पालक होणं म्हणजे…

गुरुपौर्णिमा आली की ‘कुंभारासारखा गुरु नाही रे जगात वरी घालितो धपाटा, आत आधाराला हात’ हे वाचलं की अनेक शिक्षक आठवतात ……पु. ल. देशपांडेंनी रंगवलेले…चितळे मास्तर आठवतात तर कधी कॉलेजमध्ये शिकलेले राजे मास्तर आठवतात……शिक्षक शहरातला असो नाहीतर खेड्यातला,  त्याच्या जाणिवा जागृत झाल्या की जगण्याचं सोनं होतं. खेड्यातली शाळा म्हटलं की दुपारच्या सुट्टीतलं चित्र डोळ्यासमोर येतं. झाडावर […]

पालक होणं म्हणजे…

गुरुपौर्णिमा आली की ‘कुंभारासारखा गुरु नाही रे जगात
वरी घालितो धपाटा, आत आधाराला हात’ हे वाचलं की अनेक शिक्षक आठवतात ……पु. ल. देशपांडेंनी रंगवलेले…चितळे मास्तर आठवतात तर कधी कॉलेजमध्ये शिकलेले राजे मास्तर आठवतात……शिक्षक शहरातला असो नाहीतर खेड्यातला,  त्याच्या जाणिवा जागृत झाल्या की जगण्याचं सोनं होतं. खेड्यातली शाळा म्हटलं की दुपारच्या सुट्टीतलं चित्र डोळ्यासमोर येतं. झाडावर चढणारी मुलं, एकमेकांना गुद्दे घालणारी मुलं, माती उधळत पळणारी मुलं, त्याचबरोबर आपली भाकरी फडक्यात बांधून आणून कोपऱ्यात बसून खाणारी मुलंसुद्धा आठवतात. खरं तर ह्या भाकरीला तोंडी लावणं काही असतंच असं नाही पण नुसत्या कांद्याबरोबरसुद्धा आजूबाजूचा निसर्ग न्याहाळत ती भाकरी किती चविष्ट लागते हे तेच सांगू शकतील. पण हल्ली प्रत्येक शाळेमध्ये मध्यान्ह भोजन किंवा पोषण आहार सुरू झाल्यामुळे बऱ्याच मुलांचे हे प्रश्नसुद्धा मिटलेत. मुलं आनंदाने हा भात खातात. शहरात मात्र चित्र वेगळं दिसतं. कारण शहरातल्या मुलांना हा भात आवडेलच असं नाही. पण गावातल्या शाळेत असा भात आला की सगळ्या मुलांची त्या टेम्पोजवळ एकच झुंबड उडायची. प्रत्येक जण आपल्या डब्यामध्ये गरम गरम भात घेऊन खाताना पाहिलं की आम्हालाच समाधानाने पोट भरल्यासारखं वाटायचं. अशाच मुलांच्या गर्दीमध्ये एक मुलगा डब्यात आणि प्लास्टिकच्या पिशवीत भात भरून घेतांना बरेचदा दिसायचा. मला वाटायचं की याची भूक मोठी असेल. म्हणून मी फारसे लक्ष दिले नाही. परंतु डबा खाण्याच्या सुट्टीनंतर हा मुलगा मात्र वर्गात नसायचा, हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा मी त्याच्यावर लक्ष ठेवायचं ठरवलं. या मुलांनी नेहमीप्रमाणे आपल्या डब्यात भात भरला आणि दुसऱ्या एका प्लास्टिकच्या पिशवीत पण भात भरून घेतला आणि कुणाचं लक्ष नाही असं बघून पटकन तो शाळेच्या दारातून झपाझप चालत घराकडे निघाला. मलाही उत्सुकता असल्यामुळे मी हळूहळू त्याला दिसणार नाही अशा पद्धतीने त्याच्या मागे चालले. तो एका झोपडपट्टी वजा भागात शिरला तिथे पत्र्याची खोली जेमतेम दोन माणसं बसू शकतील अशी. त्या खोलीचे दार उघडल्यावर वर समोर पोतं टाकून अंगाची जुडी करून झोपलेला एक माणूस दिसला. हा मुलगा घाईघाईने घरात गेला. ताटलीमध्ये पिशवीतला भात ओतला आणि वडिलांना बसवलं आणि खाऊ घातलं. मुलाने त्यांच्याबरोबर दोन-चार घास खाल्ले. हे सगळं पाहिल्यानंतर मागच्या पावली निघाले अन् शाळेत आले. हा मुलगा नेहमीप्रमाणे पुढच्या तासाला आला पण मी तसं काहीच दाखवलं नाही. जेव्हा माझ्या हे लक्षात आलं की घरी अपंग वडील  आहेत आणि त्यांना हा भरवतो. म्हणजे बापाचाही बाप होण्याचं भाग्य त्याला लाभलं होतं. त्याच्या या परिस्थितीची कल्पना नसल्यामुळे मला आधी राग आला होता. पण आता मला एक वेगळीच सहानुभूती वाटू लागली. वडिलांना दारूमुळे हे  आजारपण आलेलं, आई देवाघरी गेलेली.
मिळेल ते काम करत हा मुलगा शिकतोय आणि बापाला भरवतोय, जेऊ घालतोय हे पाहिल्यानंतर खूपच कौतुक वाटलं. पुढच्या वर्षी आता हा मुलगा रात्र शाळेला जाणार हे ऐकल्यावर सरांनाही त्याच्या जेवणाचा प्रश्न पडला. पण त्यांनी तसे न दाखवता, त्याची अॅडमिशन रात्र शाळेमध्ये केली आणि त्याला शाळेच्या सफाईचं काम दिलं. म्हणजे दिवसभर तो शाळेतही असेल आणि त्याचा भाताचाही प्रश्न मिटेल. सुट्टीच्या दिवशी सर स्वत:च्या डब्यातला डबा त्याला आवर्जून देऊन यायचे.
कारण हे सगळं करत असताना सरांना त्यांचं लहानपण आठवत होतं. तालुक्याच्या गावाला असताना रोज गावाकडं एसटीतून त्यांचा डबा यायचा. एखाद दिवशी एसटीला उशीर झाला किंवा एसटी आलीच नाही तर त्या दिवशी अक्षरश: उपाशी झोपायची वेळ यायची. त्यादिवशी फक्त नळावरचे पाणी पोटभर पिऊन झोपावं लागायचं. असं पोटात काही नसताना दिवस काढणं म्हणजे काय असतं याची जाणीव असल्याने, त्या मुलाच्या जागी शिक्षक स्वत:लाच पाहू लागले आणि लक्षात आलं की माझ्या घरी निदान खेड्यात माझी आई तरी होती पण ह्या मुलाला भाकर करून घालणारी आई मात्र नव्हती. ह्या अपंग बापासाठी मात्र हा आता उरापोटी धावतोय. हे सगळे बदल शिक्षकानांच खूप आनंद देऊन गेले. कारण इतके दिवस ते फक्त मूल्य शिक्षणाचे धडे शिकवत होते.आजपासून ते खऱ्या अर्थाने ते जगताहेत एवढंच.