‘वंदे भारतचे’ बेळगावकरांचे स्वप्न धूसर
वेळेचे कारण देत रेल्वे बोर्डची नकारघंटा : प्रवाशांमधून नाराजी
बेळगाव : बेळगावसाठी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होण्याचे स्वप्न धूसर होण्याची शक्यता आहे. बेळगाव-बेंगळूर प्रवासाचा कालावधी अधिक असल्यामुळे रेल्वे बोर्डने तूर्तास तरी वंदे भारतचा प्रस्ताव नामंजूर केला आहे. यामुळे बेळगावच्या प्रवाशांमधून नाराजीचा सूर उमटत असला तरी बेळगाव-बेंगळूर मार्गावर इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू करण्यास रेल्वे बोर्ड इच्छुक असल्याचे दिसून येत आहे. बेंगळूर-बेळगाव मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यासाठी रेल्वे विभागाने हिरवाकंदील दिला होता. त्यानुसार नोव्हेंबर महिन्यात वंदे भारतची चाचणी घेण्यात आली. सध्या सुरू असणाऱ्या बेंगळूर-धारवाड वंदे भारत एक्स्प्रेसचा बेळगावपर्यंत विस्तार केला जाणार होता. यासाठी नैर्त्रुत्य रेल्वेने सर्व तयारीही केली होती. 4 डिसेंबरपासून बेळगावमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशन काळात वंदे भारत सुरू होईल, अशी शक्यताही वर्तविली होती. चाचणी होऊन महिना उलटला तरी वंदे भारत सुरू करण्यासाठी रेल्वे विभागाच्या हालचाली नसल्याने चर्चा सुरू होत्या. नैर्त्रुत्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार बेळगाव-बेंगळूर वंदे भारतसाठी लागणारा वेळ अधिक आहे. सध्या धावणारी बेंगळूर-धारवाड वंदे भारत एक्स्प्रेस धारवाड येथे पोहोचल्यानंतर मेंटेनन्ससाठी काहीकाळ मिळतो. परंतु हीच एक्स्प्रेस बेळगावपर्यंत धावल्यास प्रवासाचा कालावधी वाढणार आहे. 16 ते 17 तासांचा प्रवास होणार असल्याने वंदे भारत एक्स्प्रेस एका दिवसात धावणे शक्य होणार नसल्याचे सांगण्यात आले.
एका दिवसात प्रवास करण्याचा वंदे भारतचा उद्देश आहे
बेळगाव-बेंगळूर रेल्वेमार्गाचे अंतर 600 कि. मी. चे असून सध्याच्या सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या प्रवासासाठी 11 तासांचा कालावधी लागतो. वंदे भारतमुळे हा प्रवास 7.30 ते 8 तासांचा होऊ शकतो. परंतु पहाटे बेंगळूरमधून निघालेली एक्स्प्रेस दुपारी बेळगावला तर रात्री उशिराने बेंगळूरला पोहोचणार असल्याने प्रवासी कितपत प्रतिसाद देतील, असा प्रश्न रेल्वे बोर्डसमोर आहे. त्यामुळे सध्या तरी वंदे भारत एक्स्प्रेस बेळगावसाठी हे दिवास्वप्नच ठरणार आहे.
पुणे-बेळगाव मार्गावर वंदे भारत सुरू करण्याचा प्रस्ताव
रेल्वे बोर्डने पुणे-बेळगाव मार्गावर वंदे भारत सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. परंतु मिरज ते पुणे दरम्यान दुपदरीकरण व विद्युतीकरणाचे काम अद्याप अपूर्ण आहे. दुपदरीकरणाचे 84 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम अद्याप बाकी आहे. त्यामुळे रेल्वे बोर्डचा प्रस्ताव असला तरी पुणे-बेळगाव मार्गावर वंदे भारत सुरू होण्यास चार ते पाच महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे बेळगावबाबतच दुजाभाव का? असा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
बेंगळूर-बेळगाव वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यावर ठाम
वंदे भारत एक्स्प्रेसचा बेळगावपर्यंत विस्तार करण्यासाठी रेल्वे बोर्डकडे पाठपुरावा केला. परंतु प्रवासाचा कालावधी 16 ते 17 तासांपेक्षा अधिक जात असल्याने वंदे भारत सुरू करण्याबाबत तांत्रिक अडचणी येत आहेत. त्याऐवजी बेळगाव-बेंगळूर मार्गावर इंटरसिटी एक्स्प्रेस व बेळगाव-पुणे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वेमंत्र्यांनी दिला आहे. परंतु आम्ही बेंगळूर-बेळगाव वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याबाबत ठाम असल्याचे त्यांनी ‘भारत लाईव्ह न्यूज मीडिया’शी बोलताना सांगितले.
-इराण्णा कडाडी (राज्यसभा सदस्य)


Home महत्वाची बातमी ‘वंदे भारतचे’ बेळगावकरांचे स्वप्न धूसर
‘वंदे भारतचे’ बेळगावकरांचे स्वप्न धूसर
वेळेचे कारण देत रेल्वे बोर्डची नकारघंटा : प्रवाशांमधून नाराजी बेळगाव : बेळगावसाठी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होण्याचे स्वप्न धूसर होण्याची शक्यता आहे. बेळगाव-बेंगळूर प्रवासाचा कालावधी अधिक असल्यामुळे रेल्वे बोर्डने तूर्तास तरी वंदे भारतचा प्रस्ताव नामंजूर केला आहे. यामुळे बेळगावच्या प्रवाशांमधून नाराजीचा सूर उमटत असला तरी बेळगाव-बेंगळूर मार्गावर इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू करण्यास रेल्वे बोर्ड इच्छुक असल्याचे […]