बेकिनकेरे महालक्ष्मी यात्रेला उत्साहात प्रारंभ

भंडाऱ्याची उधळण, ढोलताशाच्या गजरात भव्य रथ मिरवणूक : भाविकांची अलोट गर्दी वार्ताहर/उचगाव बेकिनकेरे येथील महालक्ष्मी यात्रेला मंगळवारपासून अक्षतारोपणाने प्रारंभ झाला असून बुधवार दि. 4 रोजी लक्ष्मी गदगेला बसविण्यात आली. हजारो भाविकांच्या उपस्थितीत लक्ष्मीदेवीच्या नावानं चांगभलं असा जयजयकार करत भंडाऱ्याची उधळण, ढोलताशाच्या गजरात भव्य मिरवणुकीद्वारे लक्ष्मीदेवी गदगेला बसविण्याच्या ठिकाणी नेण्यात येऊन उभारण्यात आलेल्या भव्य अशा शामियानामध्ये लक्ष्मीदेवीला विराजमान करण्यात आले. मंगळवारी सकाळी पहाटे सहा […]

बेकिनकेरे महालक्ष्मी यात्रेला उत्साहात प्रारंभ

भंडाऱ्याची उधळण, ढोलताशाच्या गजरात भव्य रथ मिरवणूक : भाविकांची अलोट गर्दी
वार्ताहर/उचगाव
बेकिनकेरे येथील महालक्ष्मी यात्रेला मंगळवारपासून अक्षतारोपणाने प्रारंभ झाला असून बुधवार दि. 4 रोजी लक्ष्मी गदगेला बसविण्यात आली. हजारो भाविकांच्या उपस्थितीत लक्ष्मीदेवीच्या नावानं चांगभलं असा जयजयकार करत भंडाऱ्याची उधळण, ढोलताशाच्या गजरात भव्य मिरवणुकीद्वारे लक्ष्मीदेवी गदगेला बसविण्याच्या ठिकाणी नेण्यात येऊन उभारण्यात आलेल्या भव्य अशा शामियानामध्ये लक्ष्मीदेवीला विराजमान करण्यात आले. मंगळवारी सकाळी पहाटे सहा वाजून 47 मिनिटांनी लक्ष्मीदेवीचा विवाह सोहळा अक्षतारोपणाने पार पडला. देवीची विधिवत पूजा करून गावातील देव देवतांना नैवेद्य दाखवून रथ मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. यावेळी आमदार चन्नराज हट्टीहोळी, काडा अध्यक्ष युवराज कदम तसेच सामाजिक कार्यकर्ते बाळू देसूरकर आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पूजन कार्यक्रम पार पडला.
बुधवारी लक्ष्मी देवीचा जयघोष करत अमाप उत्साहात रथ मिरवणूक काढण्यात आली. गल्लोगल्ली भंडाऱ्यांची उधळण करण्यात आली. देवस्थान पंचकमिटी, ज्येष्ठ नागरिक, यात्रा कमिटी व  मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेला उत्साहात प्रारंभ करण्यात आला आहे. या यात्रेत कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त तसेच वाहतुकीची कोंडी होऊ नये याची खबरदारी घेण्यात आली आहे. तसेच पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी गावाला भेट देऊन गावातील यात्रोत्सवाचीही  पाहणी केली. पाचच्या सुमाराला लक्ष्मी देवीला उभारण्यात आलेल्या शामियानामध्ये गदगेला बसविण्यात आले.आणि मानाचा पालवा बळी देऊन घरोघरी जेवणावळींच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सदर यात्रा उत्सव 11 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.