‘ज्ञानवापी’चे तळघर हिंदूंसाठी ‘मुक्त’
वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाचा महत्वपूर्ण आदेश, हिंदूंना दिला पूजा करण्याचा अधिकार
वृत्तसंस्था / वाराणसी
अयोध्येत भगवान रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेपाठोपाठ हिंदूंसाठी आणखी एक महत्वपूर्ण आनंदवार्ता आली आहे. वाराणसीतील ‘ज्ञानवापी’च्या तळघरात पूजापाठ करण्याचा अधिकार हिंदूंना देण्यात आला आहे. हा निर्णय वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने बुधवारी घोषित केला. पूजापाठ प्रारंभ करण्याची व्यवस्था 7 दिवसांमध्ये करा, असा आदेशही न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला दिला आहे.
या स्थानी आता नित्य पूजाआर्चा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. काशी विश्वनाथ विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून ही पूजा केली जाणार आहे. या प्रकरणातील हिंदू पक्षकारांनी या निर्णयावर अत्यानंद व्यक्त केला असून, 30 वर्षांच्या अथक न्यायालयीन संघर्षानंतर हा न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जिल्हा प्रशासनाने पूजापाठाची सज्जता करण्यास प्रारंभ केला आहे.
व्यासजी तळघर असा परिचय
हे तळघर व्यासजी तळघर म्हणून प्राचीन काळापासून ओळखले जाते. ज्ञानवापी परिसर हे पूर्वापारपासून हिंदूंचे मंदिरच होते, असा निष्कर्ष नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या भारतीय पुरातत्व विभागाच्या अहवालात काढण्यात आला आहे. तळघरात पूजापाठ करण्याचा अधिकार देण्यात यावा, अशी मागणी करणारे आवेदनपत्र हिंदू पक्षकारांकडून सादर करण्यात आले होते. या आवेदनपत्रावर काही दिवसांपूर्वी वाराणसीच्या जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली होती.
1993 पर्यंत होता अधिकार
ज्ञानवापीच्या तळघरात पूजापाठ करण्याचा अधिकार न्यायालयाच्या आदेशानुसार हिंदूंना नव्याने मिळालेला नाही. हा अधिकार 1993 पर्यंत नेहमीच होता. 1993 मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारने प्रार्थनास्थळ संरक्षण कायदा क्रियान्वित केला होता. त्यानंतर या पूजापाठाला स्थगिती देण्यात आली होती. आता जिल्हा न्यायालयाने ही स्थगिती उठविण्याचा आदेश दिला असून नित्य पूजापाठास अनुमती दिली आहे. 1993 पासून आजवर सातत्याने हिंदूंनी हा अधिकार पुन्हा मिळविण्यासाठी प्रयत्न चालविले होते. आज त्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.
मुस्लीम पक्ष दाद मागणार
वाराणसी जिल्हा न्यायालयाचा हा निर्णय अयोग्य आहे, अशी टीका या प्रकरणातील मुस्लीम पक्षकारांच्या वकिलांनी केली. हा निर्णय म्हणजे पूर्वीच्या न्यायालयीन निर्णयांचे उल्लंघन आहे. या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल, असे अंजुमन इंतजामिया मस्जिद समितीने स्पष्ट केले.
हिंदू पक्षकारांना अत्यानंद
1993 पासून सातत्याने 30 वर्षांहून अधिक काळ हिंदू समाज व्यासजी तळघरात पूजापाठाचा अधिकार मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. 1993 पूर्वी हा अधिकार होता. आता पुन्हा न्यायाचा विजय झाला असून हिंदू समाजाला हा अधिकार परत मिळाला आहे. आता पुढच्या सात दिवसांमध्ये येथे नित्य पूजापाठाचा प्रारंभ करण्यात येणार आहे. समस्त हिंदूंना हा अधिकार आहे. 1993 मध्ये उत्तर प्रदेश सरकारने हिंदूंचा हा अधिकार काढून घेतला होता. तो आता पुन्हा प्रस्थापित झाला आहे, अशी प्रतिक्रिया हिंदू पक्षकारांनी व्यक्त केली.
जिल्हा प्रशासनाच्या आधीन
17 जानेवारीला हे तळघर आणि त्याच्या आसपासचा परिसर जिल्हा प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशावरुन आपल्या अधिकारात घेतला होता. त्यानंतर भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिपत्यात न्यायालयाच्याच आदेशाने या तळघरात स्वच्छता कार्य करण्यात आले होते. आता सात दिवसांमध्ये हा भाग बॅरिकेडस् घालून सुरक्षित केला जाईल आणि पूजापाठाची व्यवस्था प्रशासनाकडून केली जाईल.
प्रकरण काय आहे?
वाराणसीत प्राचीन काळापासून शिवमंदिर अस्तित्वात होते. याचे अनेक पुरावे आहेत. औरंगजेबाने 17 व्या शतकात हे मंदिर पाडवून, मंदिराच्याच सामग्रीचा उपयोग करुन मशीद उभी केली. पुढे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मशिदीच्या शेजारी शिवमंदिराचे निर्माणकार्य केले. मात्र, मशिदीच्या परिसरात असलेल्या तळघरात हिंदू परंपरेने पूजा करीत आले आहेत. त्यांचा हा अधिकार देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही 1993 पर्यंत होता. तेथे तो वेळपर्यंत नित्य पूजाआर्चा होत असे. 1993 मध्ये उत्तर प्रदेशातील मुलायम सिंग यादव यांच्या सरकारने हा पूजापाठ बंद केला आणि तळघर बंद केले. आता ते उघडण्याचा आणि पूजापाठासाठी मुक्त करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
हिंदूंसाठी शुभवार्ता
ड ज्ञानवापीच्या तळघरातील पूजाआर्चेचा अधिकार आता पुनर्स्थापित
ड हिंदू पक्षकारांचे विधिज्ञ विष्णू शंकर जैन यांच्याकडून आनंद व्यक्त
ड मुस्लीम पक्षकार निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार
Home महत्वाची बातमी ‘ज्ञानवापी’चे तळघर हिंदूंसाठी ‘मुक्त’
‘ज्ञानवापी’चे तळघर हिंदूंसाठी ‘मुक्त’
वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाचा महत्वपूर्ण आदेश, हिंदूंना दिला पूजा करण्याचा अधिकार वृत्तसंस्था / वाराणसी अयोध्येत भगवान रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेपाठोपाठ हिंदूंसाठी आणखी एक महत्वपूर्ण आनंदवार्ता आली आहे. वाराणसीतील ‘ज्ञानवापी’च्या तळघरात पूजापाठ करण्याचा अधिकार हिंदूंना देण्यात आला आहे. हा निर्णय वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने बुधवारी घोषित केला. पूजापाठ प्रारंभ करण्याची व्यवस्था 7 दिवसांमध्ये करा, असा आदेशही न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला दिला […]