मोफत वाहन सेवेचा दहावी परीक्षार्थींकडून लाभ

मोफत वाहन सेवेचा दहावी परीक्षार्थींकडून लाभ

कै. नारायणराव जाधव प्रतिष्ठानचा उपक्रम
बेळगाव : एसएसएलसी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी रंगोत्सव असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी अडचणी येऊ नयेत यासाठी कै. नारायणराव गुंडोजी जाधव सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठानच्यावतीने वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. नाथ पै सर्कल येथून तीन वाहनांनी 30 हून अधिक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचविण्यात आले. सोमवारी बेळगाव शहरासह टिळकवाडी, अनगोळ व इतर उपनगरांमध्ये रंगपंचमी होती. शनिवार दि. 30 रोजी वडगाव, शहापूर, जुनेबेळगाव या परिसरात रंगपंचमी साजरी होणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला जाण्यासाठी अडथळे येऊ नयेत यासाठी प्रतिष्ठानतर्फे यावर्षी वाहनांची सोय करण्यात आली होती. सकाळी 9 वाजल्यापासून नाथ पै चौक येथून वाहनांची सोय करण्यात आली होती. रंगपंचमी असल्यामुळे सोमवारी सकाळी बससेवा विस्कळीत झाली होती. यामुळे परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना पोहोचविण्यासाठी प्रतिष्ठानचा उपक्रम उपयुक्त ठरला. शहरातील भातकांडे स्कूल, इस्लामिया स्कूल, केएलएस स्कूल, डी. पी. स्कूल, गोमटेश स्कूल यासह विविध परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना पोहोचविण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष नेताजी जाधव, श्रीधर जाधव, राहुल शिंदे, विजय जाधव, दिनेश मेलगे, पंकज शिंदे, विजय घाडी, भाऊ शिंदे, साई जाधव, सूरज कडोलकर, सुमंत जाधव यासह इतर उपस्थित होते.