बेळगाव-सावंतवाडी रेल्वे मार्गासाठी करणार प्रामाणिक प्रयत्न – छ. शाहू महाराज

चंदगड येथे कृतज्ञता मेळावा चंदगड प्रतिनिधी- चंदगड विधानसभा मतदार संघाने विरोधी आघाडीची आघाडी मोडून महाविकास आघाडीला साथ दिली. आजवर विकासात लांब राहिलेला चंदगड तालुका विकासाने जवळ आणण्याची प्रेरणा चंदगडच्या कष्टकरी, शेतकरी, सर्वसामान्यांनी दिलेली असून गोरगरिबांचे हित डोळ्यासमेर ठेवून कामे केली जातील. बेळगाव-सावंतवाडी रेल्वे मार्गाचे काम अवघड असले तरी प्रामाणिक प्रयत्न करून रेल्वे आणणार, असे मनोगत […]

बेळगाव-सावंतवाडी रेल्वे मार्गासाठी करणार प्रामाणिक प्रयत्न – छ. शाहू महाराज

चंदगड येथे कृतज्ञता मेळावा
चंदगड प्रतिनिधी-
चंदगड विधानसभा मतदार संघाने विरोधी आघाडीची आघाडी मोडून महाविकास आघाडीला साथ दिली. आजवर विकासात लांब राहिलेला चंदगड तालुका विकासाने जवळ आणण्याची प्रेरणा चंदगडच्या कष्टकरी, शेतकरी, सर्वसामान्यांनी दिलेली असून गोरगरिबांचे हित डोळ्यासमेर ठेवून कामे केली जातील. बेळगाव-सावंतवाडी रेल्वे मार्गाचे काम अवघड असले तरी प्रामाणिक प्रयत्न करून रेल्वे आणणार, असे मनोगत नवनिर्वाचित खासदार छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांनी व्यक्त केले.
चंदगड येथील सोयरिक मंगल कार्यालयात आयोजित कृतज्ञता मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे माजी गृहमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील होते.
श्रीमंत छ. शाहू महाराज म्हणाले, लोकसभेचा एकोपा पुढे विधानसभेतही ठेवावा. सर्वसामान्यांच्या ताकतीतून परिवर्तन होते, हे चंदगड तालुक्याने दाखवून दिले असून सर्वसामान्यांच्या ताकतीने विकासाचे नवे पर्व चंदगड तालुक्यात येईल. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचा कायापालट करण्यात कमी पडणार नाही.
अध्यक्षस्थानावरून बोलताना सतेज पाटील म्हणाले, राजर्षि शाहू महाराजांच्या पुण्याईनेच श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना सर्वसामान्यांचे बळ मिळाले. चंदगड आणि कागलची भिती वाटत होती. पण या तालुक्यांनी आघाडी दिली. श्रीमंत छ. शाहू महाराजांच्या यशामुळे देश पातळीवर कोल्हापूर गाजलेले असून जिल्ह्याच्या उज्वल भविष्याचे महाराज शिल्पकार ठरणार आहेत. महाराजांच्या कर्तृत्वाचा लाभ सर्वसामान्य माणसांना होणार आहे. जनतेला गृहीत धरून सकाळी एका पक्षात आणि संध्याकाळी दुसऱ्या पक्षात जाणाऱ्यांची जागा या निवडणुकीने दाखविलेली असून काजू बोर्ड, हॉस्पिटल, रेल्वे, रस्ते, नवीन प्रदूषण विरहित प्रकल्प इथे मार्गी लागतील. प्रास्ताविक संभाजीराव देसाई&-शिरोलीकर यांनी करून सर्वसामान्य जनतेच्या सहकार्याबद्दल ऋण व्यक्त केले. ही निवडणूक सर्वसामान्य मतदारांनी ताब्यात घेऊन परिवर्तन घडविले असून विधानसभेला महाविकास आघाडी ज्याला उमेदवारी देईल, त्याच्या मागे राहण्याची ग्वाही डॉ. नंदिनी बाभुळकर यांनी दिली. गावागावातील मतदारांनी पोटतिडकीने काम केल्यामुळे यश मिळाले असून लोकसभेची एकजूट विधानसभेतही राहिल, असा विश्वास गोपाळराव पाटील यांनी व्यक्त केला. स्वाभिमान गहान टाकणाऱ्यांची जागा मतदारांनी दाखविल्याचे व्ही. बी. पाटील यांनी सांगितले. काजूच विभागीय कार्यालय आणि रेल्वे चंदगड तालुक्यात नक्की येईल, असा विश्वास विजय देवणे यांनी व्यक्त केला. यावेळी व्यासपीठावर विनायक उर्फ अप्पी पाटील, विक्रमसिंह चव्हाण-पाटील, विष्णूपंत जोशीलकर, रामराजे कुपेकर, प्रभाकर खांडेकर, नितिन पाटील, राजेंद्र परिट, शिवाजीराव सावंत, कलाप्पा भोगण, विलास पाटील, जे. बी. पाटील, राजू रेडेकर, गोविंद पाटील, अनिल दळवी, फिरोज मुल्ला, विष्णू गावडे, जे. के. पाटील आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन एम. के. पाटील यांनी केले.