सावधान… साथीच्या रोगांचा फैलाव वाढतोय

जिल्ह्यात 177 जणांना डेंग्यूची लागण : दररोज आठ ते दहा जणांमध्ये डेंग्यूची लक्षणे : काळजी घेणे आवश्यक बेळगाव : शहर परिसरात डेंग्यू, चिकुनगुनिया व मलेरिया या रोगांनी डोकेवर काढले आहे. त्यातही डेंग्यूचे प्रमाण दिवसागणिक वाढत चालले आहे. बेळगाव जिल्ह्यात 177 जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. बेळगाव, खानापूर व बैलहोंगल येथे डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत चालली असून दररोज आठ ते दहा जणांमध्ये डेंग्यूची लक्षणे आढळत आहेत. जानेवारी ते जुलैदरम्यान […]

सावधान… साथीच्या रोगांचा फैलाव वाढतोय

जिल्ह्यात 177 जणांना डेंग्यूची लागण : दररोज आठ ते दहा जणांमध्ये डेंग्यूची लक्षणे : काळजी घेणे आवश्यक
बेळगाव : शहर परिसरात डेंग्यू, चिकुनगुनिया व मलेरिया या रोगांनी डोकेवर काढले आहे. त्यातही डेंग्यूचे प्रमाण दिवसागणिक वाढत चालले आहे. बेळगाव जिल्ह्यात 177 जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. बेळगाव, खानापूर व बैलहोंगल येथे डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत चालली असून दररोज आठ ते दहा जणांमध्ये डेंग्यूची लक्षणे आढळत आहेत. जानेवारी ते जुलैदरम्यान बेळगाव जिल्ह्यात 177 जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. धारवाडमध्ये 254 जण डेंग्यूने त्रस्त आहेत. कारवारमध्ये 113, बागलकोटमध्ये 53, विजापुरात 166 जणांना डेंग्यू झाला आहे. बेळगाव जिल्ह्यात डेंग्यूमुळे दोन जणांचा मृत्यूही झाला आहे. राज्यभरात डेंग्यूचे 1,10,325 संशयित असून त्यापैकी 49,854 जणांची रक्तचाचणी केल्यानंतर 6,377 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.
डेंग्यू आणि अन्य रोगांचे प्रमाण वाढत असल्याने आरोग्य खातेही जागरुक झाले आहे. पावसाळा सुरू झाला की साथीचे रोग डोकेवर काढतात. मात्र यंदा त्यांची तीव्रताही वाढली आहे. डेंग्यूवर अचूक असा उपचार नसून लक्षणांवरूनच उपचार करण्यात येतो. त्यामुळे नागरिकांनीच काळजी घेणे आवश्यक आहे. डेंग्यूच्या लक्षणामध्ये हात-पाय दुखणे, अंग दुखणे, डोकेदुखी, तीव्र ताप येणे, भूक न लागणे, खाज होणे, प्रामुख्याने डोळ्यामागे दुखणे यांचा समावेश आहे. शिवाय डेंग्यूमुळे शरीरातील प्लेटलेट्स कमी होतात. जिल्ह्यामध्ये 1490 जणांच्या रक्ताचे नमुने घेतले असून त्यामध्ये 177 जणांना डेंग्यू झाला आहे. गतवर्षी हेच प्रमाण 101 इतके होते. तर गतवर्षी 13 जणांना चिकुनगुनिया व 35 जणांना मलेरिया झाला होता.
गेल्या चार-पाच दिवसांत हवामानात झालेला बदल, रिपरिप पडणारा पाऊस, पावसाचे खड्ड्यांमध्ये साचणारे पाणी, त्यामुळे वाढलेले डासांचे प्रमाण यामुळे रोग वाढत आहेत. मात्र, डेंग्यूचे डास हे स्वच्छ पाण्यावर आढळतात. त्यामुळे पाणी सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. या रोगांमुळे हॉस्पिटल प्रशासन आणि महानगरपालिका यांच्यासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. आरोग्य खात्याने याबाबत जनजागृती अभियान सुरू केले आहे. परंतु कचऱ्याची वेळेवर उचल होणे, कोठेही पाणी न साचणे यासाठी खात्याला प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागत आहे. प्रामुख्याने घरोघरी जे पाणी साठवले जाते, ते दीर्घकाळ साठवू नये. किमान आठवड्यात एकदा तरी पाणी साठवण्याची भांडी स्वच्छ धुवून ती वाळवून मगच त्यात पाणी भरावे. तथापि सध्या शहराला दूषित पाण्याचा पुरवठा होत असून एलअॅण्डटीने ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे. शिवाय हे पाणी उकळून पिणे हा त्यावर सर्वोत्तम उपाय आहे.
डेंग्यूच्या चाचणीसाठीचे दरपत्रक राज्य सरकारकडून घोषित
डेंग्यूच्या चाचणीसाठी राज्य सरकारने दर ठरवून दिले आहेत. राज्यपालांच्या स्वाक्षरीनिशी आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याला त्याबाबतचा आदेश आला आहे. त्यानुसार डेंग्यू एलिसा एनएस-1 या चाचणीसाठी 300 रुपये, डेंग्यू एलिसा आयजीएम चाचणीसाठी 300 रु., व रॅपिड कार्ड चाचणीसाठी 250 रु. असा दर ठरवून देण्यात आला आहे.
तज्ञांनी केलेल्या सूचना

पावसाचे पाणी साचू देऊ नका.
शक्य तो संपूर्ण अंग झाकले जाईल असे कपडे घाला.
झोपताना मच्छरदाणीचा उपयोग करा.
खिडक्या, दरवाजे बंद ठेवा.
गरम पाणी प्या.
पिण्याचे पाणी खूप दिवस साठवून ठेवू नका.
टेरेसवरही पाणी साचू देऊ नका.
टेरेसवरील टाक्यांना झाकण लावा.