बेळगाव-मिरज फक्त 35 रुपयांत!

बेळगाव-मिरज, बेळगाव-हुबळी पॅसेंजर रेल्वेचे तिकीट आता अर्ध्याने कमी होणार : कमी तिकीट दरामुळे प्रवाशांमधून समाधान बेळगाव : कोरोना काळात गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी रेल्वेने पॅसेंजर रेल्वेच्या तिकीट दरात दुपटीने वाढ केली होती. परंतु, आता कोरोना पूर्णपणे दूर झाल्यानंतर आता ही दरवाढ मागे घेण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे बेळगाव-मिरज, बेळगाव-हुबळी या पॅसेंजर रेल्वेचे तिकीट आता अर्ध्याने […]

बेळगाव-मिरज फक्त 35 रुपयांत!

बेळगाव-मिरज, बेळगाव-हुबळी पॅसेंजर रेल्वेचे तिकीट आता अर्ध्याने कमी होणार : कमी तिकीट दरामुळे प्रवाशांमधून समाधान
बेळगाव : कोरोना काळात गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी रेल्वेने पॅसेंजर रेल्वेच्या तिकीट दरात दुपटीने वाढ केली होती. परंतु, आता कोरोना पूर्णपणे दूर झाल्यानंतर आता ही दरवाढ मागे घेण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे बेळगाव-मिरज, बेळगाव-हुबळी या पॅसेंजर रेल्वेचे तिकीट आता अर्ध्याने कमी होणार आहे. सव्वादोन वर्षानंतर पॅसेंजर रेल्वेचा तिकीट दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे. एप्रिल 2020 पासून कोरोनाचे संकट सुरू होताच टप्प्याटप्प्याने रेल्वे रद्द करण्यात आल्या. त्यानंतर सहा ते सात महिन्यांच्या कालावधीनंतर एक्स्प्रेस रेल्वे धावू लागल्या. परंतु, गर्दी टाळण्यासाठी पॅसेंजर रेल्वे बंदच होत्या. अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पॅसेंजर रेल्वे सुरू करण्यात आल्या. परंतु, त्यांना एक्स्प्रेस रेल्वेचा तिकीट दर घेण्यात येत होता. यामुळे रेल्वे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत होती. बेळगाव ते मिरज हा तिकीट दर कोरोनापासून आजतागायत 65 रुपये होता. हीच परिस्थिती बेळगाव-कुडची, बेळगाव-घटप्रभा, बेळगाव-लोंढा या मार्गावर होती. तिकीट दर भरमसाट असल्याने नोकरी, व्यवसाय, शिक्षण यासाठी रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा सर्वाधिक फटका बसला. तब्बल तीन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर रेल्वेने पॅसेंजर रेल्वेचे तिकीट दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. नैर्त्रुत्य रेल्वेच्या हुबळी विभागाचे मुख्य समन्वयकांनी गुरुवारी रात्री एक पत्रक काढून मेमू, डेमू व पॅसेंजर रेल्वे तिकीट दर कोरोनापूर्वी जेवढे होते, तेवढेच यापुढे आकारले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
सर्वच स्थानकांवर पॅसेंजर थांबणार
तिकीट दर कमी केल्याने आता बेळगाव ते मिरज असा पॅसेंजरचा प्रवास अवघ्या 35 रुपयांमध्ये करता येणार आहे. याबरोबरच इतर शहरांनाही पॅसेंजरचा तिकीट दर कमी करण्यात आला आहे. पॅसेंजरच्या तिकीट दरात 50 टक्के कपात झाल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तसेच कोरोना काळात एक्स्प्रेसमध्ये रूपांतर करण्यात आलेल्या पॅसेंजर रेल्वे निवडक रेल्वेस्थानकांवर थांबत होत्या. परंतु, यापुढे आता सर्वच रेल्वेस्थानकांवर पॅसेंजर रेल्वे थांबणार आहेत.
पॅसेंजर तिकीट दरातील कपात

स्थानकाचे नाव   पूर्वीचा दर   सध्याचा दर (बेळगावहून)
लोंढा जंक्शन         35           15
कॅसलरॉक            45           20
धारवाड               60           30
हुबळी                 65           35
घटप्रभा               35            20
कुडची                50           25
मिरज                  65           35