बेळगाव विमानतळाची भरारी

हुबळीला सोडले माघारी : 32 हजाराची मनसबदारी, दिवसागणिक प्रवाशांच्या संख्येत वाढ बेळगाव : बेळगाव विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. नोव्हेंबर महिन्यात तब्बल 32 हजार प्रवाशांनी बेळगावमधून प्रवास केल्याची नोंद विमानतळ प्राधिकरणाने केली आहे. राज्यातील बेंगळूर व मंगळूर या दोन्ही आंतरराष्ट्रीय विमानतळांनंतर सर्वाधिक प्रवासी संख्या असणारे बेळगाव विमानतळ तिसऱ्या स्थानी पोहोचले आहे. बेळगावमधून देशातील […]

बेळगाव विमानतळाची भरारी

हुबळीला सोडले माघारी : 32 हजाराची मनसबदारी, दिवसागणिक प्रवाशांच्या संख्येत वाढ
बेळगाव : बेळगाव विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. नोव्हेंबर महिन्यात तब्बल 32 हजार प्रवाशांनी बेळगावमधून प्रवास केल्याची नोंद विमानतळ प्राधिकरणाने केली आहे. राज्यातील बेंगळूर व मंगळूर या दोन्ही आंतरराष्ट्रीय विमानतळांनंतर सर्वाधिक प्रवासी संख्या असणारे बेळगाव विमानतळ तिसऱ्या स्थानी पोहोचले आहे. बेळगावमधून देशातील महत्त्वाच्या दहा शहरांना विमानसेवा दिली जात असल्याने प्रवासीसंख्या झपाट्याने वाढत आहे. मध्यंतरीच्या काळात महत्त्वाच्या विमानसेवा बंद झाल्याने रोडावलेली प्रवासी संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. सप्टेंबर महिन्यात केवळ 20265 प्रवाशांनी विमान प्रवास केला होता. 5 ऑक्टोबरपासून बेळगाव-दिल्ली विमानफेरी सुरू झाल्याने प्रवासी संख्येत वाढ होत गेली. ऑक्टोबर महिन्यात 29285 प्रवाशांनी विमान प्रवास केला होता. बेळगावहून दररोज दिल्लीला विमानफेरी सुरू असून शंभरहून अधिक प्रवासी दिल्लीला जात आहेत. तर तितकेच प्रवासी बेळगावला येत असल्याचे दिसून येत आहे. याबरोबरच बेंगळूरच्या दोन्ही फेऱ्यांना उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यामुळे प्रवाशांची संख्या वाढत आहे. डिसेंबर महिन्यात कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन झाल्याने प्रवासी संख्या अजून वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
हुबळीला दिला धोबीपछाड
बेळगावपेक्षा मोठे विमानतळ असल्याचा कांगावा करत बेळगावमधील हक्काच्या विमानफेऱ्या हुबळी येथे पळविण्यात आल्या होत्या. परंतु, हुबळीपेक्षाही बेळगावच्या विमानतळामध्ये क्षमता अधिक असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. केवळ बेळगावच नाही तर पश्चिम महाराष्ट्र व कोकणातूनही प्रवासी बेळगावमध्ये येत असल्याने प्रवासी संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे हुबळी विमानतळाला मागे सारत बेळगाव विमानतळाने पुन्हा एकदा आपले स्थान बळकट केले आहे.