बेळगाव शहरासह ग्रामीण भाग गारठला

मंगळवारी रात्री पारा 9.3 अंशावर घसरला बेळगाव : दिवाळीपासून थंडीला सुरुवात होते. मात्र यावर्षी वारंवार बदलणाऱ्या हवामानामुळे थंडी गायब झाली होती. तर मध्यंतरी पाऊसही कोसळला होता. त्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून जोरदार थंडी पडण्यास सुरुवात झाली असून मंगळवारी रात्री 9.3 अंशावर पारा घसरला. त्यामुळे साऱ्यांनाच हुडहुडी भरली आहे. थंडी पडल्याने कडधान्य पिकाला मात्र मोठा दिलासा मिळाला […]

बेळगाव शहरासह ग्रामीण भाग गारठला

मंगळवारी रात्री पारा 9.3 अंशावर घसरला
बेळगाव : दिवाळीपासून थंडीला सुरुवात होते. मात्र यावर्षी वारंवार बदलणाऱ्या हवामानामुळे थंडी गायब झाली होती. तर मध्यंतरी पाऊसही कोसळला होता. त्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून जोरदार थंडी पडण्यास सुरुवात झाली असून मंगळवारी रात्री 9.3 अंशावर पारा घसरला. त्यामुळे साऱ्यांनाच हुडहुडी भरली आहे. थंडी पडल्याने कडधान्य पिकाला मात्र मोठा दिलासा मिळाला आहे. दरवर्षी ऑक्टोबर हिटमुळे नोव्हेंबरपासून थंडीला सुरुवात होत असते. मात्र यावर्षी दिवाळी संपली तरी थंडीचा पत्ता नव्हता. वारंवार हवामानामध्ये बदल होत होता. ढगाळ वातावरण आणि पावसाचा शिडकावा यामुळे थंडी गायब झाली होती. मात्र गेल्या तीन दिवसांपासून थंडीला जोरदार सुरुवात झाली आहे. यावर्षी पहिल्यांदाच 9.3 अंश सेल्सिअसपर्यंत पारा घसरला आहे. त्यामुळे साऱ्यांनाच उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे.
शेकोट्या पेटू लागल्या
थंडीमुळे बाजारपेठेमध्येही रात्री 9 नंतर शुकशुकाट पसरत आहे. नदी, नाले या ठिकाणी तर अधिकच थंडी जाणवत आहे. या थंडीमुळे सर्दी, खोकला यासारख्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे. तसेच थंडीमुळे काजू, आंबा या पिकांनाही त्याचा फायदा होणार आहे. सध्या काही शेतकऱ्यांनी कडधान्य पिके पेरली आहेत. त्यांनाही या थंडीचा फायदा झाला आहे. थंडी पडत असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये शेकोट्या पेटू लागल्या आहेत.