सजली अयोध्या नगरी

समस्त भारतीयांच्या आस्थेचे रूप अयोध्येत प्रकट होत आहे. आज अयोध्येच्या राम मंदिरात राम विराजमान होत आहेत. मूर्तीत प्राणप्रतिष्ठा होत आहे. या निर्णयाला न्यायालयीन निकालाची वैधता लाभलेली असल्याने त्याला एक आगळे महत्व आहे. आनंदाने भारतीय मन या सोहळ्याचे स्वागत करायला सज्ज झाले आहे. ढवळून निघालेल्या भारतीय जनमानसाची मनोकामना पूर्ती होत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून रक्तरंजित इतिहास असणारी […]

सजली अयोध्या नगरी

समस्त भारतीयांच्या आस्थेचे रूप अयोध्येत प्रकट होत आहे. आज अयोध्येच्या राम मंदिरात राम विराजमान होत आहेत. मूर्तीत प्राणप्रतिष्ठा होत आहे. या निर्णयाला न्यायालयीन निकालाची वैधता लाभलेली असल्याने त्याला एक आगळे महत्व आहे. आनंदाने भारतीय मन या सोहळ्याचे स्वागत करायला सज्ज झाले आहे. ढवळून निघालेल्या भारतीय जनमानसाची मनोकामना पूर्ती होत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून रक्तरंजित इतिहास असणारी एक लढाई संपून जीवन नवी गती घेण्यास सज्ज झाले आहे. लोकांनी मनापासून हा निकाल स्वीकारला आहे आणि ते सत्याला म्हणजेच रामाला सामोरे जाण्यास सज्ज झाले आहेत. ज्यांच्या मंदिराची उभारणी सुरू आहे, त्या प्रभू श्रीराम यांना आदर्श राजा, आदर्श पती, मर्यादा पुरुषोत्तम, विवेकी योध्दा मानले गेले आहे. खांद्यावर असलेले धनुष्य आवश्यक तेव्हाच हाती घ्यायचे आणि प्रश्न निकाली काढण्यासाठीच ‘रामबाण’ चालवायचा ही श्री रामांची ख्याती. त्यामुळेच राम या व्यक्तीला, परमेश्वराला किंवा संकल्पनेला भारतीयांच्या मनात आदराचे स्थान आहे. श्रध्दा आहे. भारतातील खूप मोठ्या भुभागावरील लोक त्यामुळेच ‘राम राम‘ असे म्हणून अभिवादन आणि संवादास प्रारंभ करतात. राम हा प्रत्येकाला जोडणारा असा सांस्कृतिक धागा आहे, जो प्रत्येकाच्या जवळचा आहे. अशा श्री रामाची जन्मभूमी आणि त्यावरील मंदिर हे काही शतके वादाचा विषय ठरले आणि आज तो वाद संपुष्टात येऊन मंदिर साकारले गेले आहे. मूर्तीची प्रतिष्ठापना आणि मंदिराची उभारणी पूर्ण होईल तेव्हा अत्यंत आनंदाने प्रत्येकजण त्यामध्ये सामील होईल याचा अंदाज होताच. तो प्रत्यक्षात दिसून येत आहे. देशभर एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून लोक हा सोहळा साजरा करण्यास उत्सुक आहेत. तसेही विशेष करून ग्रामीण भारताला श्रीराम सोहळा हा काही नवीन विषय नाही. प्रत्येकवर्षी गावोगावी लोक हनुमान जयंती ते राम नवमी या काळात असा आनंद सोहळा साजरा करत असतात. असंख्य पिढ्या कोणीही त्यासाठी लोकांना उद्युक्त न करताही हा सोहळा गावागावांमध्ये आनंदाने आणि भक्तीपूर्ण वातावरणात साजरा होत आला आहे. त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्राला किंवा ग्रामीण भारताला रामभक्ती ही नवीन नाही. त्यांच्यासाठी रामाची आराधना आणि मारुतीरायाच्या रूपाने शक्तीची उपासना हा पिढ्यान पिढ्यांचा नित्यक्रम आहे. आपल्या व्यक्तिगत आयुष्यात आपण श्रीरामासारखे एक वचनी असले पाहिजे आणि मर्यादा राखून आपले आयुष्य व्यतीत केले पाहिजे ही भारतीय मानसिकता आहे. श्रीरामांचे आयुष्य हीच धर्माची शिकवण समजून लोक ती जगत आले आहेत आणि गावोगाव अन्यायाचा प्रतिकार करत आले आहेत. