‘गृहलक्ष्मी’साठी पोस्ट खात्यात लाभार्थ्यांची रांग

पोस्ट कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे लाभार्थी दिवसभर रांगेत : व्यवहार सुरळीत करण्याची मागणी बेळगाव : गृहलक्ष्मी योजनेतील घोळ अद्याप कमी झालेला दिसत नाही. गृहलक्ष्मी योजनेच्या लाभार्थ्यांची गुरुवारी मुख्य पोस्ट खात्यात गर्दी झाली होती. पैसे काढण्यासाठी वयोवृद्धांना दिवसभर रांगेत थांबावे लागले. त्यामुळे या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोस्ट खात्याने गृहलक्ष्मी योजनेचे व्यवहार सुरळीत करावेत, अशी मागणीही […]

‘गृहलक्ष्मी’साठी पोस्ट खात्यात लाभार्थ्यांची रांग

पोस्ट कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे लाभार्थी दिवसभर रांगेत : व्यवहार सुरळीत करण्याची मागणी
बेळगाव : गृहलक्ष्मी योजनेतील घोळ अद्याप कमी झालेला दिसत नाही. गृहलक्ष्मी योजनेच्या लाभार्थ्यांची गुरुवारी मुख्य पोस्ट खात्यात गर्दी झाली होती. पैसे काढण्यासाठी वयोवृद्धांना दिवसभर रांगेत थांबावे लागले. त्यामुळे या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोस्ट खात्याने गृहलक्ष्मी योजनेचे व्यवहार सुरळीत करावेत, अशी मागणीही होऊ लागली आहे. काँग्रेस सरकारने राज्यात शक्ती, अन्नभाग्य, गृहलक्ष्मी, विद्यानिधी, गृहज्योती योजना लागू केल्या आहेत. त्यामुळे या योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांची धडपड सुरू आहे. मात्र, यापैकी गृहलक्ष्मी योजना विस्कळीत झाल्याने लाभार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पोस्ट खात्यात पैशासाठी सकाळी 10 पासून दिवसभर रांगेत थांबावे लागत आहे. सकाळी पोस्टात गेल्यानंतर ‘साहेब नाहीत नंतर या’ असे सांगितले जात आहे. त्यामुळे लाभार्थ्यांचे हेलपाटे सुरू आहेत. स्वत:चेच पैसे वेळेत मिळत नसल्याने लाभार्थ्यांतून संताप व्यक्त होऊ लागला आहे. दिवसभर ताटकळत थांबून देखील काहींना पैशाविना माघारी परतावे लागत आहे.
पोस्ट खात्यामध्ये गृहलक्ष्मी योजनेतील पैसे, पेन्शन आणि विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र, कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने लाभार्थ्यांना वेळेत पैसे मिळेनासे झाले आहेत. दिवसभर ताटकळत थांबावे लागत आहे. पोस्टातील कामे सुरळीत करून लाभार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होऊ लागली आहे. गृहलक्ष्मी योजनेसाठी पोस्ट खात्यात नवीन खाती उघडण्यात आली आहेत. मात्र, या खात्यातीलच पैसे लाभार्थ्यांना वेळेत मिळत नसल्याचे दिसत आहे. स्वत:चेच पैसे काढण्यासाठी लाभार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकाराबाबत आता सर्वसामान्य नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. एकीकडे सरकार सर्वसामान्यांना योजना राबवून दिलासा देत असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे मात्र लाभार्थ्यांना कसरत करूनही पैसे मिळत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे सरकारच्या या बेजबाबदार कारभाराबाबतही नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.