एक व्हा… अन् एकदाच लढा : जरांगे पाटील

बेळगावात सकल मराठा समाजाच्यावतीने सभेचे आयोजन : लेकरांच्या पाठीमागे संघर्ष ठेवू नका, अशी भावनिक हाक बेळगाव : सीमाभागातील मराठी जनता आणि संपूर्ण कर्नाटकातील मराठा समाजाने एकत्र येऊन सीमाप्रश्नाबरोबरच आपल्या इतर प्रश्नांसाठी लढा उभा करावा. त्यासाठी एकजुटही महत्त्वाची आहे. तुम्ही एकजुटीने लढला तर कोणतेही आंदोलन यशस्वी होऊ शकते. तुमचे आंदोलन यशस्वी झाले तर पुढच्या पिढीला संघर्ष […]

एक व्हा… अन् एकदाच लढा : जरांगे पाटील

बेळगावात सकल मराठा समाजाच्यावतीने सभेचे आयोजन : लेकरांच्या पाठीमागे संघर्ष ठेवू नका, अशी भावनिक हाक
बेळगाव : सीमाभागातील मराठी जनता आणि संपूर्ण कर्नाटकातील मराठा समाजाने एकत्र येऊन सीमाप्रश्नाबरोबरच आपल्या इतर प्रश्नांसाठी लढा उभा करावा. त्यासाठी एकजुटही महत्त्वाची आहे. तुम्ही एकजुटीने लढला तर कोणतेही आंदोलन यशस्वी होऊ शकते. तुमचे आंदोलन यशस्वी झाले तर पुढच्या पिढीला संघर्ष करावा लागणार नाही. मात्र यासाठी घाव सोसण्याची तयारी ठेवा आणि रणांगणात उतरा, महाराष्ट्र तुमच्या पाठिशी आहे, असे ठाम आश्वासन मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिले. लेकरांसाठी पाठिमागे संघर्ष ठेवून तुम्ही जाऊ नका, अशी भावनिक हाकही त्यांनी यावेळी दिली. धर्मवीर संभाजी उद्यान येथे सकल मराठा समाजाच्यावतीने आयोजित केलेल्या सभेमध्ये ते बोलत होते. मनोज जरांगे पाटील बेळगावात दाखल होणार असल्यामुळे सीमाभागातील मराठी भाषिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. येथील मराठा समाजाला मार्गदर्शन करताना जरांगे पाटील म्हणाले, एकदा मी शब्द दिला तर तो पाळतो. त्यामुळे तुमचा सीमाप्रश्न काय आहे, त्याचा प्रथम अभ्यास करणार. त्यानंतर तो लढा हाती घेऊ, असे त्यांनी यावेळी सांगितले. मराठा हा एकदा जर रणांगणात उतरला तर तो माघारी फिरत नाही, हे महाराष्ट्रात मी दाखवून दिले आहे. त्यामुळे मी खोटे आश्वासन देणार नाही. तेव्हा सीमाभागातील मराठा समाजाने एकत्र यावे आणि हा लढा एकदाच लढा, तुमच्या पाठिशी संपूर्ण महाराष्ट्र असेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रामध्ये आम्ही जे आंदोलन केले ते आपल्या कुटुंबापासूनच सुरूवात केले. प्रथम कुटुंबच आंदोलनात उतरले पाहिजे. त्यानंतरच संपूर्ण समाज तुमच्या पाठिशी उभे राहतो आणि मी प्रथम तेच केले. त्यामुळे मला आंदोलनाला यश आले. महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर आता त्याचा लाभ मिळण्यास सुरूवात झाली आहे. आम्हाला जर कोणी विरोध करत असेल तर आम्ही त्याला योग्य तो हिसका दाखविण्यास सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.
आंदोलन यशस्वी करायचे असेल तर प्रामाणिकपणा आणि संघर्षाची तयारी पाहिजे. तेंव्हाच कोणतेही आंदोलन यशस्वी होते. तुम्ही सुरूवात करा. 100 टक्के महाराष्ट्रातील जनता तुमच्या पाठिशी असेल. आताच संघर्ष करा. त्यामुळे पुढील पिढीला संघर्ष करावा लागणार नाही. तुम्ही लेकरांना संकटात सोडून जावू नका, अशी भावनिक सादही त्यांनी घातली. कोणताही लढा लढायचा असेल तर प्रथम राजकारण बाजुला ठेवा. राजकारण सोडून तुमच्या न्याय हक्कासाठी जर आंदोलन केला तर निश्चितच ते यशस्वी होते. तेंव्हा सीमाभागातील मराठा समाजाने राजकारणापासून अलिप्त रहावे आणि प्रथम आपला प्रश्न सोडविण्यासाठी मैदानात उतरावे, असे त्यांनी सांगितले. आंदोलन करताना संघर्ष हा करावाच लागतो. मात्र त्या संघर्षामुळे पुढच्या पिढीला त्रास होणार नाही. यासाठी एकजुटीशिवाय काहीच होऊ शकत नाही. तेंव्हा सीमाभाग व कर्नाटकातील संपूर्ण मराठा समाजाची एकजुट असणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तुमचा प्रश्न हा अत्यंत महत्वाचा आहे. मात्र तो किचकटही आहे. त्यामुळे प्रथम त्यासाठी अभ्यास करावा लागणार आणि त्यानंतर त्या प्रश्नावर घाव घालावा लागणार. तेंव्हा निश्चितच सीमाप्रश्नासाठी माझे योगदान राहिल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मनोज जरांगे पाटील हे बेळगावात दाखल होताच त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. सिव्हिल हॉस्पिटल रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर धर्मवीर संभाजी चौक येथील ध. संभाजी महाराज यांच्या मूर्तीला हार अर्पण करण्यात आला. त्यानंतर छ. शिवाजी उद्यान येथील छ. शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला हार अर्पण करुन मनोज जरांगे पाटील हे सभेच्या ठिकाणी दाखल झाले. यावेळी त्यांना बैलगाडीतून आणण्यात आले. त्यांच्यावर पुष्पवृष्टी करुन त्यांचे स्वागत करण्यात आले. फटाक्याची आतषबाजी आणि वाद्यांच्या गजरात जयघोष करत मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना सभेच्या स्थळी नेले. यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. सकल मराठा आणि म. ए. समितीच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी म. ए. समितीबरोबरच सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याचबरोबर सभेला हजारोंनी उपस्थिती दर्शविली.