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची प्रेरणा असो किंवा स्वातंत्र्यपूर्वकाळात ब्रिटिशांच्या विरोधातील लढाई असो, या सगळ्यात राम जीवन आणि पराक्रम याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. राम मंदिराच्या निमित्ताने शहरी भागांमध्ये सुरू असलेला राजकीय प्रसार आणि प्रचार हा वेगळा आहे. तो वेगळ्या पद्धतीने भारताच्या ग्रामीण भागात सुद्धा पोहोचवण्याचा प्रयत्न या राम मंदिराच्या उभारणीच्या निमित्ताने झाला असला तरी ग्रामीण भारत या सगळ्या प्रयत्नांच्याही पलीकडे स्वत:ची राम भक्ती सांभाळून आज पर्यंत आपले जीवन व्यतीत करीत आहे. त्यांच्यावर या प्रचार, प्रसाराचा कितपत परिणाम होईल माहित नाही. मात्र राम ही दैवी व्यक्तिरेखा आणि त्यांच्या जीवनकार्याचा परिणाम भारतीय लोकमानसावर खूप खोलवर आहे. त्याला आजचा काळ अपवाद असू शकत नाही. 80 च्या दशकात आयोध्या राम मंदिराच्या उभारणीच्या मागणीने जोर धरला असला तरी महाराष्ट्रातून उत्तर भारतात देवदर्शन करण्यासाठी गेलेला प्रत्येक व्यक्ती अयोध्येला प्रभू श्री रामचंद्राची जन्मभूमी कुठे आहे, त्याचा शोध घेत गेलेला आहेच. 1857 चे स्वातंत्र्य समर पेटलेले असताना विष्णू भट गोडसे, वरसईकर हे उत्तर कोकणातील गुरुजी त्या काळाचा इतिहास ‘माझा प्रवास’ या नावाने लिहून ठेवतात. त्यांच्यावर अनेक संकटे आणि लुटालुटीचे प्रसंग आले तरीसुद्धा परतीच्या वाटेवर प्रभू श्रीराम जन्मभूमीचे दर्शन घेण्यासाठी ते आयोध्येला जातात आणि तिथल्या भूमीला नतमस्तक होऊन येतात असे वर्णन आहे. 1857 च्या स्वातंत्र्य समर काळात मराठी सरदारांच्या अंतर्गत काय हालचाली सुरू होत्या त्याची माहिती त्यांच्या लेखनातून मिळते. तशीच रामजन्मभूमी नावाची जमीन कोठे आहे, कशी आहे याची माहितीही आपल्याला मिळते. युगानुयुगे पिढ्यानपिढ्या ही रामभक्ती मराठी माणसांच्या मनात रुजलेली आहे. त्याला मराठी संस्कृतीच्या सहृदयतेची, शांत जीवन शैलीची किनार आहे. त्यामुळेच उत्तर भारताची भूमिका आणि महाराष्ट्राची भूमिका यांच्यात फरक पडतो. त्यांची भूमिका ही एका वेगळ्या लढ्याची आहे. त्यामुळेच रामजन्मभूमी आंदोलन काळातील वर्णने ऐकून महाराष्ट्रातील लोक या आंदोलनाशी जोडले गेले आणि त्यांनी त्यात मोठे योगदानही दिले. मशिदीचा ढाचा उद्ध्वस्त करण्यातही त्यामुळेच महाराष्ट्र अग्रभागी राहिला आणि त्याचे परिणामही मुंबईसह महाराष्ट्राने सोसले.  मात्र तरीही या भूमीत कटुता राहिली नाही. आज जेव्हा न्यायालयाचा आदेश मिळवून या मंदिराची उभारणी झाली आहे, तेव्हा त्याचा आनंद साजरा करण्यास देखील इथले लोक मागे नाहीत. त्यांच्यादृष्टीने एक कर्तव्य पार पडले. त्यामुळेच अयोध्या नगरी प्रमाणे आपापले गाव सजवून त्यांनी आपल्या गावातच अयोध्या साकारली आहे. आता त्यांना पुढची प्रतीक्षा आहे ती रामराज्याची! एका आदर्श राज्य पद्धतीचा या भूमीचा शोध अद्याप संपलेला नाही.