दहावी परीक्षेत बेळगाव जिल्ह्याची घसरण
जिल्ह्याचा दहावीचा निकाल 64.93 टक्के : तनिष्का नावगेकर जिल्ह्यात प्रथम, प्रेरणा पाटील शहरात द्वितीय
बेळगाव : बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याचा दहावी परीक्षेचा निकाल 64.93 टक्के लागला आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्हा व शहरामध्ये सेंट मेरीज हायस्कूलची विद्यार्थिनी तनिष्का नावगेकर हिने 99.20 टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकाविला आहे. बेळगाव शहरामध्ये मराठी विद्यानिकेतनची विद्यार्थिनी प्रेरणा प्रकाश पाटील हिने 99.04 टक्के गुण घेऊन दुसरा क्रमांक पटकाविला आहे. सतत गेल्या तीन वर्षांपासून बेळगाव शैक्षणिक जिल्हा दहावीच्या निकालात पिछाडीवर गेला आहे. गतवर्षी 26 व्या क्रमांकावर होता. यंदा 29 व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. मागीलवर्षी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या व यावर्षी परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण प्रमाणानुसार 64.93 टक्के निकाल लागला आहे. तर या शैक्षणिक वर्षात परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण प्रमाणानुसार 66.49 टक्के शैक्षणिक जिल्ह्याचा निकाल लागला आहे, असे शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
राज्यामध्ये उडुपी जिल्हा अव्वल स्थानावर असून दक्षिण कन्नड जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. शिमोगा तिसऱ्या क्रमांकावर असून बेळगाव जिल्ह्याची मात्र सातत्याने घसरण होत चालली आहे. लोकसभा निवडणुकांची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दहावीच्या निकालाकडे पालकांचे लक्ष लागले होते. मात्र, जिल्ह्याची शैक्षणिकदृष्ट्या घसरण झाल्याचे दिसून येत आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात मुलींचा उत्तीर्ण होण्याचा टक्का 77.81 इतका असून 66.49 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. त्यामुळे मुली सरस ठरल्या आहेत.गतवर्षाच्या तुलनेत मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी घसरली आहे. गेल्यावर्षी 89.25 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या होत्या. शिक्षणाचा टक्का वाढविण्यासाठी शिक्षण खात्याकडून सातत्याने प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, अपेक्षेनुसार यश आलेले नाही. ऑनलाईन सेंटरवर पालक व विद्यार्थ्यांची निकाल पाहण्यासाठी गर्दी झाली होती. सध्या अँड्रॉईड मोबाईलवर निकाल पाहणे सोयीचे ठरले होते.
तनिष्का नावगेकर जिल्ह्यात प्रथम
मच्छे गावची कन्या व सेंट मेरी माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी तनिष्का शंकर नावगेकर हिने 620 गुण (99.20 टक्के) घेऊन जिल्ह्यात तसेच शहरात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर मराठी विद्यानिकेतन शाळेची विद्यार्थिनी प्रेरणा प्रकाश पाटील हिने 619 गुण (99.04 टक्के) घेऊन शहरामध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. याबद्दल शिक्षणाधिकारी लिलावती हिरेमठ, एसएसएलसी नोडल अधिकारी परवीना नदाफ यांच्याकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. मच्छे येथील रहिवासी असलेली तनिष्का ही शाळेमध्ये सुऊवातीपासूनच एक हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखली जाते. मच्छे येथील वकील शंकर यल्लपा नावगेकर व शिक्षिका पद्मा शंकर नावगेकर यांची कन्या असलेल्या तनिष्काने सर्वच विषयांमध्ये ’ए प्लस’ श्रेणी प्राप्त केली आहे.
चिकोडी जिल्ह्याची घसरण
यंदा दहावीच्या निकालात राज्यात 13 व्या स्थानावर असलेल्या चिकोडी जिल्ह्याची घसरण थेट 25 व्या स्थानावर झाली आहे. चिकोडी शैक्षणिक जिह्यातील 69.82 टक्के विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. चिकोडी शैक्षणिक जिह्याचा सन 2024 सालातील दहावीचा निकाल 69.82 टक्के लागला असून राज्यात हे स्थान 25 वे आहे. जिह्यातून एकूण 22,674 विद्यार्थी व 21,470 विद्यार्थिनी अशा एकूण 44,141 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी 13,887 विद्यार्थी व 17,254 असे एकूण 31 हजार 141 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
विभाग परीक्षेला बसलेले विद्यार्थी उत्तीर्ण विद्यार्थी टक्केवारी
बेळगाव शहर 8134 6464 79.47
खानापूर 3626 1478 69.14
बेळगाव ग्रामीण 5553 3758 67.68
बैलहोंगल 3970 2421 60.98
सौंदत्ती 5269 3106 58.95
कित्तूर 1609 930 57.80
रामदुर्ग 4066 2243 55.16
एकूण 32,227 21,429 66.49
7 जूनपासून दहावी परीक्षा-2
कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने दहावी परीक्षा-2 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही परीक्षा 7 जून ते 14 जून या कालावधीत होणार आहे. परीक्षा-1 मध्ये अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि विषयांमधील गुण सुधारण्यास इच्छुक असणारे विद्यार्थी या परीक्षेला नोंदणी करू शकतात. 7 जून-प्रथम भाषा, 8 जून-तृतीय भाषा, 10 जून-गणित, 12 जून-विज्ञान, 13 जून-द्वितीय भाषा, 14 जून रोजी समाज विषयाचा पेपर होणार आहे.
बागलकोटची अंकिता कोन्नूर राज्यात प्रथम
बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ तालुक्यातील वज्रमट्टी या गावची विद्यार्थिनी अंकिता कोन्नूर दहावी परीक्षेत 625 पैकी 625 अंक मिळवून राज्यात प्रथम आली. मल्लिगेरी मोरारजी देसाई वसती शाळेची विद्यार्थिनी अंकिता ही शेतकऱ्याची मुलगी असून तिचे प्राथमिक पहिली ते पाचवी पर्यंतचे शिक्षण वज्रमट्टी येथे झाले. यानंतरचे शिक्षण मल्लिगेरी येथील मोरारजी देसाई वसती शाळेत झाले. तिचे वडील बसाप्पा शेती करत असून आई घरकाम करते. अंकिताच्या यशाबद्दल बागलकोट जिल्हाधिकारी जानकी के. एम, जिल्हा पंचायत मुख्य कार्यनिर्वाहक अधिकारी शशिधर कुरेर यांनी कौतुक केले. आपल्या यशाचे श्रेय गुरुजनांचे मार्गदर्शन व पालकांचे उत्तेजन असून पुढील शिक्षण विज्ञान शाखेतून घेण्याचा निर्धार अंकिता हिने व्यक्त केला. गेल्या वर्षी बागलकोट जिल्हा दहावी परीक्षेच्या निकालात राज्यात 27 व्या स्थानी होता. यंदा 77.92 टक्के निकाल लागून 13 व्या स्थानी आला असल्याने विद्यार्थ्यांना अनेक उपक्रमाद्वारे मार्गदर्शन केलेल्या गुरुजनांचे कौतुक जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.