसगड संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. लालवानीने आता आपल्या मुंबई संघाला निरोप दिला आहे. भूपेन लालवानीने या संदर्भात मुंबई क्रिकेट संघटनेकडे ना हरकत (एनओसी) प्रमाणपत्रासाठी अर्ज पाठविला असून हा अर्ज संघटनेला मिळाला असल्याचे सांगण्यात आले. […]

भूपेन लालवानीचा मुंबईला निरोप

वृत्तसंस्था/मुंबई
2023-24 च्या क्रिकेट हंगामात रणजी चषक जिंकणाऱ्या मुंबई संघातील सर्वाधिक धावा जमविणारा सलामीचा फलंदाज भूपेन लालवानीने आगामी क्रिकेट हंगमात छत्तीसगड संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. लालवानीने आता आपल्या मुंबई संघाला निरोप दिला आहे.
भूपेन लालवानीने या संदर्भात मुंबई क्रिकेट संघटनेकडे ना हरकत (एनओसी) प्रमाणपत्रासाठी अर्ज पाठविला असून हा अर्ज संघटनेला मिळाला असल्याचे सांगण्यात आले. गेल्या वर्षीच्या रणजी हंगामात मुंबई संघाला विजेतेपद मिळवून देण्यासाठी त्याची मोलाची कामगिरी झाली होती. त्याने गेल्या रणजी हंगामात 10 सामन्यात 39.20 धावांच्या सरासरीने 588 धावा जमविल्या असून त्यामध्ये एक शतक आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. लालवानीने 14 प्रथमश्रेणी सामन्यात 34.05 धावांच्या सरासरीने 681 धावा जमविल्या असून त्यामध्ये एक शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. आता भुपेन छत्तीसगडला स्थलांतर करणार असून तो आगामी राष्ट्रीय क्रिकेट हंगामात छत्तीसगड संघातून खेळणार असल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी भुपेनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीला मुंबईत प्रारंभ केला असून तो चेंबूरमध्ये वास्तव्य करीत होता. क्रिकेट क्षेत्रात आपल्याला मुंबई क्रिकेट संघटनेकडून अनेक संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्याने संघटनेचे आभार मानले आहेत. मुंबईच्या 23 वर्षांखालील संघाकडून त्याने चार क्रिकेट हंगामात प्रतिनिधीत्व केले आहे. त्यानंतर त्याचा मुंबईच्या रणजी संघात समावेश करण्यात आला. क्रिकेटच्या विविध प्रकारामध्ये खेळण्याची आपली इच्छा असून छत्तीसगडकडून आपल्याला ही संधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे भुपेनने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. संपूर्ण वर्षभराच्या क्रिकेट हंगामात क्रिकेटच्या विविध प्रकारात खेळण्याची आपल्याला जरुरी भासत असल्याचे 25 वर्षीय भुपेनने म्हटले आहे. आता छत्तीसगडच्या ड्रेसिंगरुममध्ये अष्टपैलु शशांक सिंगनंतर वावरणारा भुपेन लालवानी हा तिसरा मुंबईकर क्रिकेटपटू आहे. 2024 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत शशांक सिंगने किंग्ज इलेव्हन पंजाबचे तर 2022 साली यष्टीरक्षक  आणि फलंदाज एकनाथ केरकर छत्तीसगड संघात दाखल झाले आहेत. मुंबईचा सलामीचा फलंदाज अखिल हेरवाडकरने काही सामन्यात छत्तीसगडचे प्रतिनिधीत्व केले होते. मुंबईचा माजी यष्टीरक्षक सुलक्षण कुलकर्णी हा 2016-17 च्या क्रिकेट हंगामात सेंट्रल इंडिया संघाचा प्रमुख प्रशिक्षक होता. चालु वर्षाच्या क्रिकेट हंगामामध्ये मुंबई संघाला निरोप देणारा लालवानी हा दुसरा क्रिकेटपटू आहे. यापूर्वी अष्टपैलू अमन खानने पुडुचेरी संघात दाखल झाला आहे. दरम्यान सिध्देश लाड आणि हेरवाडकर यांचे पुन्हा मुंबई संघात पुनरागमन झाले होते.