‘गरिबांचे महाबळेश्वर’ ही बेळगावची ओळख होतेय धूसर

बदलते चित्र तमाम बेळगावकरांसाठी वेदनादायी : योग्य जीवनशैलीचा अवलंब करण्याचा तज्ञांचा सल्ला बेळगाव : वाढत्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले असून पाऊस हजेरी लावणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून तापमानात वाढ झाली असून साधारण 11 ते 12 च्या सुमारास उन्हाच्या झळा नकोनकोसे करून सोडतात. यंदा प्रथमच बेळगावकर उष्णतेच्या लाटेचा अनुभव घेत […]

‘गरिबांचे महाबळेश्वर’ ही बेळगावची ओळख होतेय धूसर

बदलते चित्र तमाम बेळगावकरांसाठी वेदनादायी : योग्य जीवनशैलीचा अवलंब करण्याचा तज्ञांचा सल्ला
बेळगाव : वाढत्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले असून पाऊस हजेरी लावणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून तापमानात वाढ झाली असून साधारण 11 ते 12 च्या सुमारास उन्हाच्या झळा नकोनकोसे करून सोडतात. यंदा प्रथमच बेळगावकर उष्णतेच्या लाटेचा अनुभव घेत असून गरिबांचे महाबळेश्वर ही बेळगावची ओळख धूसर होत चालली आहे. एककाळ असा होता की उन्हाळ्यामध्ये परगावातील असंख्य मंडळी बेळगावला येण्यास उत्सुक असतं. मुंबई, पुणेसह महाराष्ट्रातील लोकांना बेळगावची हवा विशेष आवडायची. पाहुणे आले तरी पाणीटंचाईचे संकट नसल्याने त्यांची सरबराई होत असे. यंदा मात्र अनेकांना पाणीटंचाई असल्यामुळे बेळगावला येवू नका, असा निरोप धाडला आहे. बेळगावचे हे बदलते चित्र तमाम बेळगावकरांसाठी वेदनादायी आहे. दरम्यान, उष्णतेच्या लाटेपासून संरक्षण करण्यासाठी आरोग्य खाते, हवामान खाते वारंवार सूचना देत आहेत. दुपारी 12 ते 3 यावेळेत शक्यतो उन्हात जावू नका, श्रमाची कामे करू नका, अशा सूचना सातत्याने देण्यात येत आहेत. गतवर्षीच्या तुलनेत अंदा एसी, कुलर, पंखे यांची विक्री तेजीत झाली आहे. मात्र हळूहळू या उपकरणांशिवाय राहणेच अशक्य होईल, अशी वेळ बेळगाववर येवू नये, अशीच सर्वांची इच्छा आहे. दरम्यान, उन्हापासून संरक्षण करण्यासाठी तसेच या दिवसामध्ये योग्य जीवनशैलीचा अवलंब करा, असा सल्ला तज्ञ देत आहेत.
बेळगावच्या आयुर्वेदतज्ञ डॉ. गायत्री यल्लापूरकर यांनी काही सूचना केल्या आहेत. त्यानुसार…
गोड-तुरट, कडू चवींच्या पदार्थांचा आहारात अधिक प्रमाणात उपयोग करा उदा… भात, पोळी, भाकरी, ब्रेड, दूध, तूप, लोणी, ताजी फळे, फळांचा रस, मुरंबे, मिल्कशेक, साखर, खवा, पनीर, कडधान्य, पालेभाज्या, कोशिबिंर, प्रूटसॅलेड, मेथी, कारले, हळद, मध, कॉफी, आहारात ताजी फळे, नारळाचे पाणी, दूध व प्रामुख्याने शुद्ध तुपाचा नियमित वापर आवश्यक, किमान दोन ते चार चमचे तूप पोटात जावे.

पहाटेच्यावेळी किंवा थंडवेळी झेपेल इतका व्यायाम रोज करावा…
रोज स्नान करताना फार गरम पाणी वापरू नये,
सुगंधी उटण्याचा वापर केल्याने घामाचा दुर्गंध येणार नाही
रात्री 5 ते 6 तास झोप घ्यावी
शरीर अधिक बळकट व निरोगी करण्यासाठी रोज सकाळी उपाशीपोटी साखर न घालता अर्धाकप दूध प्यावे